Crime / 25 लाखांची फसवणूक; ‘तुझ्यात जीव रंगला’मधील अभिनेता मिलिंद दास्ताने यास अटक

‘पीएनजी ब्रदर्स’ या नामांकित सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ

प्रतिनिधी

Jun 19,2019 10:03:00 AM IST

पुणे - पुणे शहरातील औंध येथील ‘पीएनजी ब्रदर्स’ या नामांकित सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करत तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या “तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता मिलिंद दास्ताने व त्याच्या पत्नीस चतुःशृंगी पोलिसांनी मंगळवारी सकाळी पुण्यातील घरून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मागील आठवड्यात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.


दास्ताने व त्यांच्या पत्नीस न्यायालयात हजर करण्यात आले असता २१ जूनपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.अभिनेता मिलिंद गणेश दास्ताने, त्याची पत्नी सायली मिलिंद दास्ताने उर्फ सायली बालाजी पिसे (दोघेही रा. त्रिमूर्ती सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी “पीएनजी ब्रदर्स’च्या अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ (वय ३४, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून दास्ताने दांपत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.


त्यानंतर पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी या घटनेचा गांभीर्याने तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी मिलिंद दास्ताने यास अटक केल्याची माहिती चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली आहे.


‘तुझ्यात जीव रंगला’मधील शिक्षणमंत्री प्रतापराव
दास्ताने याने औंध येथील आयटीआय रस्त्यावरील “पीएनजी ब्रदर्स’ सराफी पेढीमधील कर्मचाऱ्याशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तेथून वारंवार सोने-चांदीचे दागिने, बिस्किटे व हिरे खरेदी केले होते. त्यानंतर दास्ताने याने खरेदी केलेल्या दागिन्यांची काही प्रमाणात रक्कम दिली होती. मात्र, उर्वरित रक्कम व त्यावरील व्याज देण्यास दास्ताने हा वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करत होता. वारंवार मागणी करूनही दास्ताने बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याने “पीएनजी ब्रदर्स’च्या अक्षय गाडगीळ यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

X
COMMENT