आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घाटाच्या उतारावर ब्रेक फेल, तरीही वारकऱ्यांच्या सूचना दुर्लक्षून दामटलेला जेसीबी दिंडीत घुसला, 24 जण जखमी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : पंढरपूरहून आळंदीकडे निघालेल्या पायी पालखी साेहळ्यात ब्रेक फेल झालेला जेसीबी घुसल्याने दिंडीतील वारकरी, वाहने चिरडली गेली. पुण्याजवळील दिवे घाटात मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात दाेन वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज साेपान महाराज नामदास (३६) व अतुल महाराज आळशी (२४) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. या दाेघांवर आळंदीत अंत्यसंस्कार होतील. ही माहिती प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी दिली. हडपसर येथील नोबेल रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. जेसीबीचा चालक निरंजनकुमार दास याला पाेलिसांनी अटक केली आहे. भाजपने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली.

घाटाच्या उतारावर ब्रेक फेल, तरीही वारकऱ्यांच्या सूचना दुर्लक्षून दामटलेला जेसीबी दिंडीत घुसला, २४ जण जखमी


कार्तिकी वारीसाठी आळंदीकडे निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या दिंडी साेहळ्यात ब्रेक फेल झालेला जेसीबी घुसल्याने दाेन जणांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले. मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास पुण्याजवळील दिवे घाटात हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज साेपान महाराज नामदास (३६) व अतुल महाराज आळशी (२४) यांचा समावेश आहे. ब्रेक निकामी झालेला जेसीबी घाटातील उतारावर आणू नकाेस, अशी सूचना वारकऱ्यांनी चालकाला केली हाेती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून त्याने जेसीबी दामटल्याने दाेन वारकऱ्यांच्या जिवावर बेतले. निष्काळजी जेसीबीचालक निरंजनकुमार दास (३२, मूळ रा. बिहार) याला पाेलिसांनी अटक केली आहे.


दरवर्षी कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरहून आळंदीला वारी निघते. त्यानुसार १२ नोव्हेंबर रोजी पौर्णिमेला दुपारी संत नामदेव महाराज पालखी दिंडी पंढरपूहून आळंदीकडे मार्गस्थ झाली. ही दिंडी २० नाेव्हेंबर राेजी आळंदीत दाखल हाेणे अपेक्षित हाेते. तेथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी साेहळ्यात हे वारकरी सहभागी हाेत असतात. त्यानुसार मजल दरमजल करत साेमवारी रात्री ही दिंडी सासवडला आली हाेती. तिथेच वारकऱ्यांनी मुक्काम केला व मंगळवारी सकाळी पुढील प्रवासासाठी पालखी निघाली हाेती. राज्यभरातील सुमारे एक ते दीड हजार वारकरी या दिंडीत सहभागी झालेले आहेत. 


पुण्याजवळी दिवे घाटात सकाळी नऊच्या सुमारास वारकरी आले हाेते. घाट सुरू हाेण्यापूर्वी घाटमाथ्यावर सर्वजण चहापानासाठी थांबले होते. तेथून काही अंतरावरच एक जेसीबी एका दुचाकीला धडक देऊन थांबला होता. या अपघाताची माहिती घेतली असता या जेसीबीचे ब्रेक निकामी झाल्याचे वारकऱ्यांना कळले हाेते. त्यामुळे दिंडी पुढे जाईपर्यंत जेसीबी घाटात उतारावर आणू नकाेस, अशी विनंती वारकऱ्यांनी जेसीबीच्या चालकाला केली हाेती. त्याने ती एेकलीही. मात्र अर्धा तास थांबल्यानंतर चालकाने पुन्हा जेसीबी चालू केला व पुढे जाऊ लागला. घाटाचा उतार असल्यामुळे चालकाचे वाहनावर नियंत्रण राहिले नाही. जेसीबीचा वेग वाढला व त्याने एका रिक्षाला धडक दिली. काही क्षणांतच वारकऱ्यांच्या दिंडीत अनियंत्रित जेसीबी शिरला व काही जण या वाहनाखाली आले. त्यात २४ जण जखमी झाले तर दाेघांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघातामुळे एकच हलकल्लाेळ उडाला. जखमींना तातडीने हडपसर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. यापैकी विष्णू हुलवळ आणि शुभम आवारे या दाेन वारकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे.
दिवे घाटात अपघातानंतर वारकरी व परिसरातील नागरिकांनी जेसीबी चालकाला घेराव घालून जाब विचारला.

जखमींची नावे....  
विष्णू सोपान हुलवळ (३५), शुभम नंदकिशोर आवारे (२३), दीपक अशोक लासुरे (१९), गजानन संतोष मानकर (२०), वैभव लक्ष्मण भराटे (२८), अभय अमृत मोकमपल्ले (१९), कीर्तिमान प्रकाश गिरजे (२३), आकाश माणिकराव भट्टे (३०), ज्ञानेश्वर निवृत्तीराव कदम (४०), गोरोबा जागडे (३५), विनोद लहासे (३०), नामदेव पुंजा सगर (३४), सोपान म्हाळस्कर (२५), गजानन सुरेश मानकर (२०), नामदेव सगर (३४), सोपान नेमिनाथ मासळीकर (२५ ), दीपक अशोक लासुरे (१९).

दु:ख विसरून सुरूच राहणार दिंडी : बंडातात्या कराडकर
नामदेव महाराजांचे सतरावे वंशज साेपान महाराज नामदास (३६) यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी आळंदीत इंद्रायणी नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी माेठ्या संख्येने वारकरी उपस्थित हाेते. दरम्यान, या अपघातामुळे वारकऱ्यांवर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. मात्र तरीही दिंडी साेहळा पुढे सुरूच राहिल, अशी माहिती कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी दिली. तर अतुल महाराज आळशी यांच्या पार्थिवावर खेड तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.