आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती वादातून कडाक्याचे भांडण; दोन भावांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- घरगुती वादातून कडाक्याचे भांडण झाल्यानंतर थोरला भाऊ रेल्वेखाली जीव देण्यासाठी गेला. त्याला रोखण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाला रेल्वेचा धक्का लागला. यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील रेल्वे गेट क्र. ५६ जवळ घडली. जयेश मिलिंद बागुल (२५) आणि आकाश मिलिंद बागुल (२०, दोघे रा. राजनगर, मुकुंदनगर, मुकुंदवाडी) अशी दोघांची नावे आहेत. 


मुकुंदनगरातील जयेश आणि आकाश हे दोघेही आई-वडिलांसोबत राजनगरात राहतात. जयेश विवाहित आहे. त्याची पत्नी नऊ महिन्यांच्या चिमुकल्यासह माहेरी निघून गेलेली आहे. जयेश बिगारी काम करतो. तर आकाश रिक्षा चालक आहे. जयेशच्या पत्नीने त्याच्याविरुध्द महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दाखल केलेली आहे. पत्नी नांदत नसल्याने जयेश काही दिवसांपासून तणावात होता. त्यामुळे त्याचे दारुचे व्यसन आणखीनच वाढले होते. रविवारी रात्री आकाश व जयेश हे दोघेही घरात असताना त्यांच्या घरगुती कारणातून वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर घरापासून दोनशे फुटावर असलेल्या रेल्वे रुळाच्या दिशेने जयेश आत्महत्येसाठी निघून गेला. ते लक्षात येताच आकाशने रेल्वे रुळाच्या दिशेने धाव घेतली. पण काही सेकंदांचा उशिर झाला. जालन्याहून औरंगाबादच्या दिशेने जात असलेल्या रेल्वेखाली जयेशने उडी घेतली. आणि आकाशला रेल्वेचा धक्का बसला. त्याचाही जागीच मृत्यू झाला. एका नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती कळवली. पुढील तपास सहायक फौजदार साहेबराव गवारे आणि आर. डी. पाडळे करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...