आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन माजी अन‌् चार विद्यमान आमदार ठरवणार बीड जिल्ह्यातील पंचायत समित्यांचा कारभार

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बीड पंचायत समिती संदीप क्षीरसागरांच्या ताब्यात जाणार? गेवराईत पंडित, वडवणीत सोळंके घेणार निर्णय
  • उद्या सभापती, उपसभापतींची निवड अंबाजोगाई, परळी, पाटोद्यात मुंडे बंधू-भगिनी घेणार निर्णय

​​​​​​बीड : बीड जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवड सोमवारी (३० डिसेंबर) होत आहे. सध्या जिल्ह्यात राजकीय समीकरणे जुळवण्यात नेतेमंडळी गुंतली आहेत. धारूर येथे समान संख्याबळ असल्याने पुन्हा दोन्ही पदासाठी टॉस होणार आहे. तर आष्टीत सभापती पदासाठी माधुरी जगताप यांना संधी मिळणार आहे.गेवराई पंचायत समितीत शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित कोणाला मदत करतात, त्यावर बीड जिल्हा परिषदेचेही चित्र स्पष्ट होईल.

धारूर येथे टॉस ठरवणार सभापतिपदाचे भवितव्य

धारूर : येथील पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण हे सर्वसाधारणसाठी आरक्षित आहे. सोमवारी पुन्हा सभापती पद व उपसभापती पदासाठी टॉस करावा लागेल. गतवेळी माजी मंत्री प्रकाश सोळंके समर्थक आशालता सोळंके यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून वर्णी लागली होती. त्यामुळे यंदा केवळ टॉसवरच सभापतीचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

माधुरी जगतापांना मिळेल संधी

आष्टी : पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाले आहे. ही पंचायत समिती भाजपचे आमदार सुरेश धसांच्या ताब्यात आहे. या पदावर आता विद्यमान सभापती चंद्रकला इथापे, कडा गणाचे सदस्या उर्मिला पाटील, टाकळसिंग गणाच्या सदस्या माधुरी जगताप यांची नावे चर्चेत आहे. आता आमदार धस सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. परंतु, माधुरी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. माजी आमदार भीमराव धोंडेंच्या गटाचे तीन, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सविता गोल्हार गटाचे २ व राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे गटाचे एक असे एकूण १४ सदस्य आहेत. धोंडे गटाकडून अजून इथे फोडाफोडीचे राजकारण दिसून येत नाही.

मुंडे, सोळंके ठरवणार वडवणीचा सभापती

वडवणी : येथील पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. उपळी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयी झालेल्या अंजना आजबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. चारपैकी उपळी गणातून अंजना आजबे, कवडगाव गणातून श्रद्धा उजगरे व चिंचवण गणातून विमल शिंदे या राष्ट्रवादीकडून निवडून आल्या होत्या. चिखलबीड पंचायत समिती गणातून भाजपकडून राणूबाई रेडे विजयी झाल्या होत्या. राष्ट्रवादीकडे चारपैकी तीन सदस्य असल्याने सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा राहणार असून अामदार धनंजय मुंडे व प्रकाश सोळंके हे ज्यांचे नाव सूचवतील तोच सभापती होणार आहे.

सोनाली खुळे यांची वर्णी?

माजलगाव : येथील पंचायत समितीचे सभापती पद ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे.
सभापती पदासाठी टाकरवन गणातील सोनाली भागवत खुळेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे.तालुक्यात पंचायत समितीचे १२ गण आहेत. राष्ट्रवादीच्या अलका नरवडे, डॉ. वसीम मनसबदार, सोनाली खुळे, चंद्रकांत वानखेडे, मिलिंद लगाडे, सुशील सोळंके, शिवाजी डाके, शशांक सोळंके, भाजप व मित्रपक्ष-सारिका जगताप, उषा मोरे, सुरेखा ठोंबरे, अंबिका पंडित काळे असे संख्याबळ आहे. त्यातील उषा मोरे व सुरेखा ठोंबरे यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीचे पारडे जड असून भाजप आणि मित्रपक्ष मिळून दोनच सदस्य आहेत. त्यामुळे आमदार प्रकाश सोळंके हे सोनाली खुळे यांचे नाव सभापतीसाठी शिक्कामोर्तब करणार आहेत.

अलिशान पटेल यांची लागणार सभापती वर्णी?

अंबाजोगाई : येथील पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. येथे आमदार धनंजय यांच्या गटाच्या सदस्या अलिशान पटेल यांचे गाव हे परळी मतदारसंघात येत असून विधानसभा निवडणुकीत मुंडे यांना पटेल यांनी मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. याची परतफेड म्हणून पटेल यांची पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड होण्याची शक्यता आहे. पंचायत समितीत राष्ट्रवादी ७, भाजप ३, काँग्रेस २ असे संख्याबळ आहे.

शिरूरमध्ये उषा सरवदे यांना दिली आरक्षणाने संधी

शिरूर : येथील पंचायत समितीच्या सभापती पद अनुसूचित जातीसाठी राखीव असुन या प्रवर्गासाठी शिरूर पंचायत समितीत केवळ उषा सरवदे या एकमेव सदस्य असल्याने त्यांचीच सभापती पदावर वर्णी लागणार आहे. त्यामुळे त्यांना आरक्षणामुळे संधी मिळाली आहे . परीणामी अनेक राजकीय नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. सभापतीपद आता अडीच वर्षासाठी असणार आहे.

पंकजा मुंडे सभापतीसाठी नाव जाहीर करणार

पाटोदा येथील पंचायत समितीचे सभापती पद हे खुल्या प्रवर्ग महिलेसाठी राखीव असुन त्यामध्ये सौताडा गणातील सुवर्णा लांबरूड या एकमेव सदस्या आहेत त्यामुळे त्यांना संधी मिळेल असे चित्र सध्या तरी दिसुन येत असुन सभापती पदा साठी संगीता मिसाळ या देखील दावा करण्याची शक्यता आहे .निवडीत माजी आ. धोंडेवर कुरघोडी करण्यासाठी आ. सुरेश धस हे काय भूमिका घेतात यावर परीस्थिती अवलंबुन असणार आहे .परंतु माजी मंत्री पंकजा मुंडे याच सभापती पदाचे नाव जाहीर करणार आहेत.

सभापतिपदाची माळ परिमळा घुले यांच्या गळ्यात पडणार

केज : केज पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. टाकळी गणाच्या परिमळा विष्णू घुलंेच्या नावावर पंकजा मुंडे या शिक्कामोर्तब करणार आहेत. सभापतीपदासाठी भाजपकडून परिमळा घुले, सविता कोकाटे, अनिता केदार, सुलाबाई सरवदे या दावेदारी करू शकतात. भाजपचे नेते रमेश आडसकर यांचे पुतणे ऋषिकेश आडसकर यांना उपसभापती पदाची संधी आहे.

धनंजय मुंडे यांना करावी लागणार कसरत

परळी : पंचायत समितीत १२ सदस्य असुन त्यापैकी आठ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. सभापती पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. सभापती पदासाठी उर्मिला शशिकांत गित्ते व उपसभापती पदासाठी जानिमियॉ कुरेशी यांची नावे चर्चेत आहे. आता सभापती व उपसभापती निवडीत आ. धनंजय मुंडे यांची कसरत आहे.बारा पैकी विद्यमान उपसभापती बालाजी मुंडे,जानिमियॉ कुरेशी,उर्मिला गित्ते,मीरा तिडके,रेणुका फड,सटवाजी फड,सुषमा मुंडे हे सात सदस्य सभापती पदासाठी चर्चेत आहे.

गेवराईत पंडित ठरवणार शिवसेनेचा सभापती

गेवराई : येथील पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण वर्गातील पुरुषासाठी आरक्षित आहे. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित व जिल्हा परिषद सभापती युद्धाजित पंडित हे भूमिका घेतात. यावर गेवराई पंचायत समितीचे भवितव्य अवलंबून आहे. सभापती पदाची निवड ३० डिसेंबरला, तर झेडपी अध्यक्षपदाची निवड ४ जानेवारीला होणार, त्या आधीच बदामराव पंडितांना महत्त्वाची भूमिका घ्यावी लागेल.

अकरा पंचायत समित्यांचे असे आहे सभापतिपद

बीड जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे आहे . बीडसह गेवराई, धारूर,बीड येथील पंचायत समितीचे सभापतीपद सर्वधारणसाठी असुन शिरूर पंचायत समितीचे सभापतीपद अनुसुचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव आहे. माजलगाव ,आष्टी येथील सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असुन परळीचे सभापतीपद ओबीसीसाठी आहे. अंबाजोगाईसह केज, पाटोदा, वडवणी येथील पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षीत आहे.
 

बातम्या आणखी आहेत...