आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजाभवानी मंदिर दागिने गहाळ प्रकरण : स्थानिक अधिकाऱ्यांवर ठपका, वरिष्ठांना मात्र ‘क्लीन चिट’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवीण पवार 

उस्मानाबाद - श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थानच्या दागिने गहाळ प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल ‘दिव्य मराठी’च्या हाती लागला आहे. यात मंदिर देवस्थानच्या आजी-माजी धार्मिक व्यवस्थापकांसह त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या विश्वस्त तहसीलदारांवर चौकशी समितीने ठपका ठेवला आहे. आता पुढे चौकशी व कारवाईसाठी हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले आहे. परंतु, हे प्रकरण मागील १८ वर्षांपासून प्रलंबित आहे. या कालावधीत एकाही विश्वस्त वरिष्ठ अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी कर्तव्यात कसूर केला असूनही या अधिकाऱ्यांना क्लीन चिट देत केवळ स्थानिक अधिकाऱ्यांवरच कारवाईची अहवालात शिफारस करण्यात आली अाहे. १०५ पानांचा हा अहवाल आहे. तुळजाभवानी मंदिर देवस्थानच्या धार्मिक व्यवस्थापक पदाचा पदभार हस्तांतरित करताना देवस्थानच्या रजिस्टरला नोंदीस असलेल्या अनेक मौल्यवान वस्तू गायब असल्याची गंभीर बाब समोर आली होती. पुजारी किशोर गंगणे यांच्या तक्रारीवरून अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या चौकशीत शिक्कामोर्तब झाले आहे. अपर जिल्हाधिकारी अध्यक्ष व दोन उपजिल्हाधिकारी सदस्य असलेल्या समितीने पाच महिन्यांच्या सुनावणीनंतर अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. यामध्ये मंदिर देवस्थानच्या रेकॉर्डवरील अनेक दागिने नवीन चार्जपट्टीत नोंदीला आले नसल्याचे तसेच चार्ज देताना-घेताना आवश्यक बाबींचे पालन न करता गंभीर चुका केल्याचेही समितीने नमूद केले. विशेष म्हणजे २००१ मध्ये तत्कालीन व्यवस्थापक दीक्षित हे मृत झाल्यानंतर दिलीप नाईकवाडी यांनी बेकायदेशीरपणे तसेच कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता सदरील पदाचा पदभार घेतला, त्यानंतर चार वर्षे याकडे कोणीच पाहिले नाही आणि नंतर पंचनामा करून रीतसर रेकॉर्ड तयार केले. त्या रेकॉर्डवरील दागिनेही २०१८ च्या पदभार देवाण-घेवाणीच्या यादीत नसल्याने हे प्रकरण समोर आले.केवळ व्यवस्थापक आणि तहसीलदारांवर ठपका...
 
मंदिर देवस्थानचे विश्वस्त म्हणून कारभार पाहणारे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आमदार, नगराध्यक्ष आदींपैकी एकानेही या गंभीर बाबीकडे लक्ष दिलेले दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यावरही चौकशी अहवालात ठपका येणे अपेक्षित असताना केवळ तहसीलदार व आजी-माजी धार्मिक व्यवस्थापकांवर ठपका ठेवून बड्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिल्याचेच अहवालावरून दिसत आहे. या प्रकरणात देवस्थानचे माजी धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, विद्यमान धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, तत्कालीन तहसीलदार यांच्यावर ठपका ठेवून दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत प्रकरण आता सीआयडीकडे पाठवले आहे.

बातम्या आणखी आहेत...