आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संबळाच्या कडकडाटात कुंकवाने न्हाली तुळजामाय; अभूतपूर्व उत्साहात मातेचा सीमाेल्लंघन सोहळा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर - संबळाच्या कडकडाटात आणि आई राजा उदो-उदोच्या गजरात मंगळवारी (दि. ८) पहाटे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा पार पडला. यावेळी कुंकवाची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली. तुळजाभवानी माता कुंकवाने न्हाऊन निघाली. सीमोल्लंघन सोहळ्यानंतर तुळजाभवानी माता श्रमनिद्रेसाठी नगरच्या पलंगावर विसावली. ५ दिवसांच्या श्रमनिद्रेनंतर रविवारी (दि. १३) पहाटे आश्विन पाैर्णिमेदिनी तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होईल. मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास तुळजाभवानी मातेची मूर्ती सीमोल्लंघन सोहळ्यासाठी पालखीत ठेवण्यात आली. त्यानंतर आई राजा उदो-उदोच्या गजरात आणि संभळाच्या कडकडाटात पालखीतून प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणा मारण्यात आली. या वेळी प्रदक्षिणा मार्गावर पिंपळाच्या पारावर तुळजाभवानी माता काही काळ विसावली. पारावर देवीला नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या करण्यात आल्या. विसाव्यानंतर पुन्हा प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली. या वेळी महंत तुकोजी बुवांसह पुजारी, मानकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी मध्यरात्री १२ वाजता अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात आला. तर अभिषेक पूजेनंतर पुजारी सचिन पाटील, कैलास पाटील, संजय कदम, विकास मलबा, संजय सोंंजी आदींनी तुळजाभवानी मातेला दिंड (१०८ साड्यांत मूर्ती लपेटणे) गुंडाळले. त्यानंतर धुपारती होऊन गाभाऱ्यात दोन धार्मिक विधी करण्यात येऊन तुळजाभवानी मातेची मूर्ती सीमोल्लंघन सोहळ्यासाठी पालखीत ठेवण्यात आली. सीमोल्लंघन सोहळ्यानंतर संस्थानचाा अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्या हस्ते पलंग, पालखीचे मानकरी व इतर सेेेवेकऱ्यांचा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. दिलीप टिपरसे, व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, जयसिंग पाटील, राजकुमार भोसले, नागेश शितोळे यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पलंग पालखी वाजतगाजत मंदिरात : सीमोल्लंघन सोहळ्यासाठी नगरचा पलंग व भिंगारच्या पालखीचे सोमवारी रात्री रात्री शहरातील बोंबल्या चौक, किसान चौक, साळुंके गल्ली, आर्य चौक मार्गे राजे शहाजी महाद्वारातून वाजतगाजत तुळजाभवानी मंदिरात आगमन झाले. तत्पूर्वी मार्गावर सर्वत्र आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती तर जागोजागी पालखीवर कुंकवाची उधळण करून स्वागत करण्यात आले.

दीक्षितांकडून १११ लिटर दुधाचा नैवेद्य  : सीमोल्लंघन सोहळ्यापूर्वी तुळजाभवानी मातेला दीक्षित परिवाराच्या वतीने १११ लिटर दुधाचा नैवेद्य दाखवण्यात आला. तसेच सोनार समाजाच्या वतीनेही तुळजाभवानी मातेला नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर दुधाचा प्रसाद भाविक, पुजारी, मानकऱ्यांना वाटण्यात आला. यावेळी दत्तात्रय दीक्षित, गणेश दीक्षित आदींची उपस्थिती होती.

सकाळी ६.३० वाजता मंदिर बंद : सीमोल्लंघन सोहळ्यानंतर तुळजाभवानी माता नगरच्या नव्या पलंगावर श्रम निद्रेसाठी सिंह गाभाऱ्यात विसावली. त्यानंतर रात्रभर खुले असणारे मंदिर बंद करण्यात आले व पुन्हा लगेच सकाळी ७.३० वाजता चरणतीर्थ पूजेनंतर मंदिर उघडण्यात आले.

पलंगावर सर्व धार्मिक विधी 
मंचकी निद्रेदरम्यान चरणतीर्थ पूजा, प्रक्षाळ पूजा, दोन वेळच्या अभिषेक पूजा, नैवेद्य आदी तुळजाभवानी मातेच्या सर्व धार्मिक विधी पलंगावर करण्यात येतात. मंचकी निद्रेच्या कालावधीत तुळजाभवानी मातेला सुवासिक तेलाने अभिषेक घालण्यात येते. या काळात देवीचे सिंहासन रिकामे असते.

रविवारी सिंहासनावर प्रतिष्ठापना
५ दिवसांची श्रमनिद्रा संपवून रविवारी(दि. १३) आश्विन पौणिमेदिनी पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येईल, तर सायंकाळी शिवलाड तेली समाजाच्या काठ्यांसह छबिना मिरवणुकीनंतर महंताच्या जोगव्यानंतर नवरात्र महोत्सवाची सांगता होईल. यावर्षी तुळजाभवानी मातेची पाैर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी आल्याने भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कुंकवाची उधळण, मंदिरासह संपूर्ण शहर लालेलाल
सीमोल्लंघन सोहळ्यावर भाविकांनी कुंकवाची मुक्त हस्ते उधळण केली. या वेळी शेकडो क्विंटल कुंकवाच्या उधळणीने तुळजाभवानी मंदिरात कुंकवाचा सडा पडला होता. सर्व भाविक, पुजारी, बंदोबस्तावरील पोलिस कुंकवाने न्हाऊन निघाले होते तर शहरातील सर्व रस्तेही कुंकवाने माखले होते.