आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात २ पादचारी महिलांच्या गळ्यांतील साेनसाखळी लांबवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरात दररोज चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. यातच बुधवारी दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी महामार्गालगत असलेल्या विद्युत कॉलनी व शिव कॉलनीत दोन वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवल्या. १० मिनीटांच्या अंतरात या घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तर दुसरीकडे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. भामट्यांनी लंपास केलेल्या साेनसाखळ्यांची किंमत १ लाख ५ हजार रुपये अाहे. 


शहरातील कोल्हेनगर परिसरातील गुरूकुल कॉलनीत राहणाऱ्या सुधा अशोक नेहेते (वय ६१) ह्या पतीसोबत जामनेर येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. महामर्गावरील विद्युत कॉलनीच्या स्टॉपवर रिक्षाची वाट पाहत सकाळी ८ वाजता नेहेते दांपत्य उभे होते. या वेळी समोरून हेल्मेट घातलेले दोन भामटे दुचाकीने सुधा नेहेते यांच्याजवळ आले. त्यांनी दुचाकीचा वेग कमी करुन आंटी असा आवाज दिला. सुधा नेहेते यांना संशय आल्यामुळे त्या भामट्यांपासून लांब जाऊन उभ्या राहिल्या. त्यानंतर त्यांनी पती अशोक नेहेते यांना ही बाब सांगितली. दरम्यान, दोन मिनीटांतच भामटे दुचाकी वळवून पुन्हा सुधा नेहेते यांच्याजवळ आले काही सेकंदातच मागे बसलेल्या भामट्याने त्यांच्या गळातील आडीच लाखांची सोनसाखळी तोडून पळ काढला.


अर्धी साखळी वाचली 
विद्युत कॉलनीतून सुधा नेहेते यांची सोनसाखळी लांबवून आल्यानंतर भामट्यांनी शिव कॉलनीत धाव घेतली. घराबाहेर उभ्या असलेल्या अंजनाबाई पांडुरंग चौधरी (वय ७५) या वृद्धेजवळ येऊन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढली. दरम्यान, अंजनाबाई यांनी सोनसाखळी दाबून धरल्यामुळे चोरट्यांच्या हाती अर्धीच सोनसाखळी लागली. अंजनाबाई यांनी मुलगा बाळू यांस आवाज दिला. परंतु, तोपर्यंत भामटे पळून गेले होते. अंजनाबाई यांची दोनपैकी १ तोळ्याची अर्धी सोनसाखळी भामट्यांनी लांबवली आहे. भर दिवसा ही घटना घडल्याने नागरिकांत भीती वाढली अाहे. 


चोऱ्यांचे सत्र सुरूच 
शहरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी विविध भागात तीन घरफोड्या झाल्याचे उघडकीस आले होते. त्यापाठोपाठ बुधवारी भामट्यांनी दोन सोनसाखळ्या लांबवल्या आहेत. दरम्यान, शिव कॉलनीत दररोज भुरट्या चोऱ्या सुरू आहेत. उघड्या खिडकीतून बांबू टाकून कपडे लांबवले जात आहेत. एका विद्यार्थ्यांचे दप्तर दोन दिवसांपूर्वी लांबवल्याची घटना घडली. या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...