आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवजड वाहतुकीने घेतला पुन्हा दोन जणांचा बळी; महाविद्यालयीन तरुणीसह वृध्दाला चिरडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- बंदी असतानाही शहरात राजरोसपणे प्रवेश करणाऱ्या अवजड वाहतुकीने गुरुवारी सकाळी महाविद्यालयीन तरुणीसह एका वृध्दाचा बळी घेतला. नगर-पुणे महामार्गावरील केडगाव येथे गुरुवारी सकाळी ही घटना घडली. अवजड वाहतुकीने वर्षभरात २४ जणांचा बळी घेतला आहे. वाहतूक पोलिसांकडून अभय मिळत असल्यामुळेच ही अवजड वाहने राजरोसपणे शहरातून प्रवेश करत आहेत. 


केडगाव येथे एकापाठोपाठ घडलेल्या दोन अपघातांमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे ५ च्या सुमारास केडगाव येथील कल्याण विठोबा अनभुले (६१) यांना केडगाव वेशीसमोर अवजड वाहनाने धडक दिली, त्यात ते जागीच ठार झाले. ही घटना घडून तीन तास उलटत नाहीत, तोच सकाळी साडेसातच्या सुमारास अनामिका अविनाश गायकवाड (२१, रा. पाच गोडावून, शाहूनगर रोड, केडगाव) या तरुणीला अंबिकानगर बसस्थानकाजवळ अवजड वाहनाने चिरडले. एकापाठोपाठ दोन अपघात झाल्याने केडगावमधील जमाव घटनास्थळी जमा झाला. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नगर-पुणे मार्गावर ठिय्या देत रास्ता रोको सुरू केला. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्ण ठप्प झाली. जोपर्यंत जडवाहतूक शहरातून बंद होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा जमावाने दिला. 


कोतवालीचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे व वाहतूक निरीक्षक अविनाश मोरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी मोबाइलवर चर्चा करण्यात आली. अखेर शहर हद्दीतून अवजड वाहनांना प्रवेश न देण्याचे आश्वासन शर्मा यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, अपघातात ठार झालेली तरुणी अनामिका ही आपल्या स्कुटीवरून क्लाससाठी चालली होती, तर अनभुले हे वृध्द बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी होते. दोघांवरही गुरुवारी सकाळी काळाने घाला घातला. नगरसेवक दिलीप सातपुते, माजी नगरसेवक अंबादास गारूडकर, शिवाजी लोंढे, संजय लोंढे, मनोज कोतकर, भूषण गुंड, अमोल येवले, हर्षवर्धन कोतकर, विजय पठारे, सागर सातपुते आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.


दरम्यान, विळद, वाळुंज या बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे त्यामुळे अवजड वाहतूक शहरातून वळवलेली आहे. मात्र, नवरात्रोत्सव, वाहतूक काेंडी, अपघात व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न िनर्माण होऊ नये, यासाठी ही वाहतूक निंबळक-केडगाव, शेंडी बायपास अशी वळवण्याचे आदेश पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिले आहेत. 


वाहतूक पोलिसांचे अभय 
नगर-औरंगाबाद महामार्गावरील शेंडी येथून बायपास रस्ता असतानाही सर्व अवजड वाहने शहरातूनच पुढे जातात. मोठे कंटेनर, वाळूचे ट्रक, डंपर, दुधाचे टँकर, टेम्पो या अवजड वाहनांमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यात अनेकांना अपंगत्व आले, तर काहींचा जीव गेला. अवजड वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारे वाहतूक पोलिस मात्र या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आहेत. कारवाईसाठी अवजड वाहन थांबवले, तरी चिरीमिरी घेऊन ते वाहन सोडून दिले जाते. 


वर्षभरात २४ जणांचा बळी 
बायपास रस्ता असतानाही सात राष्ट्रीय महामार्गांवरील अवजड वाहतूक शहरातून सुरू आहे. पोलिसांनी या वाहतुकीकडे डोळेझाक केल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. महिनाभरापूर्वी नगर-मनमाड रस्त्यावरील हॉटेल ओबेरॉयसमोर भरधाव वेगात अालेल्या दुधाच्या टँकरने निवृत्त प्राध्यापकास चिरडले होते. चार महिन्यांपूर्वी याच ठिकाणी हॉटेल दामोधरच्या कर्मचाऱ्यास कंटेनरने उडवले होते. या अवजड वाहतुकीने गेल्या वर्षभरात २४ जणांचा बळी घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...