आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रसाद कुमठेकर
सत्य काही असो, ‘मी’ जे सत्य समजत होता त्याच ‘मी’च्या सत्याशी मी प्रामाणिक राहिला. आणि वितंडवादालाच ‘वाद’ म्हणतात हे ‘व्होल नेशन यु शुड नो’ असं वारंवार मोठमोठ्याने आरडून ओरडून प्रसंगी समोरच्यांचे आवाज दाबत सांगत राहिला. आणि ‘मी’ समर्थ, प्रय आणि परम कांतिमॅन झाला. आणि ‘मी पाडीन तोच आणि तिथेच उजेड’ हा त्याचा हिटाड पॅट्टर्न हल्ली जवळपास सर्वच माध्यमांनी अंगीकारला, मन:पूर्वक वरला.
कथा १
वादळी चर्चा आणि ‘मी’ बाळ‘कडू’
२४/७ वादळी चर्चां आणि रोजच्या रोज घणाघाती प्राइम लेखांच्या कलगीतुऱ्यावर पोसल्या गेलेल्या समाजशील, समाजाभिमुख ‘मी’ला त्यामुळेच...
अगदी लहानपणापासूनच त्याच्या समाजातील ओळखी अनोळखी चार लोकांच्या चर्चेत सहभागी होण्याची अतीव इच्छा असे. घडत्या वयात ‘मी’ने, ‘मी’च्याच समाजात अनुभवलेल्या वादळी चर्च्यांच्या झंझावातात सापडून अंगावर उडालेल्या, अंगाला चिकटून बसलेल्या, नाकातोंडात जाऊन शिंक आणणाऱ्या माहितीरूपी धुळीलाच ज्ञान समजायचं हे ‘मी’ला कुणी सांगितलं की ‘मी’ स्वयंभू’च हे ‘मी’च जाणे. तर चार लोकांच्या चर्चेत बसून, बसवून ‘मी’ला माहिती झालेल्या त्या चारच गोष्टी, त्याच चार लोकांत परत उगाळून ‘मी’ची इमेज उजळ होते असा दैवी साक्षात्कार ‘मी’ला झालेला, अगदीच घडत्या वयात. त्यामुळे ‘मी’च्या माहितीत असलेल्या बाकी चारांसारखंच, विषय कोणताही असो, त्याचा बूड शेंडा माहीत असो नसो ‘मी’ उदाहरणांचे दाखले देत, दाखवत हिरिरीने बोलायचा. विषयाची चांगली किंवा वाईट एक बाजू लावून धरत गळ्याच्या शिरा ताणून चर्चेत आपला भाग वाढवायचा. आणि अशा ‘मी’च्या बोलण्याचं अजिर्ण झालं किंवा ‘मी’ने ‘मोठ्या मी’ने धरलेल्या बाजूच्या अगदी उलट दुसरी बाजू ताणून धरली तेव्हा ‘तुम्हाआम्हासामान्यगुणीजनांचे’ वडील चिडतात तसे ‘मी’चे वडील अर्थात ‘मोठे मी’ चिडायचे आणि पावरचा दंडुका समोर करत ‘असं तोंड दिलंय म्हणून बोलायचं गां* दिली म्हणून हागायचं असली वंगळी सवय सोड’ असा सज्जड दम भरून ‘मी’च्या ‘मी’ला विखारी डंख मारायचे. पण असं चर्चेचर्चेत एकमेकांचं ऐकल्यासारखं करत, आपलाच ‘मी’ रेटत समोरच्याला खोडण्याचा जाणिजे यज्ञकर्म करताना एकमेकांचा ‘मी’ दुखावला जाणं अर्थात ‘मी’ला नवं नव्हतंच. आणि म्हणून मग ‘मी’ नव्या पिढींचे काम आणि
विचार, जुन्या पिढींचे काम आणि विचार अशी त्याच त्या शष्प चर्चांची वर्गवारी करायचा. आणि ही वर्गवारी करताना ‘मी’ने केलेल्या अभ्यासाचा डेटा म्हणजे ‘मी’ पाहिलंय, माझा अंदाज, माझ्या ‘निरीक्षणा’ला दुजोरा देणारी माझी चार माणसं आणि त्याला पूरक असं चर्चासत्राच्या सेटवरून
नाहीतर मोबाइलच्या नेटवरून डोकुमेंटीत केलेलं साहित्य हाच असे...असतो. आणि अशाचं ‘मीमी’मय वादळी वातावरणात ‘मी’ वाढला, चढला, घडला...आणि ‘मी’ने तो देणं लागत असलेल्या समाजाचा ‘मी’ प्रमाणात्मक आणि गुणात्मक दोन्ही दृष्ट्या इमाने इतबारे ‘विकासवला’सुद्धा (फक्त विकास मोजण्याची एककं ही सब्जेक्ट टू पावरवाला ‘मी’)
कथा २
कांतीमॅन, ‘मी’ पाडीन तोच उजेड
‘मी’ गणिताच्या ट्युशनला जायचा. तेथे ‘मी’चे गणिताचे गुरुजी पीजी पाटील सर गणित घालायचे आणि सगळ्यांना उत्तर विचारायचे. त्यांच्या गच्चीवर भरणाऱ्या ट्युशनच्या पन्नाससाठ मुलांच्या तुडुंब बॅचमध्ये बसलेला ‘कल्ल्या स्वामी’ सगळ्यात आधी उत्तर द्यायचा. सगळी मुलं त्याच्याकडे वळून वळून बघायची. ‘मी’पण त्यात होता. मग ‘मी’ कल्ल्याच्याच बाजूला बसायला लागला. फाष्टम फाष्ट उत्तरं कशी द्यावीतचा कोड ‘मी’नं पण क्रॅक केला. गुरुजींनी घातलेलं गणित समजून घेणं, त्याच्या सिद्धतेपर्यंत जाण्यासाठी वापरल्या गेलेल्या श्टेपा याच्याशी ‘मी’चं पण काहीच देणं घेणं नसायचं. कारण सेम. तुम्हाआम्हासामान्यगुणीजनांसारखंच ‘मी’लासुद्धा शिक्षण शिकण्यासाठी नाही चमकण्यासाठी असतं हेच शिकवलं गेलं आहे. तर मुद्दा हा की गुरुजींनी गणितातील उदाहरणं विचारण्याआधीच ‘मी’नं त्या उदाहरणांचा मोटामोटी खाका तयार केलेला असे. फक्त आता विचारलेल्या गणितात बदलेले ते नंबर आधीच मांडलेल्या त्या खाक्यामध्ये टाकायचे आणि फायनल उत्तर मिळवायचं येवढंच आणि असंच काम. फाष्टम फाष्ट उत्तरं देणाऱ्या ‘मी’लासुद्धा आता बाकी मुलं वळून वळून बघायला लागली. मग ‘मी’ची छाती रोज नित्य नियमाने इंच इंच फुगायला लागली. तेवढ्यापुरतंच आपण हुशार असल्याचं किंवा त्यापेक्षा आपण बाकीच्यांना हुशार वाटतोय याचं गडगभर समाधान ‘मी’ला मिळायला लागलं. मग काय झालं? तर काही नाही. गणितात दिडशेपैकी दिडशे मार्क घेईल असा आभास निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या ‘मी’ला एकूणात ‘एकसष्ठ मार्क’ पडले आणि ‘मी’ची खरी पोच अक्कल माहीत असलेल्या आईला ‘झाला बाबा हा एकदाचा पास’चा हुश्शमय आनंद मिळाला. ‘मी’ मात्र प्राथमिक जीवनात मनी धरलेली चमकण्याची, हुशारीच्या उजेडानं यत्रतत्र कांतीमान होण्याची आस आणि कास माध्यमिक, शालांत, पदवी, पदव्युत्तर शिक्षणादरम्यान आणि त्यानंतर सुद्धा सोडली नाही. माझा ‘नाही बा इंजीनेरिंग ग्रुप’ आपलं ध्येय डॉ. डॉक्टरचं करून नऊ दिवस ‘मी’ सायन्स सायन्स खेळला. आणि फायनली गाडी ‘कलेची आवड’ आणि ‘प्रशासकीय सेवेत’च करिअर करण्याची इच्छा या टायटलचा आधार घेत कलाशाखेच्या दाराला लावली. तिथेच ‘मी’ ने डिमांड आणि पैकीच्या पैकी मार्क घेता येतात म्हणून तत्वज्ञान विषय निवडला. सिलॅबसमध्ये कम्पल्सरी असल्याने ‘मी’ला इथं नव्याने कळलं की एखाद्या विषयातील फक्त तत्त्व कळावे एवढ्याच हेतूने जी चर्चा केली जाते तिला वाद म्हणतात. या वादात किंवा चर्चेत मोठा आवाज, मै बोला वोही सच, आप चूप रहिये, बाहर मिलीये, मी सांगतोय तेच इंडिया wants to know, मुद्द्याला बगल देणं, फुकाचं चर्हाट लावणं या गोष्टी अजिबातच होत नाहीत. महत्वाचं म्हणजे होणाऱ्या चर्चेत मुद्दामहून कुठलेही ‘खोटे’ (हातात पेपर,तोंडात डेट्स टाइप्स) पुरावा म्हणून सादर केले जात नाहीत. गलती से मिस्टेक होऊन तसं केलं गेलंच आणि समोरच्या पार्टीने त्यातले दोष दाखवले तर तो खोटा, बेसलेस मुद्दा, गळ्याला ताण देत तसाच पुढे नं रेटता मागे घेऊन त्याएवजी दुसरा तर्कसंगत मुद्दा उपस्थित करून चर्चा केली जाते. वादविवादात संवाद होतो. खंडन होतं मंडन होतं. आणि ‘वाद’ फक्त एक नाही अक्रियवाद, अद्वैतवाद, अनिश्चयवाद, अज्ञेयवाद, कर्मवाद, गूढवाद, द्वैतवाद, द्वैताद्वैतवाद, नियतिवाद, भोगवाद, भौतिकवाद, मायावाद, संन्यासवाद, सांख्यवाद, ज्ञानवाद, ज्ञानसंरचनावाद इत्यादी इत्यादी खूप खूप सारे वाद असतात त्यावर चर्चा हवी असते.
...तर एकंदर आपली संस्कृती आणि आपलं तत्वज्ञान संस्कृत भाषेत आणि संस्कृतसदृश्य मराठी भाषेत शिकत असल्याचा ‘मी’ला फार अभिमान होता. पण आता ‘मी’ जे शिकतोय ते सगळं तो समजत होता त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळं आणि सखोल अभ्यासाशिवाय आकलनास सहजसाध्य नसल्या कारणाने ‘मी’च्या डोक्यावरून जायचं. पण ‘मी’नं इथेही मार्कीय गुणवत्तेचा कोड क्रॅक केलाच. त्याने वरील सर्व गोष्टी सरळ सरळ घासून पुसून मुखपाठच केल्या. वाद, जल्प, वितण्डा या तीन पदार्थांनी मिळून वादविवाद ही संकल्पना बनते हे त्याला आता मुजबानी याद होतं. ही चर्चेची प्राचीन भारतीय रीत आहे हे फक्त त्याला आधीपासून माहित होतंच. बाकी मग वाद, जल्प, वितण्डा यांना वादाचे प्रकार मानले जाते. जो ‘वाद’ शास्त्रोक्त पद्धतीने, नियमाप्रमाणे न होता त्यात बाचाबाची होते किंवा पदोपदी दुसऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवण्यात येते तेंव्हा त्यास "वितंडवाद' म्हंटले जाते याची माहिती त्याला इथे कळली बाकी ती वळली की नाही ‘मी’च जाणे. वितंडवादाचं सूत्र ‘मी’ने व्याख्या माहित होण्याआधीच ‘वाद’ या नावाने आपल्या नसानासात भिनवलं होतं. त्यामुळे सत्य काही असो ‘मी’ जे सत्य समजत होता त्याच ‘मी’च्या सत्याशी मी प्रामाणिक राहिला. आणि वितंडवादालाच ‘वाद’ म्हणतात हे ‘व्होल नेशन यु शुड नो’ असं वारंवार मोठमोठ्याने आरडून ओरडून प्रसंगी समोरच्यांचे आवाज दाबत सांगत राहिला. आणि ‘मी’ समर्थ, प्रय आणि परम कांतिमॅन झाला. आणि ‘मी पाडीन तोच आणि तिथेच उजेड’ हा त्याचा हिटाड पॅट्टर्न हल्ली जवळपास सर्वच माध्यमांनी अंगीकारला, मन:पूर्वक वरला. आणि ‘मी’ तीच माध्यमांची खरी भाषा असं म्हणत चेन मार्केटिंगच्या फ्लोने बघता बघता दिन दुणा रात चौगुणा ‘मी’ वाढला. ढो ढो प्रगती केली. आणि आज यत्रतत्रसर्वत्र ‘मी’ची जी कांती पसरलीय ती ‘मीतुम्ही’ २४/७ तिन्ही त्रिकाळ पाहत आहातच. तर आजीमाजीआईबाबाकाकाकाकूमामामामीताईदादामित्रमैत्रिणीनो आपला ‘मी’ उतला असेल, मातला असेल पण ‘चर्चा आणि त्यात चमकण्या’चा जो वसा ‘मी’ने घेतला होता तो आजपर्यंत त्याने सोडलेला नाही.
तर अशा रीतीने साठा उत्तराच्या दोन कहाण्या पाचा उत्तरे सफळ संपूर्ण.
तर तुम्हीसामान्यगुणीजनहो ‘मी’च्या दोन्ही कथा वाचल्यात असे समजून म्हणजेच तुम्हाला गृहीत धरून या कथेच्या बोधाकडे ‘मी’ वळतो.
‘मी’ भारी, मी विचारी, मी सर्वज्ञ, मला पहा फुलं वहा.
मान्य नसेल तर सर्व जगात उजवी आपली वादाची चर्चेला परंपरा आहेच. प्रतिष्ठा, अनुशासन आणि परंपरेच्या स्थंबाच्या खाली येवून बोलण्याचा अधिकार वापरत वादसंवादाला तयार व्हा. फक्त चर्चेचा विषय, चर्चेची मांडणी, चर्चेतील प्रश्न, चर्चेचा निष्कर्ष सगळं ‘मी’ ठरवणार. तुम्ही फक्त ‘मम’ म्हणायचं. म्हणा ‘मम’
माझा ‘मी’ :- भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशीं देऊं
लेखकाचा संपर्क - ९८२००४५८२४
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.