आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना- सोमवारी बुलडाणा अर्बन बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करीत तीन लाखांची रोकड लुटारुंनी पळवून नेली. यात बॅँक कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवत दोघांनी त्यांना ओव्हरटेक करीत दुचाकी आडवी लावली तर पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मिरचीपूडचा स्प्रे तोंडावर मारून कर्मचाऱ्यांकडची रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी त्यांनी बॅग सोडली नाही तेव्हा आरोपींनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करीत अवघ्या दीड मिनिटात तीन लाखांची बॅग घेऊन पळ काढला. लुटारू एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत, मात्र त्यांनी तोंडाला रुमाल बांधला आहे शिवाय गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवर नंबर नसल्याचे दिसून आले आहे.
शहरातील बुलडाणा अर्बन बॅँकेतील गणेश प्रल्हाद कांगणे, अरविंद नागोराव देशमुख (जालना) हे दोघेजण बँकेच्या शहरातील शाखेची रक्कम घेऊन नवीन मोंढा शाखेत भरणा करण्यासाठी बुलेटवरून निघाले होते. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ते नवीन मोंढ्याच्या क्रमांक दोनच्या गेटमधून आत गेले. त्याचवेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना ओव्हरटेक करीत त्यांची गाडी थांबवली. तर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अन्य दोघांनी त्यांच्या तोंडावर मिरची स्प्रे मारला. यानंतर त्यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते बॅग देण्यास विरोध करीत असल्यामुळे अन्य दोघांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात कांगणे आणि देशमुख हे दोघे बँक कर्मचारी गंभीर जखमी झाले तर अवघ्या दीड मिनिटात आरोपी रोख रक्कम असलेली बॅग घेऊन पसार झाले. यात लुटारुंच्या दुचाकी वेगवेगळ्या दिशेला गेल्या.
या प्रकारानंतर व्यापारी अजय कुमार लोहिया यांनी येऊन दुचाकीवरून त्यांनी गंभीर जखमी झालेले कागणे आणि देशमुख यांना आपल्या दुकानात नेले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी शहरातील खासगी रुगणालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी गणेश कांगणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सिरसाठ हे करीत आहेत. लुटमारीच्या प्रकरणानंतर स्थानिक गुन्हे शाखा, विशेष कृती दल, चंदनझिरा पोलिस ठाण्यांसह त्यांचे डिबी पथक असे सर्वच कामाला लागले आहे. परंतु, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी : पैसे हिसकावण्यासाठी हल्लेखोरांनी अगोदर मिरचीची पूड फेकून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु, बॅग देत नसल्यामुळे दांडा काढून दोघांनाही मारहाण केली. यात दोन्ही कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. यात देशमुख यांना १५ टाके पडले आहेत तर कांगणे यांना ९ टाके पडले आहेत.
दीड मिनिटात घडला प्रकार
सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या व्हिडीओनुसार लुटारू सकाळी १० वाजून २२ मिनिटे आणि २३ सेकंदाला बाजार समितीच्या गेटमधून आत आले तर १० वाजून २३ मिनिटे आणि ५४ सेकंदात बाहेर पडले. या अवघ्या दीड मिनिटांच्या कालावधीत बँक कर्मचाऱ्यांची बुलेट अडवून,त्यांच्यावर मिरची स्प्रे फवारली व लाकडी दांडक्याने मारहाण करीत लुटारुंनी पळ काढला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.