आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्यातील दोन आमदार अजित पवारांकडे, एक कुंपणावर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठपैकी दोन आमदारांनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला असून उर्वरित सहा आमदारांपैकी आणखी एक आमदार कुंपणावर असल्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादीच्या माजी आमदारांपैकीही किमान पाच जण अजित पवारांबरोबर जातील असा अंदाज आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात राष्ट्रवादीला आठ मतदारसंघांत यश मिळाले. त्यातील सर्वाधिक चार आमदार बीड जिल्ह्यातून निवडून आले आहेत. ते चारही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर म्हणजे शरद पवारांबरोबर असल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे बाबासाहेब पाटील आणि उदगीरचे संजय बनसोडे हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येते. यातील संजय बनसोडे यांना विमानतळावरून परत आणण्यात आले आहे. मात्र, आपण राष्ट्रवादीमध्ये आहोत हे त्यांनी सांगितले नाही. जालना येथून निवडून आलेले राजेश टोपे हे देखील शरद पवारांबरोबर असल्याचे दिसले. हिंगोली जिल्ह्यातील चंद्रकांत नवघरे (वसमत) हेदेखील आपण शरद पवारांबरोबरच राहू असे सांगत आहेत. मात्र, यापैकी एक आमदार कुंपणावर असून आपण इतक्यात निर्णय घेतलेला नाही. पुढे काय होते ते पाहून मगच बोलू, असे त्यांनी खासगीत सांगितले आहे.


माजी आमदारांपैकी किमान पाच जण कुंपणावर आहेत. अजित पवार यांचे पुढे काय होते हे पाहून ते निर्णय जाहीर करतील. जालना जिल्ह्यातील चंद्रकांत दानवे आणि अरविंद चव्हाण हे दोन्ही माजी आमदार अजित पवार यांच्या पाठबळावरच पक्षात आमदार झाले आणि राहिले अशी स्थिती आहे. त्यामुळे सध्या ते स्पष्ट बोलत नसले तरी ते प्रसंगी अजित पवारांबरोबर जातील, अशी शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे हेदेखील अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांपैकीच एक आहेत. परभणी जिल्ह्यातील माजी आमदार विजय भांबळे यांचे आणि अजित पवार यांचे संबंधही सर्वज्ञात आहेत. मधुसूदन केंद्रे हे धनंजय मुंडे यांच्या नात्यातील आहेत. ते जिकडे धनंजय मुंडे जातील तिकडेच जाण्याची शक्यता आहे. सध्या मुंडे शरद पवारांबरोबर असल्यामुळे केंद्रेही शरद पवारांबरोबरच असतील. औरंगाबादचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनीही सध्या काही बोलण्यास नकार दिला. परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेऊ, असे ते सांगत आहेत.

मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे फारसे अस्तित्व नाही. परभणी जिल्हा परिषदेत २४ सदस्य आहेत, पण त्यातील १३ सदस्य विजय भांबळे यांचे समर्थक आहेत तर ११ सदस्य विधान परिषदेचे सदस्य बाबाजानी दुर्रानी यांच्या बाजूने आहेत. तिथे भाजपचे पाचच सदस्य आहेत. त्यामुळे राज्यात नवे समीकरण जमले तरी परभणी जिल्हा परिषदेतही तसेच होईल असे नाही. आठवडाभरात जि.प. अध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्या वेळी काय चित्र तयार होते हे पाहणे आता महत्त्वाचे आहे. परभणी महापालिकेतही राष्ट्रवादीचे १९ सदस्य आहेत. त्यापैकी १२ जण माजी महापौर प्रताप देशमुख यांच्याशी संबंधित आहेत आणि हे देशमुख अजित पवार समर्थक आहेत. ७ जण बाबाजानी यांच्या गटातले आहेत. ते शरद पवारांबरोबर आहेत.

जालना जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नगरपालिकेत १२ आणि जिल्हा परिषदेत १६ सदस्य आहेत. पण नव्या घडामोडींचा त्यावर काही परिणाम होण्याची चिन्हे नाहीत. बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे २३ सदस्य आहेत. पण चारही आमदार शरद पवारांबरोबर असल्याने तिथेही राजकारणात काही फरक पडेल असे दिसत नाही. बीड नगरपालिकेत २५ सदस्य जयदत्त क्षीरसागर यांचे तर १८ सदस्य विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक आहेत. त्यामुळे त्यातही सध्या तरी फरक पडेल असे चित्र नाही. औरंगाबाद महापालिकेत तीन सदस्य आहेत आणि तेही आहे तिथेच राहतील, असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे उद्या अजित पवार हे नवे सत्ताकेंद्र म्हणून समोर आले तरी मराठवाड्यात मात्र फार मोठी उलथापालथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होईल, अशी चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत.