आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुचाकी अडवून दोघा युवकांना लोखंडी पट्टी, दगडांनी मारहाण; प्लास्टिकची नळी घेऊन फिरत असल्याने वाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- प्लास्टिकची नळी घेऊन फिरत असल्याने आइस्क्रीम घेऊन दुचाकीवर जात असलेल्या दोन युवकांना भोईटे गढीजवळ तिघांनी अडवून लोखंडी पट्टी, दगडाने जबर मारहाण केली. तसेच हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मुलांच्या वडिलांच्या उजव्या हातावर चाकूने भोसकल्याची घटना गुरुवारी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास घडली. या मारहाणीत जखमी पिता-पुत्रांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 

या मारहाणीत चेतन युवराज कोल्हे व युवराज यशवंत कोल्हे हे पिता-पुत्र जखमी झाले आहेत. सौरभ प्रशांत कोल्हे (वय २०) व चेतन युवराज काेल्हे (रा.रामपेठ कोल्हेवाडा) हे दोघे घरी होते. गुरुवारी रात्री १०.१५ वाजता युवराज कोल्हे व सूजय एकनाथ कोल्हे यांनी त्यांना रथचौकातून आईस्क्रिम आणण्यास सांगितले. रस्त्याने कुत्रे पाठीमागे लागत असल्याने त्यांनी हातात प्लास्टिकचा पाइप घेतलेला होता. हेमराज कोल्हे यांच्या दुचाकीने ते रथचौकात गेले. तेथे आइस्क्रिम घेऊन परत जात होते. भोईटे गढीजवळ तिघांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यांना थांबवून प्लास्टिकची नळी घेऊन कुठे फिरता आहात? दादा झालेत का? असे म्हणून शिवीगाळ केली. आकाश उर्फ धडकन सुरेश कोळी याने चेतन याच्या उजव्या हातावर लोखंडी पट्टी मारली. त्याच्या सोबतच्या सागर आनंदा कोळी याने चेतन याच्या पाठीवर दगड मारले. या वेळी सौरभ कोल्हे याच्या उजव्या हाताच्या मनगटावरही दगड लागला. त्यांचा तिसरा साथीदार विशाल बुनकर याने चेतन याच्या डोक्यावर दांडके मारल्याने त्याच्या नाकाताेंडातून रक्तस्त्राव हाेत हाेता. 

 

सौरभ हा धावत कोल्हेवाड्यात गेला. तेथून चेतन याचे वडील युवराज यशवंत कोल्हे व सूजय एकनाथ कोल्हे हे दोघे धावत भांडण सोडवण्यासाठी आले. या वेळी सागर उर्फ झप्प्या आनंदा कोळी याने युवराज यांच्या पोटावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. वेळीच त्यांनी हात आडवा केला. त्यामुळे चाकू त्यांच्या उजव्या हाताच्या मनगट व कोपरामध्ये लागला. हे भांडण सोडवण्यासाठी सूजय कोल्हे, हेमराज कोल्हे व महेश रमेश कोल्हे हे सुद्धा धावत आले. त्यानंतर तिघेजण घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान, शहरात गेल्या महिनाभरापासून चाकूहल्ला, गाेळीबार, हाणामारी असे प्रकार वाढले आहे. पाेलिसांचा धाक संपला असून गुंडगिरी वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. 

 

संशयित युवकाची दुचाकी केली जप्त 
मारहाणीत चेतन व युवराज हे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी सौरभ कोल्हे याच्या फिर्यादीवरून सागर कोळी, आकाश कोळी व विशाल बुनकर (सर्व रा. कोळीपेठ) यांच्या विरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या युवकांची दुचाकीही पोलिसांनी जप्त केली.