आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींचा धर्म आणि गांधीजींचा राम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२ ऑक्टोबर १८६९ ही महात्मा गांधींची जन्मतारीख. म्हणजेच येता २ ऑक्टोबर हा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाचा प्रारंभ. मोहनदास करमचंद गांधी नावाची ही कुणी एक व्यक्ती नव्हे, तर स्वातंत्र्योत्तर काळातला प्रत्येक क्षण व्यापून असलेला सत्य आणि अहिंसेचे तत्त्वज्ञान मांडणारा शाश्वत असा विचार आहे. मात्र, विचार बाजूला सारून  आता गांधी हे एक राजकीय साधन बनले आहे. त्यांच्या नजरेतला हिंदू धर्म आणि मर्यादापुरुषोत्तम राम मतांच्या राजकारणात खूप मागे पडला आहे. जयंती वर्षाच्या निमित्ताने गांधीजींचा धर्म आणि राम समजून घेण्याइतका दुसरा योग्य मार्ग नाही...

 

होय, मी म्हणतो, आज भारतात रामराज्य अवतरले आहे. पण ते महात्मा गांधी अर्थात बापूंच्या  संकल्पेनतले नाही. बापूंचा राम हा ‘मर्यादापुरुषोत्तम’ होता. त्यांच्या रामाने पित्याच्या वचनपूर्तीसाठी राज्यावरला हक्क साेडला. वनवासही पत्करला. आजचा  सत्ताधारी राजकारण्यांनी उभा केलेला राम मात्र सूड घेणारा आहे. "योद्धा' राम जाणीवपूर्वक आमच्यासमोर उभा केला जात आहे. बापूचे रामराज्य न्यायाचे, समतेचे आणि सत्याचे होते. राजकारण धर्माशी जोडले जाण्याने राजकारणाचे सर्वथा शुद्धीकरण व उन्नयन घडणे बापूंना अपेक्षित होते. राजकारणाशी त्यांनी जोडलेला धर्म आध्यात्मिक होता.  मात्र,आज राजकारणाची रूढीवादी, जमातवादी, संकुचित, पंथवादी धर्माशी सांगड घातली जात आहे. हा त्यातला मोठाच विरोधाभास आहे. ज्या विचारधारने बापूंची हत्या केली. त्या विचारधारेच्या मते, अतिपुण्यशाली व्यक्तीच्याच तोंडी मृत्युवेळी देवाचे नाव येते. बापुंनी मृत्युसमयी "राम' म्हणणे त्यांना अडचणीचे ठरले आहे. म्हणूनच बापूंच्या मृत्यूला त्यांनी हत्या न म्हणता वध हा शब्द प्रचलित केला आहे. हेही खरेच की, बापूंना ते कायमच असूर मानत. हिंदू महासभा व कट्टर हिंदुत्ववादी मंडळींनी बापूंची त्यांच्या हयातीतच ब्रह्मासूर, महिषासूर, औरंगजेब अशी प्रतिमा रंगवली होती. त्यांच्यासाठी  बापू हे हिंदु धर्मावरचे  मोठे संकट होते. त्यामुळे मृत्युसमयी बापूंच्या तोंडी रामाचे नाव येणे, हे या विचारणीच्या प्रचाराच्या विरोधात होते. त्यातूनच बापूंनी राम म्हटले की नाही, म्हटले हा वाद उभा केला गेला.


बापू स्वत:ला सनातन हिंदू मानत. पण त्यांचा हिंदु धर्म सहिष्णु होता. तो इतर सर्व धर्मांचा आदर-सन्मान करणारा होता. बापूंच्या बालपणीची घरची व्यवस्था ही प्रणामी होती. घरी सर्व धर्माचे ग्रंथ पूजनीय होते. इतर धर्माचा अभ्यास करायचा, त्यांचा आदर करायचा असा त्यांचा स्थायीभाव होता. आजचा आपला हिंदू धर्म आणि या धर्माचे प्रतिनिधी म्हणवणारे लोक असहिष्णु बनले आहेत.  ते इतर धर्माचा द्वेष करणारे आहेत. अापलाच धर्म श्रेष्ठ अशी  स्पर्धा लागलीआहे. राम मंदिराचे निमित्त करून जनभावना चेतवल्या जात आहेत. मला विचाराल तर बापूंनी राम मंदिराचा वाद सर्वसंमतीच्या प्रयोगाने मार्गी लावला असता. बाबरी मशीद उध्वस्त करण्याच्या प्रवृत्तीचे त्यांनी कदापि समर्थन केले नसते.
गाय मला आईइतकीच प्रिय आहे, असे बापू नेहमी म्हणत. पण ज्यांना गाईमध्ये प्राणी, अन्न दिसते, त्यांचा मी द्वेष करणार नाही. गाईविषयीची माझी भावना मी इतर धर्मीयांवर थोपवणार नाही. मी त्यांना गोहत्या न करण्यासंदर्भात नक्की समजावेन, पण बळजबरी करणार नाही, असेही ते म्हणत. म्हणूनच काँग्रेसमध्ये जेव्हा गोहत्या बंदीचा प्रस्ताव आला, तेव्हा या बंदीला माझा पाठिंबा असणार नाही, असे बापूंनी निक्षून सांगितले होते.

 

बापूंनी वर्णव्यवस्थेचे कायम समर्थन केले. त्यावर टीकाही झाली.पण त्यांना वर्णव्यवस्थेची उतरंड उभी नव्हे तर आडवी अपेक्षित होती. तसेच ते समर्थन करत असलेली वर्णव्यस्था ही शोषणाच्या नव्हे तर समानतेच्या पायावर उभी होती. खरे पाहता बापूंच्या कल्पनेतली वर्णव्यस्था जन्मावर कधीही अाधारित नव्हती. ती व्यक्तीच्या कामाच्या वर्गवारीवर, वकुफावर उभी होती. बापूंच्या वर्ण व्यवस्थेच्या या उतरंडीला एक जिनासुद्धा होता. त्यांच्या चातुवर्ण्य व्यवस्थेच्या संकल्पनेत कोणाही व्यक्तीस स्थानांतर करण्याची संपूर्ण मुभा होती.  आज देशात “घरवापसी’ची टूम जोरात आहे. पण धर्मांतरे होऊ नयेत, असे बापू म्हणत. मात्र ज्यांना स्वेच्छेने करायचे आहे, त्यांनी जरुर करावे. मात्र त्यासाठी धडपड नको, असेही ते सांगत. बापूंचा तेव्हाचा रोख ख्रिश्चन पादरींवर होता. कारण त्यावेळी ख्रिश्चन मंडळी पद्धतशीरपणे धर्मांतरे घडवून आणत होती. स्वातंत्र्यलढ्याप्रसंगी हिंदुमहासभा तसेच कट्टर हिंदुत्ववादी यांचे संघटन बऱ्यापैकी मोठे होते. मात्र त्यांच्यापेक्षा हिंदुनिष्ठ जनतेचा पाठिंबा बापूंना अधिक लाभला. त्याला कारण ही मंडळी स्वातंत्र्यलढ्यात उतरली नव्हती. ती कायम इंग्रजासोबत होती. न पेक्षा बापूंच्या आंदोलनांवर त्यांचा बहिष्कार असे. बापूंचे आंदोलन फोडण्यासाठी ते आपली सगळी शक्ती खर्ची घालत होते. हल्ली केंद्र सरकार बापूंची महती सांगण्यासाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवत आहे. त्याचा गवगवा होत आहे. चांगलीच गोष्ट आहे. परंतु खरे तर त्यांनी बापूंंना अपेक्षित असलेल्या आत्मशुद्धीचा प्रचार करायला हवा हाता. ते अधिक सयुक्तिक अधिक प्रभावी आणि अधिक परिवर्तनशील ठरले असते. आपण एक गोष्ट नेहमीच विसरतो. बापूंची महानता, त्यांचे मोठेपण  त्यांच्या साधेपणात होते. त्याच्या छोट्या-छोट्या प्रयोगामागेदेखील गहन अर्थ दडलेला असे. त्यात अध्यात्मिक दृष्टिकोन असे. “स्वच्छ भारता’च्या बहाण्याने बापूंच्या नावाने सध्या जो जाहिरातींचा मारा केला जातोय, त्यातून केंद्र सरकारच्या योजनांची प्रसिद्धी अधिक होताना दिसते आहे. बापू त्यात केवळ प्रतिमारुपात आहेत.  विद्यमान सरकार ग्रामराज्याचीआपल्याला स्वप्ने दाखवते आहे.


पण, प्रत्यक्षात भारत सरकारला भारतीय खेड्यांची लाज वाटते आहे. सरकारला बैलगाडीचीसुद्धा लाज वाटते आहे. बुलेट ट्रेन, मंगळयान अशी उडती भाषा त्यांच्या तोंडी आहे. ‌खेड्यांतल्या पारंपरिक व्यवस्थेची लाज येते म्हणून खेडी नष्टच करुन टाका, असे धाेरण आखले जात आहे. म्हणूनच हजारो एकर सुपीक जमीन  उद्योग आणि तथाकथित विकास कामांसाठी बळाने काढून घेतली जात आहे. खेडे ही जणू सार्वजनिक मालमत्ता आहे, तिच्यावर वाटेल तेव्हा डल्ला मारावा,अशी सत्ताधारी मंडळीची धारणा बनली आहे. बापूंनी खेड्यांशिवाय देशाचा विकास नाही, असे म्हटले होते. त्याच विचारांतून त्यांनी पूर्ण स्वराज ही संकल्पना मांडली होती. त्यात ग्रामस्वराजला महत्व अनन्यासाधारण महत्व दिले होते. गाव स्वावलंबी म्हणजे स्वयंसंचलित होण्याला प्राधान्य दिले होते.  भारताच्या प्रजातंत्राचा महत्वाचा अंश म्हणजे, गाव पंचायत असे ते ठामपणे सांगत होते.  बापूंनी त्यांच्या हयातीत धर्म आणि राजकारणाची योग्य सांगड घातली. पण, त्यांना धर्मधिष्ठित राज्य अभिप्रेत नव्हते. आजचे सत्ताधारी निवडणुकांतील विजयासाठी धर्माला वेठीस धरत आहेत. मानसरोवर यात्रा अन् मंदिर दर्शनाला जावून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आहेत. पण, त्याचा काँग्रेसला काही एक उपयोग होणार नाही. कारण उग्र हिंदुत्वावादाला सौम्य हिंदुत्ववाद उत्तर हाेऊ शकत नाही. उग्र हिंदुत्ववादाला धर्मनिरपेक्षवाद हाच एकमेव पर्याय आहे. मी पण हिंदु... ही काँग्रेसची निती निवडणुकांमध्ये फळाला येण्याची शक्यता नाही. पण, याचा अर्थ असा नाही की, आपण आपला धर्म सोडवा. धर्म प्रत्येकाची खाजगी बाब आहे. त्याने ती खासगी स्वरुपात पाळावी. धर्माचे सार्वजनिकीकरण झाल्यास धर्माची पिछेहाटच होत राहणार आहे. हेसुद्धा एक आश्चर्यच आहे. बापूंच्या दीडशेव्या जयंती निमित्ताने सत्ताधारी मंडळींचे त्यांच्याविषयीचे प्रेम उफाळून आले आहे. सरकार हे समाजाचे प्रतिबिंब असते. त्यामुळे आपण बापुंच्या लायक राहिलो आहोत काय, हे सरकारने तपासून पाहणे या घटकेला महत्वाचे आहे. म्हणूनच सत्ताधारींनी स्वत:ची पात्रता आधी सिद्ध करावी.त्यानंतरच ते गांधीचे लायक वारसदार म्हणून हक्क सांगू शकतात. स्वातंत्र्यलढ्यात भारतीय जनतेचा पाठिंबा मिळावा म्हणून बापूंनी धर्म, राम यांचा प्रतिकात्मक वापर केला, हे सत्य आहेच. पण, त्यांनी राजकारणाला धर्माचे अधिष्ठान दिल्यामुळे “खिलाफत ‘सारखे आंदोलन उभे राहिले. गांधींनी स्वातंत्र्य लढ्यात धर्म, राम जरुर आणला. पण त्यामागे सुनिश्चित व प्रखर असा विचार होता. अध्यात्मिकता होती.  दंभ नव्हता. आज वापरीन, उद्या फेकून देईन असे काही नव्हते.  सर्वात महत्वाचे म्हणजे ताे जनतेची दिशाभूल करणारा ‘जुमला’ नव्हता !


मुखी ‘हे राम’ ही काल्पनिक बाब नव्हे...
मृत्युसमयी बापूंच्या तोंडी काय उद्गार होते, त्यापेक्षा त्यांचे सारे जीवन राममय होते, हे सत्य अधिक महत्वाचे आहे. आभा काकी यांच्या मांडीवर बापूंनी अखेरचा श्वास घेतला. बालपणी मला आभा काकींचा सहवास लाभला. बापूंना जेव्हा गोळी लागली, ते खाली कोसळले, तेव्हा आभा काकीने बापुंचे शीर कुशीत घेतले.  तेव्हाही बापूंचे राम... राम... उच्चारणे सुरुच होते.   राम उच्चारण संपले, तेव्हा बापुंनी अखेरचा श्वास घेतला, असे आम्ही मानले...ही आठवण मला खुद्द आभा काकीनेच सांगितली आहे. बापूंनी “राम’म्हटले की “हे राम’ म्हटले हे खरे तर संदिग्ध आहे. बापू गोळी लागून जिथे कोसळले होते, त्यांचे रक्त सांडले हाेते,  तेथे स्मृतिस्तंभ बसवायचे  ठरले. त्यावर बापुंचे शेवटचे शब्द, तारीख आणि वेळ लिहावी, असा निर्णय झाला. तेव्हा प्यारेलाल नय्यरजी यांनी असा मुद्दा मांडला की राम... एेवजी हे राम... वाचायला अधिक सुलभ वाटते. हा निर्णय बापुंच्या हत्येच्या बारा तासाच्या आत म्हणजे, त्यांची अंत्येष्ठी होण्यापूर्वी घेतला गेला. त्यामुळे “हे राम ‘ही ठरवून अाणि सर्वांच्या सहमतीने केलेली बाब नव्हती. तसेच ती निव्वळ काल्पनिक बाबसुद्धा नव्हती.

 

शब्दांकन: अशोक अडसूळ
tushar@mahatma.org.in

 

 

बातम्या आणखी आहेत...