आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाईला भविष्याचा सल्ला देताना वर्तमानाचीही जाणीव करून द्यावी; गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांचे प्रतिपादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आपण नेहमी तरुण म्हणजे देशाचे भविष्य आहे असेच म्हणतो आणि तरुणांना भविष्यासाठी जगण्याचा सल्ला देत असतो. वास्तविकता ही आहे की तरुणाई देशाचं वर्तमान आहे, त्यांना वर्तमानाची जाणीव करून द्यायला हवी. ती जाणीव झाल्यास त्यांना प्रश्न समजायला लागतील. ते सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील, असे प्रतिपादन महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी केले. 


गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे कस्तुरबा सभागृहात बुधवारी नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पच्या उद‌्घाटन झाले. या वेळी बोलत होते. व्यासपीठावर फाउंडेशनचे विश्वस्त आणि सेवादास दलीचंद जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या विश्वस्त ज्योती जैन, अंबिका अथांग जैनही उपस्थित होत्या. गांधी रिसर्च फाउंडेशनचे डीन डॉ. जॉन चेल्लादुरई यांनी प्रास्ताविक केले. अश्विन झाला यांनी सूत्रसंचालन तर भुजंगराव बोबडे यांनी आभार मानले.

 

गांधी म्हणाले, आजच्या नेत्यांमध्ये 'मी पणा' खूप मोठ्या प्रमाणात वाढताेय 
नेतृत्व गुण :
गांधी यांनी लिडर आणि लीडरशिप यातील फरक स्पष्ट केला. नेतृत्व आणि नेतागिरीतला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आज अनेक जण नेतागिरी करीत आहेत. नेतृत्व करत नाहीत. नेतृत्व करणारे आपले काम करत असतात. आजच्या नेत्यांमध्ये 'मी पणा' खूप मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो. ही वास्तविकता आहे, ती नाकारता येणार नाही. 


कार्य प्रेरणा : लिडर असे बना ज्यांना पाहुनच प्रेरणा मिळायला हवी. बापूंचे जीवन प्रेरणादायीच होते. नेतृत्वासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, याचा शोध बापूंच्या जीवनापाशी येऊन थांबतो. त्यांच्या जीवनातून आपल्याला काम करण्याची प्रेरणा मिळते. ते जीवनातील प्रत्येक क्षण चांगला करण्यात व्यस्त असायचे. यासाठी ते स्वत: प्रयत्न करत असत. 


राष्ट्रभक्ती : भविष्याचा वेध घेत असताना वर्तमान हातातून निसटून जातो. म्हणून तरुणांनी वर्तमानात जगले पाहिजे. आपण एकमेकांचे सुती हार घालून स्वागत केले, हा सुतीहार म्हणजे राष्ट्रबंधन व्हायला हवे. आपल्यातील भाषा, जात, प्रांत यांचे वाद मिटवायचे असतील तर खादीचा स्वीकार करायला हवा म्हणजे आपण सर्व एकाच पातळीवर येऊ, असेही ते म्हणाले. 


शेतकरी आणि युवक संकटात : डाॅ. अय्यंगार 
अध्यक्ष डॉ. सुदर्शन अय्यंगार म्हणाले, आजचा शेतकरी आणि युवक संकटात आहे. राजकारणात भ्रष्टाचार व कुटीलता वाढली आहे. यावर महात्मा गांधींचे तत्वज्ञान महत्त्वाचे ठरते. परंतु आपण ७० वर्षांत गांधीजींचे ऐकले नाही. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांचे संपूर्ण जीवन शेतकरीमय होते, असा गौरवपूर्ण उल्लेख करून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या त्यांच्या कार्याला अधोरेखित केले. या युवा कॅम्पमध्ये कस्तुरबा कोण होत्या. याविषयी उपस्थितांना मोहन कस्तुर ते बा-बापू असा आश्रम जीवनातील त्यांचा प्रवास उलगडून सांगितला. 

बातम्या आणखी आहेत...