Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Twin newborn daughter murdered case ini Beed District

धक्कादायक : जुळ्या नवजात मुलींचा खून? स्तनपान बंद करून जुळ्या बालिकांचा घातपात केल्याचा संशय; महिन्यानंतर मृतदेह बाहेर काढले

प्रतिनिधी | Update - Apr 14, 2019, 09:12 AM IST

आरोग्य विभागाच्या पत्रानंतर पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद

 • Twin newborn daughter murdered case ini Beed District

  बीड - स्त्री भ्रूणहत्येने देशपातळीवर आधीच बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यात ‘मुलगी नको’ ही मानसिकता कायम आहे. दोन मुलींनंतर तिसरी मुलगी मृत जन्मली अन् चौथ्या वेळी पुन्हा जुळ्या मुली झाल्याने या नवजात बालिकांचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिस चौकशी सुरू झाली आहे. पोलिस व आरोग्य विभागाच्या पथकाने मुलींचे पुरलेले मृतदेह महिनाभरानंतर बाहेर काढून मृत्यूच्या कारणांचा शोध सुरू केला.


  तालुक्यातील एका महिलेला आधीच्या दोन मुली आहेत. तिसऱ्या वेळी गर्भधारणा झाल्यानंतर ३१ जुलै २०१७ रोजी महिला घरीच प्रसूत झाली. तिने मुलीस जन्म दिला मात्र मुलगी जन्मतःच मरण पावल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चौथ्यांदा गर्भवती असलेल्या या महिलेने २५ फेब्रुवारी २०१९ रोजी जिल्हा रुग्णालयात जुळ्या मुलींना जन्म दिला. २ ते सव्वादोन किलो वजनाच्या मुली होत्या. ३ मार्चला महिलेला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ९ मार्चला अंगणवाडी कार्यकर्तीने मुलींचे वजन केले. ते १ किलो ६०० ग्रॅम भरले. कार्यकर्तीने मुलींना रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, १३ मार्च २०१९ रोजी या दोन्ही मुलींचा एकाच वेळी मृत्यू झाला. कुटुंबीयांनी त्यांचा दफनविधीही केला. ही घटना आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली. प्रकरण जिल्हा बालमृत्यू समितीसमोर आले. मात्र, तज्ज्ञांना मृत्यूचे ठोस कारण सापडले नाही. स्तनपान बंद करून नंतर मुलींचा घातपात केल्याचा संशय समितीला आला. मात्र, याबाबत पुरावे नसल्याने समितीने गेवराईच्या पोलिस उपअधीक्षकांना पत्र पाठवून सखोल चौकशी करण्यास सांगितले.

  प्रथमदर्शनी तथ्य
  आरोग्य विभागाच्या पत्रानंतर पोलिस चौकशी झाली प्राथमिक चौकशीत प्रकरण संशयास्पद वाटल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू करण्यात आला आहे
  - डॉ. अर्जुन भोसले, पोलिस उपअधीक्षक, गेवराई

  मृत्यूचे ठोस कारण नाही
  मुलींच्या मृत्यूचे कोणतेही कारण नाही. आमच्या पथकाने या ठिकाणी भेट देत चौकशी केली असता अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या. त्यामुळे पोलिसांना कळवले.
  - डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. बीड

  दोन्ही मुलींचा एकाच दिवशी मृत्यू संंशयास्पद
  जुळ्या मुलींच्या अचानक झालेल्या मृत्यूबाबत संशय असल्यानेच पोलिस यंत्रणेमार्फत प्रकरणाची चौकशी करणे योग्य राहील असे समितीला वाटले. त्यामुळे हे प्रकरण पोलिस चौकशीसाठी सोपवले आहे.
  - अमोल येडगे, सीईओ, झेडपी, बीड तथा अध्यक्ष बालमृत्यू समिती

  हे प्रश्न अजूनही अनुत्तरित...

  > तिसरे बाळंतपण आरोग्य विभागापासून का लपवले गेले ?
  > जन्मानंतर दोन किलो वजन असलेल्या दोन्ही मुलींचे वजन एकदाच कसे कमी होते ?
  > दोन्ही मुलींना सोबतच एकाच वेळी ताप कसा येतो ?
  > अंगणवाडी कार्यकर्तीने सल्ला देऊनही त्यांना रुग्णालयात का नेले गेले नाही ?
  > दोन्ही मुलींचा एकाच वेळी, एकाच रात्री मृत्यू कसा झाला?

  पुरलेले मृतदेह काढले बाहेर
  मुलींच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिस व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी मृतदेह बाहेर काढले. पुन्हा शवविच्छेदन करून, इतर तपासण्या करून मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Trending