आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूर नगरपालिकेच्या दोन काँग्रेस नगरसेवकांचे पद रद्द; जात प्रमाणपत्र अमान्य झाल्याने निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी काँग्रेस पक्षाच्या दोन नगरसेवकांचे पद रद्द केले आहे. निकालानंतर दोन्ही उमेदवार व काँग्रेस पक्षाची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या नवापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा 'अ' मधील ओबीसी महिला पदासाठी सारिका मनिषकुमार पाटील यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्या काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या होत्या, तर दुसरे नगरसेवक प्रभाग क्रमांक सात 'अ' मध्ये ओबीसी पुरूष म्हणून दर्शन प्रताप पाटील हे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. दोन्ही नगरसेवकांनी ओबीसी आरक्षणातून निवडणूक लढवली होती. परंतु नगरसेविका सारिका पाटील यांच्यावर भाजपाच्या पराभूत उमेदवार नैन्सी राकेश मिस्त्री आणि नगरसेवक दर्शन प्रताप पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पराभूत उमेदवार अतुल तांबोळी यांनी खोटे जातप्रमाण दाखवून ओबीसी आरक्षणात निवडणूक लढवली असल्याने हरकत घेतली होती. त्यानुसार दोन्ही पराभूत उमेदवार यांनी दाद मागण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी नंदुरबार विभागात तक्रार केली होती.

 

त्यानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी नंदुरबार विभागाने सारिका पाटील व दर्शन पाटील यांच्या माळी आणि इतर मागासवर्ग जातीय दावा अमान्य करण्यात आले आहे. दोन्ही माळी व इतर मागास प्रवर्गात येत नसल्याचे घोषित करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यावर नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी नगरसेवक पद रिक्त झाल्याचे जाहीर केले आहे.

 

नवापूर नगरपालिकेतील दहा प्रभागातील नगरसेवक संख्या

काँग्रेस- 14
राष्ट्रवादी काँग्रेस- 04 
शिवसेना- 01
अपक्ष- 01
एकूण नगरसेवक 20

 

काँग्रेस पक्षाच्या दोन नगरसेवकांचे पद रद्द झाल्याने काँग्रेस नगरसेवकांची संख्या 12 झाली आहे. संख्याबळ जास्त असल्याने सत्ताधारी काँग्रेस पक्षाला धोका नाही.

 

काय म्हटले आहे आदेशात

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,1965 च्या कलम 16 नुसार व कलम 44 मधील प्राप्त अधिकारानुसार मी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी जिल्हाधिकारी नंदुरबार सौ.सारिका मनिषकुमार व दर्शन प्रताप पाटील सदस्य, नवापूर नगरपरिषद प्रभाग क्रमांक सहा 'अ' व सात 'अ' हे नागरिकांच्या मागास प्रवर्ग या राखीव जागेवरील त्यांची नगरपरिषद सदस्य म्हणून निवड केली जाईल. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार यांच्या कडील दिनांक 1 नोव्हेंबर 2018 रोजीचे आदेशानुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2018 पासून भुतलक्षी प्रभावाने अनर्ह ठरविण्यात येत असून सदरची दोन्ही जागा रिक्त झाल्याचे घोषित करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...