आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथे कधी पोहोचणार न्यूटन? गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील दोन वास्तवदर्शी चित्रे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन काटे  

गडचिरोली - आज राज्यभरात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची लगबग सुरू आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम शंभरावर पाडे व तीसएक गावे निवडणूक प्रक्रियेपासून कोसो दूर आहेत. त्यांना निवडणूक, मतदान आणि उमेदवार या कशाचाच पत्ता नाही. परिस्थितीशी झगडून लोकांत मतदानाविषयक जागरुकता घडवून आणणारा ‘न्यूटन’ येथे कधी पोहोचणार असाच प्रश्न आहे, तर दुसरीकडे, याच जिल्ह्याच्या एका भागात मात्र ६० गावे अशीही आहेत जेथे मतदार जीव धोक्यात घालून १० ते १५ किलोमीटरची पायपीट करत आपला हक्क बजावत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात २-३ किंवा ५-६ घरांचे पाडे भरपूर आहेत. मात्र तेथील ग्रामस्थांचा रोजच्या जगण्याचा संघर्ष वेगळा आहे. भामरागड आहेरी तालुका आणि या तालुक्याच्या आजूबाजूच्या परिसरात विरळ ठिकाणांवर वसलेल्या शंभरावर पाडे आणि सुमारे तीस गावात निवडणुकीची माहितीही नाही. जनजागृतीसाठी ना प्रशासन पोहोचले, ना सुरक्षेसाठी पोलिस, या भागात एकाही उमेदवाराने साधा प्रचारही केला नाही.

तालुक्यापासून १० किमीवर, पण.. : 
अहेरीहून १० किलोमीटरवर जिमेला हे सुमारे ५०० मतदारांचे गाव आहे. येथे न प्रशासन पोहोचले, ना उमेदवार. येथील सर्व मतदारांची नावे मतदार यादीत आहेत, पण केंद्र ८ किमीवर असल्यामुळे आणि लोकांना माहिती नसल्याने ते मतदानाला जात नाहीत. जिल्ह्यात २०० ते ५०० पर्यंत मतदारसंख्या असलेली अशी ३० पेक्षा जास्त गावे आहेत. 
 

हवाई सेवा आणि ड्रोनचा वापर
अतिदुर्गम भागापर्यंत निवडणूक यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांना पोहोचवण्यासाठी ३ हेलिकॉप्टर ड्रोन कॅमेरे तैनात आहेत. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर ड्युटी असलेल्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारपासूनच हवाईमार्गे ठिकाणावर पाठवण्यात येत आहे. 

‘त्या’ चार गावांत दहशत कायम
छत्तीसगड भागातून नक्षली पुन्हा ‘अॅक्टिव्ह’ झाल्याचा संशय आहे. लोकसभेच्या वेळी गट्टा जांबिया गावाजवळ नक्षल्यांनी स्फोट घडवला. त्यामुळे येथे ४ दिवसांनी मतदान झाले होते. गर्देवाडा, वासेरी, पुस्कुटी, वांगेतुरईत प्रशासनही पोहोचू शकले नव्हते. नंतर ३,६८६ मतदारांपैकी ४५% म्हणजे १२१० मतदारांनी हक्क बजावला होता.

जेवणाचे डबे घेऊन केंद्रावर
भामरागड तालुक्यात वेगळे चित्र आहे. ६० गावातील मतदार एकत्रितरीत्या १० ते १५ किमीची पायपीट करून मतदान करतात. नक्षल्यांचे आवाहन झुगारून, पोलिस-प्रशासनाच्या मदतीने ते मतदानाचे कार्य पार पाडतात. यात्रेला निघावे तसे ते कुटुंब आणि गावकरी जेवणाचे डबे घेऊन केंद्रावर पोचतात आणि मतदान करतात.

नक्षलींच्या पत्रकांची दहशत
नक्षलवाद्यांनी याही निवडणुकीवर बहिष्काराची धमकी दिली आहे. आलापल्ली तालुक्यासह नक्षल प्रभावित अनेक गावात २ दिवसांपासून निवडणुकीवर बंदी घाला, अशी पत्रके व बॅनर दिसू लागली आहेत.

केंद्र १० ते १५ किमीवर
वाड्या-वस्त्या आणि छोट्या गावातील ग्रामस्थांची नावे मतदार यादीत आहेत. त्यांच्या मतदानाची सोय प्रशासनाकडून जवळपासच्या केंद्रावर केेली जाते. छोटी गावे- पाड्यांवर या प्रक्रियेची माहितीच नसते. त्यामुळे १०-१५ किमीवरील केंद्रावर जायची जोखीम ग्रामस्थ टाळतात. 
 

नदीपलीकडील गावात डोंग्याने पोहोचली पथके
गडचिरोली  - गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावे नदी, नाल्यांनी वेढलेली आहेत. यावर अजूनही पूल झालेले नाहीत. त्यामुळे डोंग्याने प्रवास करावा लागतो. निवडणूक विभागाने एटापल्ली तालुक्यातील अशा गावांसाठी स्वतंत्र डोंगे पाठवले आहेत. 
एटापल्ली तालुक्यातील सर्वच गावे जंगलांनी व्यापले आहेत. बांडे ही या तालुक्यातील प्रमुख नदी आहे. सदर नदी १०० पेक्षा अधिक गावांना वेढा टाकून पुढे जाते. या भागातील नागरिकांना नदी, नाल्यातूनच प्रवास करावा लागतो. या वेळी आत्ताही पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी, नाले पाण्याने भरले आहेत. पाण्यामधून पोलिंग पार्टीला पाठविणे धोक्याचे ठरू नये यासाठी निवडणूक विभागाने ट्रकवर डोंगे सोबतच निवडणूक कर्मचारी पाठविले. एटापल्लीपर्यंतच ट्रक पोहोचला. पुढे ट्रक नेणे अशक्य असल्याने सदर डोंगे ट्रॅक्टर व बैलबंडीच्या साहाय्याने नेण्यात आली. डोंग्यांसोबतच डोंगे चालवणाऱ्यांची टीमही पाठवली आहे.