आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोऱ्या करून करोडपती झालेल्या दोन भावांना दिल्लीत अटक; एक कोटी रुपयांचेे सोने जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली : चोऱ्या करून करोडपती झालेल्या दोन भावांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. चोरीच्या पैशातूनच त्यांनी दिल्लीच्या संत कबीरनगर भागात ४७ लाख आणि यमुना विहारमधून ६५ लाख रुपयांची दोन घरेही खरेदी केली आहेत. त्यांच्या ताब्यातून सव्वादोन किलो सोनेही जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत जवळपास एक कोटी रुपये आहेे. त्याशिवाय २७ लाख रुपये रोख, ५३ मास्टर की आणि लाखो रुपये किमतीचे इतर साहित्यही मिळाले आहे. दोन्ही भावांच्या अटकेमुळे पोलिसांनी चोरीच्या ६४ घटना उघडकीस आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

दिल्ली पूर्व जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त जसमित सिंह यांनी सांगितले की, काही महिन्यांत दिवसाढवळ्या चोरी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. विशेष कर्मचाऱ्यांचा चमू प्रदीर्घ काळापासून चोरांची माहिती एकत्र करत होता. अनेक ठिकाणाहून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही घेतले. त्यात आरोपी दिसले, पण ओळख पटू शकली नव्हती. शुक्रवारी पोलिसांना एक विशेष माहिती मिळाली. पोलिसांच्या खबऱ्याने सांगितले की, या घटनांत सहभागी असलेले आरोपी कडकडडुमा न्यायालयाजवळ येतील. त्यानंतर ट्रॅप लावून दोन भावांना पकडण्यात आले. अय्युब (४०) आणि कय्युम (३०) अशी त्यांची नावे असून ते दोघेही नंदनगरी येथील रहिवासी आहेत. कय्युमवर १३ गुन्हे दाखल आहेत. अय्युबलाही एकदा अटक झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, दोघांनी चोरीच्या पैशांतून घराच्या सजावटीवर प्रचंड पैसा खर्च केला होता.

एक भाऊ चोरी करायचा, दुसरा बाहेर पहारा द्यायचा

आरोपींनी चौकशीत सांगितले की, ते दोघेही यमुना नदीच्या पलीकडील भागातच चोरी करत होते. कय्युम चोरी करण्यासाठी घरात जात असे, तर अय्युब ज्या घरात चोरी करायची त्या घरापासून थोड्या अंतरावर उभा राहून पहारा देत असे. त्याआधी ते शेजाऱ्यांशी चर्चा करून रिकाम्या घरांची माहिती घेत अशत. चोरीसाठी ते मास्टर कीचा उपयोग करत होते. २०१५ मध्ये पहिल्यांदा कय्युमला अटक झाली होती. तो एका मुलीच्या घरात घुसला होता. तिने आरडाओरड सुरू केल्याने तो घटनास्थळीच पकडला गेला होता.
 

बातम्या आणखी आहेत...