आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीच्या प्रतीक्षेत एक जण दगावला, घरी जाणाऱ्या दोन पोलिसांमुळे दोघा जखमींना मिळाले वेळेत उपचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- ट्रकला धडकल्याने दुचाकीवरील एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. अपघातानंतर जखमी दाेघेही मदतीसाठी विव्हळत जागेवरच बेशुद्ध पडले. अंधार आणि कडाक्याची थंडी यामुळे वाहनधारक येथून वेगाने पुढे जात होते तर काही जण वाहन थांबवून काय झाले याची माहिती घेऊन सुसाट निघून जात होते. अशातच ड्यूटी संपवून घरी जात असलेल्या खाकीतील दोन जवानांनी पोलिसांना अपघाताची माहिती देऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. कडाक्याच्या थंडीत त्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे जखमींवर तातडीने उपचार सुरू करता आले. 

 

जिल्हा न्यायालयासमोर शनिवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. टिप्परचे टायर फुटल्याने दुचाकीवरून येत असलेल्या तिघांची या टिप्परला जोराची धडक बसली. यात दीपक दादाराव मुणीमाणिक (२८, टेंभुर्णी, ता.जाफराबाद), शैलेश आमले (जालना) व अमरदीप हणमंते (नांदेड) हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जवळपास अर्धा तास हे तिघे रस्त्यावर मदतीसाठी विव्हळत पडले होते. बराच वेळ मदतीसाठी कुणीच आले नसल्याने दीपक मुणीमाणिक याचा मृत्यू झाला तर शैलेश व अमरदीप बेशुद्ध पडले. याच वेळी पोलिस दलातील योगेश जगताप आणि दीपक पवार हे युवक आपल्या कारमधून घरी निघाले होते. त्यांनी मदत केली. 

 

कर्तव्यावर नसतानाही पोलिसांची मदत वाहनचालक मदत न करता जात होते सुसाट 
दीपक पवार व योगेश जगताप यांनी स्वत:च दोन्ही जखमींना उचलून आपल्या कारमध्ये बसवले. तेव्हा बेशुद्धावस्थेतील दोन्ही जखमींना दीपक पवार यांनी पकडून ठेवले तर योगेश जगताप कार चालवत होते. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील स्टाफच्या मदतीने दोन्ही जखमींना त्यांनी अतिदक्षता विभागात दाखल केले. शिवाय पुन्हा घटनास्थळावर येऊन त्यांनी मृतदेह उचलण्यासाठी मदत केली. यात दोघांचे कपडे आणि कारचे सीट रक्ताने माखले होते.

 

जखमींची प्रकृती गंभीर 
जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर जखमी अमोल व अमरदीप यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले, तर तेथून त्यांना पुन्हा औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिस उपनिरीक्षक शेजूळ यांनी सांगितले. दोघे गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
प्रकरण संशयास्पद 
शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाल्यानंतर कदीम जालना पोलिस ठाण्यात केवळ अकस्मात मृत्यूची नोंद झाली. यातील टिप्परही पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला. मात्र टिप्परने दुचाकीला धडक दिली की दुचाकी टिप्परला धडकली याबाबत पोलिसांनी स्पष्ट माहिती दिली नाही. 

 

मध्यरात्री शहराचे तापमान ८.६ अंश होते. कडाक्याच्या थंडीत व कर्तव्यावर नसतानाही दीपक पवार व याेगेश जगताप या दोन्ही पोलिसांनी तत्परता व माणुसकी दाखवत जखमींना रुग्णालयात दाखल केले. 

बातम्या आणखी आहेत...