corruption / अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासह दोघांना लाच घेताना अटक 

अाराेपीला घेऊन जाताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी.  अाराेपीला घेऊन जाताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी. 

अँन्टी करप्शन एज्युकेशन लोनची फाइल पुढे सरकवण्यासाठी मागितली होती सात हजारांची लाच 

​​​​​​​

Aug 22,2019 11:54:00 AM IST

अकोला : उच्च शिक्षणासाठी कर्ज घेणाऱ्या विद्यार्थांच्या फाइलवर सही करण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी करून, त्यापैकी चार हजाराची लाच घेताना मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी कार्यालयातच करण्यात आली.

संजय बळीराम पहुरकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संजय पहुरकर मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळामध्ये जिल्हा व्यवस्थापक पदावर आहे. तर दुसरा आरोपी शेख सादिक शेख गुलाम हा याच कार्यालयात कंत्राटी कर्मचारी आहे. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थांना शिक्षणासाठी महामंडळातर्फे कर्जपुरवठा करण्यात येत असल्याने असंख्य विद्यार्थी या कार्यालयात येतात. या विद्यार्थांच्या अगतिकतेचा फायदा येथील यंत्रणा घेत असल्याचे बुधवारच्या कारवाईवरून समोर आले आहे. पातूर येथील मोमीनपुरा रहिवासी विद्यार्थी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. शिक्षणाचा खर्च झेपत नसल्याने तो मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळामध्ये गेला. तेथे त्याने जिल्हा व्यवस्थापक संजय पहुरकर यांची भेट घेतली व सर्व कागदपत्रे जोडून प्रस्ताव ठेवला. मात्र पहुरकर याने सदर विद्यार्थ्याला सात हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले तर तुझी फाइल मंजुरीसाठी मुंबईला पाठवतो, अन्यथा नाही, असे सांगितले. आपल्याला नियमानुसारच काम करायचे व लाच द्यायची इच्छा नसल्याने विद्यार्थ्याने एसीबीचे कार्यालय गाठले व तक्रार दिली. त्यानुसार १३ ऑगस्ट रोजी एसीबीने पंचासमक्ष पडताळणी केली. त्यात जिल्हा व्यवस्थापकाने लाचेची मागणी केल्याचे समोर आल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी एसीबीने महामंडळाच्या कार्यालयातच सापळा रचला व पंचासमक्ष संजय पहुरकर याने चार हजार रुपयांची लाच स्वीकारली व ती शेख सादीक शेख गुलाम यांच्याकडे सुपूर्द करताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक ईश्वर चव्हाण, पोहवा.गजानन दामोदर, नापोशि अन्वर खान यांनी केली. या कारवाईमुळे अल्पसंख्याक विकास महामंडळातील लाचखोरी उघड झाली आहे. चार हजार रुपये घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडले फाइल अकोल्यातच ठेवून सांगायचा मुंबईला पाठवली
२०१४पासून महामंडळात बचत गटाचे फाईल पेंडिग ठेवल्याचा आरोप जिल्हा व्यवस्थापक संजय पहुरकर याच्यावर करण्यात आला होता. मुंबई ऑफिसला फाइल पाठवल्याचे सांगून लाभार्थींची दिशाभूल करून , खोटे बोलून फसवणूक करीत असल्याचे गंभीर आरोप केले होते. ही तक्रार १६ मार्च २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. तसेच कार्यालयात दलाल बसवून दलालीचा आरोप पहुरकर याच्यावर होता. मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

मुख्यमंत्र्यापर्यंत केल्या होत्या मॅनेजरच्या तक्रारी
संजय पहुरकरच्या तक्रारी मुख्यमंत्री, सचिव, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष यांच्यापर्यंत करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांना केलेल्या तक्रारीत मौलाना आझाद महामंडळाच्या कार्यालयात काळाबाजार चालत असल्याचा आरोप शेख रिजवान गुलाम नबी यांनी केला होता. एमडीकडे केलेल्या तक्रारीत २०१४पासून पहुरकर कार्यरत असून, माहिती अधिकारातील माहिती वेळेत न देता नागरिकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचे नमूद केले होते. तसेच १७ मार्च २०१८ रोजी पहुरकर याची तक्रार गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडेही केली होती.

X
अाराेपीला घेऊन जाताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी. अाराेपीला घेऊन जाताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी.