आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध सावकाराने 2 वर्षांत वसूल केले अडीच लाखांचे वीस लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरातील राजेंद्र महादेव चौधरी व सुनील पंत नावाच्या दोन अवैध सावकाराच्या घरावर सहकार विभागाने धाडी टाकून पोलिसात तक्रार दिली होती. सहकार विभागाने ज्या तक्रारदाराच्या तक्रारीवरून अवैध सावकारांविरुद्ध कारवाई केली. त्या तक्रारदाराने चौधरीकडून अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या अडीच लाखांचे चौधरीने तब्बल २० लाख रुपये अवघ्या दोन वर्षांत वसूल केल्याचे तक्रारदाराने आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सोमवारी (दि. २९) दिलेल्या बयाणात नमूद केले आहे.

 

शहरातील रहिवासी व तत्कालीन एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवराज उत्तमराव पाचूरकर असे तक्रारदाराचे नाव आहे. पाचूरकर यांनी २०१२ मध्ये चौधरीकडून अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यावेळी चौधरीने पाचूरकरडून कोरे स्टॅम्प पेपर व धनादेश घेतले होते. तसेच या कर्ज रकमेवर दरमहा तब्बल २० टक्के व्याजदर ठरला होता. या व्यवहाराप्रमाणे पाचूरकर यांनी चौधरीला रकमेची परतफेड सुरूच ठेवली होती मात्र, त्याचदरम्यान चौधरीने पाचूरकर यांनी दिलेल्या धनादेशाचा गैरवापर करून पाचूरकरविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आणि पाचूरकरविरुद्ध खटला भरला. या प्रकारामुळे पाचूरकर विवंचनेत पडले होते.

 

याचदरम्यान चौधरीने पाचूरकरला न्यायालयातील खटला मागे घेण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र पाचूरकरकडे रक्कम नव्हती. त्यामुळे २०१४ मध्ये पाचूरकरने शहरातील सर्वोदय कॉलनी परिसरात असलेला १ हजार ८६० वर्गफूटाच्या आसपास असलेला भूखंड विकला. त्या भूखंडाच्या विक्रीतून वीस लाख रुपये पाचूरकर यांना मिळाले होते. त्यापैकी दहा लाख रुपये चौधरीला दिले. तसेच तत्पूर्वीच दरमहा व टप्प्याटप्प्याने कर्जाचे दहा लाख रुपये दिले होते. अशा पद्धतीने चौधरीने दोन वर्षांत तब्बल २० लाख रुपये वसूल केल्याचा आरोप करून पाचूरकर यांनी पोलिसांना सोमवारी (दि. २९) बयाणात सांगितले आहे. दरम्यान, चौधरीकडून झालेल्या आर्थिक लुटीमुळे पाचूरकर यांचे कौटूंबिक नुकसान झाल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

 

चौधरीच्या या प्रतापाची तक्रार पाचूरकर यांनी २०१४ मध्येच सहकार विभागाकडे केली होती. सहकार विभागाने तब्बल चार वर्षे केलेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर सहकार विभागाला संशय आला की, चौधरी अवैध सावकार असावा, म्हणून सहकारच्या पथकाने ९ ऑक्टोबरला चौधरीच्या घरी धाड टाकून त्याच्या घरातून सावकारी व्यवहाराशी संबंधित े मोठ्या प्रमाणात कागदपत्र जप्त करण्यात आले होते.या प्रकरणात १३ ऑक्टोबरला सहकार विभागाने चौधरी व पंतविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी दोघांविरुद्ध सावकारी अधिनियमाप्रमाणे गुन्हे दाखल करून प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू करून ज्या ८१ व्यक्तींचे कागदपत्र मिळून आले आहे, त्यांचे बयाण घेण्यासाठी सुरूवात केली. यातील सर्वात महत्वाचे बयाण म्हणजे तक्रारदार पाचूरकर यांचे होते, ते झाले आहे. आता उर्वरित व्यक्तींचेही बयाण नोंदवले जाणार आहे. 

 

तक्रारदाराने भूखंड विकून दिली होती सावकाराला रक्कम 
दिवसाला पाचशेेचा दंड ठोकायचा चौधरी 

चौधरीने पाचूरकरला दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी दर महिन्याला एक तारीख ठरली होती. त्या तारखेवर ठरलेली रक्कम पाचूरकरकडून मिळाली नाही तर २० टक्के व्याजासोबतच प्रतिदिवस पाचशे रुपये प्रमाणात दंड ठोकायचा. असा असह्य दंडसुद्धा पाचूरकरने भरलेला असल्याचे बयाणात सांगितले. 


सखोल तपास करणार 
सहकार विभागाकडे तक्रार करणाऱ्या देवराज पाचूरकर यांचे बयाण नोंदवले अाहे. चौधरीने अडीच लाखांच्या कर्जवसुलीसाठी तब्बल २० लाख रुपये वसूल केले. तसेच न्यायालयातून प्रकरण मागे घेण्यासाठी भूखंड विकून दहा लाख रुपये चौधरीला दिल्याचेही पाचूरकर यांनी बयाणात सांगितले आहे. या प्रकरणात इतरही व्यक्तींचे बयाण नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, सखोल तपास करण्यात येत आहे. पंंजाबराव वंजारी, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा. 


चौधरीचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज 
अवैध सावकारीच्या माध्यमातून गरजवंताना अव्वाच्या सव्वा व्याजाने रक्कम देऊन वसूल करणाऱ्या चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याच्या जामिन अर्जावर लवकरच सुनावणी होणार आहे, असे तपासी सूत्रांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...