आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावः बनावट वेबसाइटवरून 3 लाखांची फसवणूक करणाऱ्या 2 भामट्यांना पाटण्यात अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - संगणक क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतल्यानंतर 'पतंजली आयुर्वेद' नावाने बनावट वेबसाइट तयार करून बिहारच्या दोघांनी भुसावळातील एका व्यापाऱ्यास डेरी प्राॅडक्टची डिस्ट्रिब्युटरशीप देण्याच्या नावाने ३ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या दोन्ही उच्चशिक्षित तसेच राजकीय पाठबळ असलेल्या भामट्यांना सोमवारी सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने पाटणा येथून (बिहार) अटक केली. बुधवारी त्यांना जळगावात आणले होते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक जमावाने पोलिसांना घेरले होते.


सुमनकुमार त्रिलोकनाथ चौहान (वय ३०, रा. जनतापथ बिहारी भवन, चांदमारी रोड, कंकरबाग, पाटणा) व अजयकुमार उपेंद्र सिंग (वय ३१, रा. साकेतपुरी, रोड नं १, फोर्ड हॉस्पिटल बायपास रोड, पाटणा) अशी अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत. दोघेही उच्चशिक्षित असून, त्याचे पाटणा येथील राजकीय पक्षांशीही संबंध आहेत. या दोघांनी सागर राजेश बत्रा (वय २२, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) या तरुण व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे.


सुमनकुमार व अजयकुमार यांनी एमसीए (मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन) शिक्षण घेतले आहे. संगणक क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पटणा येथे नारायणी ई-सर्व्हिसेस नावाने सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी बनावट वेबसाइट तयार करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यास सुरुवात केली होती. दोघांनी गतवर्षी बत्रा यांना 'पतंंजली आयुर्वेद' या बनावट वेबसाइटवरून ०१३३४ २६५५३७० या क्रमांकावरून फोन केला. डेअरी प्राॅडक्टची डिस्ट्रिब्युटरशीप देण्याची बाेलणी केली. बत्रा यांच्याकडून ३ लाख ३२ हजार रुपये पंजाब नॅशनल बँकेच्या अकाउंटमध्ये मागवून घतले. यानंतर दोघे जण बत्रांच्या संपर्कातून बाहेर पडले होते.


पैसे भरून बरेच दिवस झाले; परंतु बत्रा यांना डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पुन्हा दोघांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बत्रा यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.


संशयितांना राजकीय पाठबळ, जळगाव पोलिसांना घातला घेराव 
जळगाव पोलिसांनी पाटणा येथून दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, अजयकुमार व सुमनकुमार या दोघा संशयितांना राजकीय पाठबळ आहे. पाटणाच्या स्थानिक राजकारण्यांसोबत त्यांचे संबंध आहेत. दोघांना ताब्यात घेतल्याची बातमी पाटणा शहरात पसरल्यानंतर जळगाव पोलिसांना विरोध करण्यासाठी जमावाने घेरले होते. ऐनवेळी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जळगाव पोलिसांनी स्वत:चा बचाव करीत दोन्ही संशयितांना तेथून बाहेर काढून जळगावात आणले. चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात एका अट्टल घरफोड्यास ताब्यात घेतल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर तेथील महिलांनी हल्ला केला होता. तसाच अनुभव पाटणा येथे पोलिसांना आला. 


दोघांना १० तारखेपर्यंत पोलिस कोठडी 
सुमनकुमार व अजयकुमार या दोघांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोघांना १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फसवणुकीच्या या प्रकारात आणखी मोठे रॅकेट काम करीत असून त्यांनी अनेक ठिकाणच्या लोकांना गंडा घातल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या अनुशंगाने तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती.


लाेकेशन मिळाल्याने दाेघे जाळ्यात 
सायबर पोलिसांनी सुमनकुमार व अजयकुमार यांनी गुन्ह्यात वापरलेल्या डिव्हाइसचे आयपी अॅड्रेस शोधून काढले. लोकेशनवरून माहिती मिळाली. यानंतर गेल्या आठवड्यात पोलिस निरीक्षक अरुण निकम, उपनिरीक्षक अंगत नेमाने, वसंत बेलदार, दिलीप चिंचोले, श्रीकांत चव्हाण, शंभुदेव रणखांब, गौरव पाटील, अजय सपकाळे यांच्या पथकाने बिहार गाठले. सोमवारी (दि.४) अजयकुमार व सुमनकुमार यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या दोघांकडून दोन लॅपटॉप, दोन मोबाइल व एक टॅब असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


fynd नावाचे एसएमएस करा डिलीट 
गेल्या काही दिवसांपासून अनेक नागरिकांच्या मोबाइलवर fynd या नावाने मॅसेज येत आहेत. 'आपल्या अकाउंटवर मित्राने पैसे डिपॉझिट केले असून, पुढील प्रक्रियेसाठी लिंकवर डायल करा' असा मेसेज यात लिहिलेला असतो. प्रत्यक्षात या लिंकवर डायल केल्यानंतर भामट्यांना आपला मोबाइल नंबर, आधारकार्ड, बँक खात्याची माहिती मिळते. त्यानंतर आपल्या खात्यातील रक्कम परस्पर काढली जाऊ शकते. म्हणून संबंधित लिंकवर डायल न करता हा मेसेज डिलीट करावा, असे जळगाव सायबर पोलिस ठाण्यातर्फे कळवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...