आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा> दूतावासातील कर्मचारी-अधिकारी सुखरूप
> हा तर आमच्याविरुद्धचा कट; इम्रान यांचा आरोप
कराची/पेशावर/इस्लामाबाद पाकिस्तानमध्ये कराची येथील चीनच्या वाणिज्य दूतावासावर शुक्रवारी सकाळी शस्त्रास्त्रांनी सज्ज तीन आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला केला. कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या क्लिफ्टन भागात झालेला हा हल्ला सुरक्षा दलांनी उधळून लावला. तिन्ही दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलिस कर्मचारी आणि दोन नागरिकही ठार झाले. चीनचा एक सुरक्षा जवान जखमी झाला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गँग शुआंग यांनी म्हटले आहे की, हल्लेखोर दूतावासात घुसू शकले नाहीत. आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. चीनने पाकिस्तानला आपल्या दूतावासांची आणि चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पाची (सीपीईपी)सुरक्षा व्यवस्था वाढवावी, असे सांगितले आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) एका ट्विटमध्ये हल्लेखोरांचे छायाचित्र दाखवत या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
बीएलएने म्हटले आहे की, आम्ही बलोचच्या जमिनीवर चिनी लष्कराच्या कारवाया सहन करणार नाही. पंतप्रधान इम्रान खान यांनी,‘हा हल्ला म्हणजे पाकिस्तान आणि चीन यांच्यातील आर्थिक आणि लष्करी सहकार्य यांच्याविरोधातील कट’, अशी टिप्पणी केली आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही या घटनेवर तीव्र टीका केली आहे. पाकिस्तानमधील माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे की, तीन हल्लेखोरांनी चीनच्या वाणिज्य दूतावासाच्या तपासणी नाक्यांवर गोळीबार केला आणि हातबॉम्ब फेकले तसेच वाणिज्य दूतावासात घुसण्याचाही प्रयत्न केला. कराचीचे पोलिस प्रमुख आमिर शेख यांनी म्हटले आहे की, दहशतवाद्यांनी आपले वाहन थोड्या अंतरावरच पार्क केले आणि नंतर ते दूतावासाच्या दिशेने निघाले.
ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या जवळून ९ हातबॉम्ब, कलान्शिकोव्ह बुलेट्स, मॅगझिन्स आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांजवळ अन्नपदार्थ आणि औषधीही मिळाली आहेत. चीनच्या वाणिज्य दूतावासाजवळच पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांचे निवासस्थान बिलावल हाऊसही आहे. या भागात शाळा आणि
हॉटेलही आहेत.
खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या बाजारात स्फोट; ३० जण ठार, ४० लोक झाले जखमी
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटात ३० जण ठार झाले आणि ४० लोक जखमी झाले. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. हा स्फोट ओरकझई आदिवासी जिल्ह्याच्या कलाया बाजारात इमामवाड्याजवळ झाला. माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे की, दूरनियंत्रक बॉम्ब एका दुचाकीशी जोडलेला होता. बॉम्बस्फोट झाला तेव्हा लोक बाजारात होते. सुरक्षा दलांच्या सूत्रांनी सांगितले की, या भागात बचाव आणि मदत मोहीम सुरू होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.