आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडमध्ये दाेन, तर जालन्यात एक काेराेना संशयित रुग्ण; लाळेचे नमुने तपासणीसाठी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नांदेडच्या दोन संशयित रुग्णांनी केली होती सौदी अरेबियाची सफर, आता निरीक्षणाखाली
  • पाच दिवस उपचार घेऊनही बरे वाटत नसल्याने आला होता गावाकडे

जालना, नांदेड - नांदेड येथे काेराेनाचे दाेन संशयित रुग्ण तर जालना येथे एक रुग्ण आढळला आहे. या तिन्ही रुग्णांवर अनुक्रमे नांदेड आणि जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. नांदेड येथील संशयित रुग्ण साैदी अरेबियाचा दाैरा करून आलेले आहेत. तर जालना येथील रुग्ण पाेलिस दलात कार्यरत असून ताे काही दिवसांपूर्वी इस्रायली कमांडाेंच्या संपर्कात आला होता. या सर्व रुग्णांचे स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जालना येथील जिल्हा रुग्णालयात गुरुवारी सकाळी कोरोना संशयित रुग्ण दाखल झाला.  प्राथमिक उपचार करून त्याला तत्काळ विलगीकरण कक्षात भर्ती करण्यात आले. याठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान त्याचे स्वॅबचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून तेथून अहवाल आल्यानंतरच पुढील उपचार करण्यात येतील, असे डॉक्टरांनी सांगितले. सदरील रुग्ण हा मंठा तालुक्यातील एका गावचा असून तो मुंबई पोलिस दलात कर्तव्यावर आहे. काही दिवसांपूर्वी तो सुटी घेऊन गावाकडे आला होता. मात्र, सर्दी, ताप, घसा खवखवणे आदी लक्षणे दिसून आल्याने त्याने गुरुवारी सकाळी १० वाजता जालना येथील जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागातील डॉक्टरांना दाखवले. यावेळी डॉ. सूरज राठोड यांनी सदरील रुग्णाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन तत्काळ वरिष्ठांना कळवले. त्यानंतर तातडीने एक्स-रे काढण्यात आला तसेच रक्ताचीही तपासणी करण्यात आली. कोरोनासारखी लक्षणे दिसून अाल्यामुळे स्वॅबचे नमुने  पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले. त्यानंतर विलगीकरण कक्षात उपचार सुरू करण्यात आले. 

रुग्ण इस्रायल कमांडोच्या संपर्कात

जालना येथील संशयित रुग्ण मुंबई पोलिस दलात असून तो काही दिवस इस्रायली कमांडोजसोबत बंदोबस्तासाठी तैनात होता. दरम्यान, तब्येत बिघडल्यामुळे त्याला दादर येथील पोलिस दलाच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्याठिकाणी पाच दिवस उपचार घेतल्यानंतर त्याला सुटी देण्यात आली.  मात्र, घरी आल्यावरही त्याला बरे वाटत नव्हते. यामुळे त्याने दोन दिवसांपुर्वी सुटी काढून तो गावाकडे आला होता. सर्दी, खोकला तसेच घसा खवखवत असल्यामुळे गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आला. या वेळीच हा रुग्ण कोरोना संशयित असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.जिल्हा रुग्णालय अलर्ट, मास्क लावूनच वावर

कोरोनाचा संशयित जालना जिल्हा रुग्णालयात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली व जो-तो तोंडाला मास्क लावू लागला. सर्वप्रथम रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी मास्क लावले. त्यानंतर काही रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी सुद्धा मास्क लावले. यामुळे सगळीकडे भिती पसरली होती. मात्र, हा रुग्ण संशयित असून घाबरण्याचे कारण नाही. त्याच्यावर उपचार सुरू असून तो बरा होईल. फक्त प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, अपघात विभागात संशयित रुग्णाशेजारील बेडवर दुसरा रुग्ण होता. त्यालाही सर्दी, खोकला असल्यामुळे तो घाबरला. मात्र डॉक्टरांनी त्याला तात्काळ दुसऱ्या वाॅर्डात हलवले. तसेच सर्दी-खोकला औषधोपचाराने बरा होतो, घाबरू नये, असे त्याला सांगण्यात आले. मात्र, तो रुग्ण घाबरलेलाच होता.
 

फिजिशियन आल्यावर उपचार

सदरील रुग्णास बाह्य रुग्ण विभागातून अपघात विभागात आणण्यात आल्यावर येथील ड्यूटीवरील डॉक्टरांनी फिजिशियन डॉक्टरांना बोलावून घेतले. फिजिशियन यांनी तपासणी केल्यावरच त्याची तपासणी व नमुने घेऊन पुढील उपचार सुरू करण्यात आले. कोराेना संशयित असल्यामुळे डॉक्टर तसेच काही परिचारिकांनीसुद्धा ही माहिती एकमेकांना दिली व त्यांनी मास्क लावून उपचार सुरू केले. नांदेडमधील दोन रुग्ण सौदी अरेबिया रिटर्न : दोघांच्याही लाळेचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले
 
नांदेड शहरात कोरोनाचा संशय असलेल्या दोन रुग्णांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण वॉर्डात दाखल करण्यात आले. यातील एक नांदेड शहरातील रहिवासी तर एक हिमायतनगर येथील रहिवासी अाहे. दोन्ही संशयित रुग्ण सौदी अरेबियाचा दौरा करून आलेले आहेत. त्यांना त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचेही स्वॅब नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आलेला नाही.  नागरिकांनी आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावे व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. नीळकंठ भोसीकर यांनी केले आहे. नांदेडला यापूर्वीही तीन जणांना कोरोनाचे संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. कर्मचाऱ्यांसाठी डॉक्टर, पीपी किट उपलब्ध 

विलगीकरण कक्षात उपचार करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांसाठी पीपी (पर्सनल प्रोटेक्शन) किट, एन-९५ मास्क आदी आवश्यक साहित्य उपलब्ध आहेत, तर रुग्णांवर उपचारासाठीची औषधीही आहेत. आम्ही दोन महिन्यांपूर्वीच याची तयारी केलेली आहे. तसेच हा संशयित रुग्ण मुंबईत उपचार घेऊन आलेला आहे. केवळ शंका म्हणून तो आज आला होता. तज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 
एम. के. राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना