आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर - गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस हद्दीतील नरेकसा जंगल परिसरात सुरू असलेल्या नक्षलवाद्यांच्या कँपजवळ पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी पहाटे झालेल्या जोरदार चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले, तर चार नक्षलवादी जखमी झाले. या कँपमध्ये नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य आणि १ मे रोजीच्या पोलिस हत्याकांडाचा सूत्रधार भास्कर हादेखील सहभागी होता, अशी माहिती आहे. या घटनेत तो जखमी झाला की कसे हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरची तालुक्यातील नरकसा जंगल परिसरात नक्षलवाद्यांचा कँप सुरू असल्याची माहिती शुक्रवारीच गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शनिवारी गडचिरोली पोलिसांचे सी-६० पथक या कँपकडे रवाना करण्यात आले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास सी-६० पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये कँपजवळच जोरदार चकमक झडली. या चकमकीत एक महिला आणि एक पुरुष असे दोन नक्षलवादी ठार झाले, तर पाच ते सहा नक्षलवादी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सी-६० पोलिस पथकाकडून होणारा प्रतिकार पाहून नक्षलवाद्यांनी कँप सोडून पळ काढला. मात्र, चकमकस्थळावर पोलिसांना दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह, काही शस्त्रे व नक्षलवाद्यांचे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांंगितले. ‘या कँपमध्ये नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य झोन समितीचा सदस्य व कुख्यात नक्षलवादी भास्कर याचाही समावेश होता. चकमकीत तो जखमी झाला की कसे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही..’ अशी माहिती पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी दिली. १ मे रोजी गडचिरोलीच्या जांभुळखेडा येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून पोलिस वाहन उडवून दिले होते. त्या घटनेत १५ पोलिसांसह १६ जण शहीद झाले होते. भास्कर हा या घातपाती कारवाईचा सूत्रधार होता, असे गडचिरोली पोलिसांना वाटते.
निवडणुकीच्या वेळी घातपाताचा डाव
ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांची घातपाताची योजना होती, असा गडचिरोली पोलिसांचा दावा आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह गडचिरोली येथे आणले जाणार असून तेथेच त्यांची ओळख पटवली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.