ट्रक-जीप धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, तीन जखमी; शुक्रवारी मध्यरात्री अपघात
सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावरील सिद्धनाथ कारखान्याजवळ जीप - ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला.
-
सोलापूर- सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावरील सिद्धनाथ कारखान्याजवळ जीप - ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. सविता भारत धुमाळ (वय ४५) व गणेश वाघमारे (वय १९) (दोघे रा.पिरटाकळी ता. मोहोळ) अशी त्यांची नावे आहेत. तिघेजण जखमी झाले. पीरटाकळी येथून रूपाली चव्हाण या गर्भवती महिलेला रुग्णालयात नेताना रात्री सव्वाअकरा वाजता ही दुर्घटना घडली. अपघातात जीपचा चक्काचूर झाला आहे.
पीरटाकळी येथून रूपाली चव्हाण यांना सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी धुमाळ कुटंुबीय निघाले. सिद्धनाथ कारखान्याजवळ सोलापूरहून मंगळवेढ्याकडे निघालेल्या ट्रकने जीपला धडक दिली. त्यात जीपमधील वाहनचालक गणेश वाघमारे व रुपाली यांच्या आई सविता धुमाळ यांचा जागीच मृत्यू झाला तर रूपाली, शशिकांत धुमाळ व स्वाती धुमाळ हे तिघेजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पाटील यांनी दिली.
गस्तीसाठी आलेल्या पोलिसांमुळे जखमींना तातडीची मदत मिळाली. गस्तीचे पोलिस व तिऱ्हेचे पोलिस पाटील संतोष आसबे यांच्यासह ग्रामस्थांनी रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली.