आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तोपर्यंत खडसेंबाबत तर्कवितर्क 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. देशभरात लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रशासन आणि राजकीय पातळीवर एकाचवेळेस ही लगबग सुरू आहे. काँग्रेस आणि अन्य पक्षांपेक्षा भाजपसाठी २०१९ ची लोकसभा निवडणूक ही मोदी सरकारची सत्व परीक्षा ठरणार आहे. गेल्या पाच वर्षांत मोदींनी घेतलेले निर्णय लोकांना मान्य आहे की लादले गेलेले आहेत? याचे उत्तर याच निवडणुकीतून मिळणार आहे. मोदींचे सरकार हे विश्वासार्ह सरकार आहे; हे दाखवून देण्यासाठी जे निवडून येतील त्यांनाच पुन्हा तिकीट आणि जे निवडून येणार नाहीत, त्यांना घरी बसवण्याचा निर्णय मोदी आणि अमित शाह जोडीने घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतरही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. अनेक खासदारांमध्ये अजूनही धाकधूक आहे. जिंकण्यासाठी म्हणून काहींचा पक्षप्रवेश करून घेतला जात आहे. राज्याच्या राजकारणात असाच एक मोठा पक्षप्रवेश डाॅ.सुजय विखे- पाटील यांच्या माध्यमातून भाजपने करून घेतला आहे. सुजय हे काँग्रेसचे बडे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटलांचे चिरंजीव आहेत. सुजय यांना दक्षिण नगरमधून भाजपची उमेदवारीही जाहीर झाली आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. सुजय यांना भाजपत दाखल करून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शिष्टाई केली. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन महाजन हे मुख्यमंत्र्यांना अपेक्षित काम करीत आहेत. महाजन हे राज्यभरात जे काम करीत आहेत, तेच काम आपल्या जळगाव जिल्ह्यात करण्याचा कानमंत्र त्यांना पक्षश्रेष्ठींकडून मिळाला होता. 


जळगावसह खान्देशातील चारही जागा भाजपच्या ताब्यात आहेत. त्यापैकी रावेरच्या खासदार माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या आहेत. रक्षा खडसे यांनी गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी असो की खासदार निधीची कामे, या माध्यमातून त्या लोकांशी संपर्क ठेऊन आहेत. त्यामुळे निष्क्रिय खासदारांच्या यादीत त्यांच्या नावाची कुठेही चर्चा नाही. रक्षा खडसे यांचे खासदारकीचे तिकीट कापले जाईल, असे कुणाला वाटणारही नाही. तरीही भाजपतर्फे गिरीश महाजन यांच्या पत्नी आणि जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांना रावेरमधून भाजपची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. साधना महाजन यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काही मेळावेही घेतल्याचे बोलले जात होते. मधेच या मतदारसंघाचे माजी खासदार आणि रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांचाही विचार रक्षा खडसेंना पर्याय म्हणून केला जात होता. त्याचबरोबर महिला म्हणून साधना महाजन या रावेर लोकसभेच्या उमेदवार का नाही होऊ शकत?  अशी चर्चा थेट मुख्यमंत्र्यांनी मंत्री महाजनांशी केल्याचेही सांगितले जाते. १५ दिवसांपूर्वी चर्चेत असलेले साधना महाजनांचे नाव सध्या मागे पडले आहे. त्यामुळे अजून तरी रक्षा खडसे याच भाजपच्या उमेदवार राहतील असे दिसते. तथापि, चार वर्षांपूर्वी राज्य आणि भाजपच्या राजकारणाची सूत्रे ज्या चार, पाच नेत्यांच्या हातात होती, त्यात एकनाथ खडसे हे एक नाव होते. कुणाचा पक्ष प्रवेश असो की कुणाला तिकीट द्यायचे असले तरी खडसेंच्या मताला अर्थ होता. 


आता ही जागा जळगावच्याच गिरीश महाजन यांनी घेतली आहे. खडसेंचे राजकीय खच्चीकरण भाजपने केले आहे. अनेक वेळा जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतरही खडसेंबाबत मुख्यमंत्री आणि नेत्यांची भूमिका कठोरच राहिली. पुढे जाऊन खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली तरी लोकसभा आणि विधानसभेसाठी उमेदवार असावा म्हणून महाजनांना तयारी करून ठेवण्याचे संकेत दिले असावे. समजा एकनाथ खडसे भाजपतच राहिले तरी त्यांच्यावरील पक्षाचा विश्वास जसा कमी झाला आहे, अगदी तसाच विश्वास त्यांचाही पक्षावरील कमी झाला आहे. एवढे असूनही खडसेंच्या घरात खासदार आणि आमदारकीचे तिकीट द्यावे का? असा प्रश्नही पक्षश्रेष्ठींना पडला असावा. कारण महाजन जसे मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करू शकतात, तसे काम खडसे अजिबात करू शकत नाही. ४० वर्षे पक्षासाठी वाहून घेतले आणि मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहिले म्हणून आपल्याला दूर ठेवले गेले; ही खदखद त्यांनी अलीकडेच पुन्हा बोलून दाखवली आहे. त्यानंतरही कुणा भाजप नेत्यांनी काहीच खुलासा केला नाही. याचाच अर्थ खडसे हे भाजप सोडून गेले तरी त्यांना थांबवण्यासाठी कुणी फार प्रयत्न करेल असे चित्र नाही. राज्यातील ज्या काही बड्या नेत्यांचे मतदारसंघ चर्चेत आहेत. त्यात रावेर लोकसभा मतदारसंघही एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामुळे लक्षवेधी ठरला आहे. या मतदारसंघातील उमेदवार भाजप जाहीर करत नाही तोपर्यंत खडसेंबाबत तर्कवितर्क सुरूच राहतील.  


त्र्यंबक कापडे
-निवासी संपादक, जळगाव

बातम्या आणखी आहेत...