प्रासंगिक: प्रदूषण वाढीचा / प्रासंगिक: प्रदूषण वाढीचा प्रश्न गंभीर

त्र्यंबक कापडे

Nov 07,2018 06:43:00 AM IST

देशाची राजधानी दिल्लीत दिवाळी पर्व सुरू होण्याआधीच तेथील नागरिकांचा श्वास गुदमरायला लागला आहे. सोमवारी दिल्लीत प्रदूषणाची पातळी सरासरीच्या वीसपट अधिकची नोंदली गेली. दिल्लीकरांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये आणि प्रदूषणाची पातळी वाढू नये म्हणून नागरिकांनी या दिवाळीत फटाके न फोडण्याचा निर्धार केला आहे.

दिल्लीकरांच्या या निर्णयामुळे फटाके उत्पादक, विक्रेत्यांचे सुमारे पाचशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अर्थात नागरिकांच्या जिवापेक्षा हे नुकसान फार मोठे नाही. दिल्लीत जे कमालीचे वायुप्रदूषण झाले, त्याची अनेक कारणे आहेत. दिल्लीत लोकसंख्येबरोबर वाढणाऱ्या वाहनांना कुठेही मर्यादा घातली गेली नाही. त्यामुळे प्रदूषणाची नोंद प्रत्येक वर्षी वाढत गेली. खरे तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे आज अशा जीवघेण्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. जगात भारतापेक्षा लहान असलेल्या देशांनी प्रदूषण वाढ आणि उपाययोजनांचा विचार कित्येक वर्षे आधी केल्यामुळे तेथील हवा शुद्ध आहे आणि शुद्ध हवामानामुळे त्या नागरिकांची सरासरी वयोमर्यादाही वाढली आहे.


कोलंबियाची राजधानी बोगोटाची सध्याची लोकसंख्या एेंशी लाख आहे. १९७४मध्ये या शहराची लोकसंख्या होती फक्त अठ्ठावीस लाख. तेव्हाच कोलंबिया सरकारने नियोजन करून प्रदूषणाला रोख लावण्याचे काम केले. लोकसंख्येबरोबर वाढणाऱ्या वाहनांची संख्या कमी केली. तसेच शहरातील काही प्रमुख रस्ते कारसाठी बंद केले. परिणामी कार वापरणाऱ्यांची संख्या कमी झाली. असेच नियोजन डेन्मार्कसारख्या देशातील कोपेनहेगन या राजधानीच्या शहरात करण्यात आले. तेथे सन १९६०पासूनच प्रदूषणाचा धोका ओळखून वाहन वापरण्याला मर्यादा पडतील असा कायदा करण्यात आला आहे. याचाच अर्थ वायुप्रदूषण किती घातक आहे, याची जाणीव भारतापेक्षा सर्वच क्षेत्रांत मागे असलेल्या देशांना आहे, पण विकसनशील भारताला नाही.

आज देशाची राजधानी वायुप्रदूषणामुळे धोक्याच्या उंबरठ्यावर आहे, पण हळूहळू ही परिस्थिती देशातील अन्य मोठ्या शहरांमध्येही उद‌्भवायला फार वेळ लागणार नाही. महाराष्ट्राचा विचार केला तरी मुंबई, पुणे आणि नागपूर ही मोठी शहरे प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. अलीकडेच जिनेव्हा येथे वायुप्रदूषणावर जागतिक परिषद झाली. त्यात वायुप्रदूषणात सर्वाधिक धोकादायक देश म्हणून भारताचे नाव घेतले गेले. देशात वायुप्रदूषणामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही भारतातच अधिक आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हीदेखील देशापुढे चिंतेची बाब बनली आहे.


दीपोत्सवात सणाचा आनंद लुटण्यासाठी फटाके फोडण्याची परंपरा आहे. त्यामुळे देशभरात काही हजार कोटींमध्ये फटाक्यांची उलाढाल होते. जेवढी मोठी उलाढाल तेवढ्या पटीत प्रदूषण ठरलेले. आपणच वायुप्रदूषणाचा आकडा प्रत्येक वर्षी वाढवत नेत आहोत. जनजागृती आणि सामाजिक संदेशातून भारतीय नागरिक जागा होत नाही म्हटल्यावर न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर सरसकट बंदी घातली नसली तरी मोठ्या आवाजाचे, अधिकचे प्रदूषण करणारे फटाके उडवण्याला मर्यादा घातली आहे. नागरिकांच्या हिताचा आणि जिवाचा विचार करून घेतलेला निर्णयही तथाकथित संस्कृतिरक्षकांना रुचलेला नाही, पण पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत करत काटेकोर अंमलबजावणीचीही अपेक्षा व्यक्त केली आहे.

केवळ फटाक्यांमुळे प्रदूषण होते असे नाही, तर वाहने आणि त्यातून निघणारा धूर हेदेखील प्रदूषणाचे दुसरे कारण आहे. आपल्या देशात वाहन निर्मितीपासून ते उपभोक्त्यापर्यंत प्रदूषण होणार नाही याची पाहिजे तशी काळजीच घेतली जात नाही. कायदे आहेत पण त्यांची अंमलबजावणी काटेकोर होत नाही. याउलट कायद्याचा धाक दाखवून भ्रष्टाचार वाढण्याला प्रोत्साहन मिळते. एकीकडे आपण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आग्रही असतो आणि दुसरीकडे संस्कृती, परंपरा आणि अस्मितेच्या नावाखाली गळे काढायचे. देशातल्या काही ढोंगी लोक आणि संघटनांमुळेही सामाजिक प्रदूषण वाढले आहे. आज देशातल्या राजधानीची हवा खराब झाल्यामुळे वायुप्रदूषणाचा विषय चर्चेत आला आहे.

चर्चा दिल्लीची असली तरी पुणे, मुंबई, नागपूर, नाशिकसारख्या शहरांनीही चिंता करावी असा तो विषय आहे. कारण या शहरांच्या पर्यावरणाचा अहवाल सांगतो की, तेथील प्रदूषण वाढते आहे आणि ते रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक शहरात प्रदूषण रोखण्यासाठी नियोजनबद्ध काम झाले नाही तर नागरिकांच्या जीवन-मरणातील अंतर हे एका श्वासाचे असेल.

- त्र्यंबक कापडे
निवासी संपादक, जळगाव

X
COMMENT