आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात मंगळवारी महाआघाडीची घोषणा शक्य; देशभरातील प्रादेशिक नेत्यांना निमंत्रण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- उत्तर प्रदेशात बहुजन समाजवादी पार्टी (बसपा), समाजवादी पार्टी (सपा) आणि अन्य प्रादेशिक पक्ष मिळून मकरसंक्रांतीच्या दिवशी १५ जानेवारी राेजी महाआघाडीची घोषणा करू शकतात. ही महाआघाडी राज्यातील राजकारणास नवीन वळण देणार आहे.

 
१५ जानेवारी राेजी मकरसंक्रांतीच्या दिवशी प्रयाग येथे कुंभाचे पहिले शाही स्नान आहे. त्याच दिवशी मायावती यांचा ६३ वा वाढदिवस अाहे. तसेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची पत्नी खासदार डिंपल यादव यांचा ४१ वा वाढदिवस आहे. यामुळे १५ जानेवारी राेजी महाआघाडीची घोषणा करण्यात येणार असल्याचे बसपाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. १५ जानेवारी राेजी आयाेजित कार्यक्रमात बसपा, सपा, राष्ट्रीय लाेकदल, जनता दल ( सेक्युलर), जनता काँग्रेस ( छत्तीसगड) व अन्य प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना वाढदिवस कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात येणार आहे. या वेळी या वर्षी हाेणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यात येणार आहे. समारंभात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जाेगी यांच्यासह कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड व मध्य प्रदेशातील बसपाचे आमदारही सहभागी हाेणार आहेत. 

 

समारंभासाठी देशभरातील बहुजन समाजवादी पार्टीच्या नेत्यांना लखनऊत बाेलवण्यात आले आहे. हा दिवस जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान मायावती आपल्या वाढदिवस कार्यक्रमासाठी गुरुवारीच लखनऊमध्ये येणार आहे. २००७ मधील निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर १५ जानेवारी हा दिवस बसपाकडून 'जनकल्याणकारी दिवस' म्हणून साजरा केला जात अाहे. या दिवशी पक्षाकडून गरीब, अपंग लाेकांना मदत करण्यात येतेे. 

 

महाआघाडीवर प्रश्न, नितीशवर लालूंची टीका 
चारा घोटाळा प्रकरणात कारागृहात असलेले लालूप्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका केली अाहे. लालू यांच्या टि्वटर खात्यावरून बुधवारी टि्वट करण्यात आले. त्यात म्हटले की, जाे व्यक्ती महाआघाडीस मिळालेल्या मतांमुळे खुर्चीवर बसला आहे. ज्याने दिवसाढवळ्या जनमतावर दराेडा टाकला आहे, ज्याने ११ काेटी बिहारवासीयांच्या जनमताचा अनादर केला आहे, ताे आज काेणत्या ताेंडाने महाअाघाडीसंदर्भात बाेलत आहे. अशा दगाबाज लाेकांना लाजही वाटत नाही. नितीशकुमार यांनी बिहारमधील महाआघाडीसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले हाेते. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय हाेणार असून, नरेंद्र माेदी पुन्हा पंतप्रधान हाेणार असल्याचे म्हटले हाेते. या वक्तव्यामुळे लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर टीकास्त्र साेडले.

 

भाजपला यूपीमध्ये हरवणे साेपे नाही : शिवपालसिंह 
उत्तर प्रदेशात लाेकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करणे साेपे नाही. त्यासाठी इतर पक्षांना आमच्या पक्षाशी आघाडी करावीच लागेल, असा दावा प्रगतिशील समाजवादी पक्षाचे संस्थापक व माजी मंत्री शिवपालसिंह यादव यांनी बुधवारी केला. ते लखनऊत पत्रकार परिषदेत बाेलत हाेते. 

 

या वेळी यादव म्हणाले की, याच वर्षी हाेणाऱ्या लाेकसभा निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी आमचा पक्ष काेणत्याही सेक्युलर पक्षाशी आघाडी करण्यास तयार आहे. तसेच आघाडीसाठी सर्व पर्याय खुले असून राज्यात भाजपला पछाडण्यासाठी इतर पक्षांना पीएसएलयूशी आघाडी करावीच लागेल. आपले भाचे व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवांचे नाव न घेता ते म्हणाले की, आमचा पक्ष आगामी निवडणुकीत स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी पुढे आला आहे. राज्यातील उत्खनन घाेटाळ्यावर बाेलताना शिवपालसिंह यादव म्हणाले की, वाळू व इतर खनिजांच्या किमती गगनाला भिडल्या हाेत्या त्याच काळात हा भ्रष्टाचार झाल्याचे सर्वांना माहीत आहे. 

 

गरीब सवर्णांना आर्थिक आधारावर आरक्षण मिळावे 
आर्थिक आधारावर सवर्णांना देण्यात आलेल्या आरक्षणाला पाठिंबा देत यादव म्हणाले की, यातील गरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र, याशिवाय अशी अनेक आश्वासने आहेत, जी माेदी सरकारने अद्यापही पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे आमचा भाजपवर विश्वास नाही. या आरक्षणाचा प्रस्ताव नरसिंह राव हे पंतप्रधान असताना सादर झाला हाेता; परंतु ताे न्यायालयात फेटाळला गेला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...