आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रांताधिकाऱ्यांवर हल्ला करणारे दोघे वाळूतस्कर अद्याप फरारच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमालकांनी प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांच्यावर शनिवारी रात्री ढवळपुरी येथे हल्ला केला. आरोपी सुनील चौधरी व अशोक चौधरी चार दिवसांनंतरही पोलिसांना सापडलेले नाहीत. 


वाळूतस्करीची माहिती मिळाल्यावर प्रांताधिकारी दाणेज हे ४ ऑगस्टला रात्री ढवळपुरी येथील वाघवाडी परिसरात गेले होते. ट्रॅक्टरमधून अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तो ट्रॅक्टर थांबवला. ट्रॅक्टरमालक सुनील चौधरी व अशोक चौधरी यांना त्यांनी ट्रॅक्टर तहसील कार्यालयात आणण्यास सांगितले. तथापि, या दोघांनी ट्रॅक्टर सुरू करून प्रांताधिकारी दाणेज यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत दाणेज व पथकातील कर्मचारी बाजूला झाल्याने बचावले. नंतर आरोपी ट्रॅक्टर घेऊन पळून गेले. याबाबतची फिर्याद पारनेर पोलिस ठाण्यात देण्यात आली असून चार दिवस उलटले, तरी या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. तालुक्यात वाळू तस्करांची दहशत वाढली आहे. हे वाळू माफिया प्रशासनाला दाद देत नाहीत. अनेक वेळा पथकावर हल्ले झाले आहेत. या आधीही तहसीलदार भारती सागरे यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले आहेत. आता प्रांताधिकाऱ्यावरच वाळूमाफियाने हल्ला केल्याने तालुक्यात खळबळ उडाली. प्रांताधिकाऱ्यांवर हल्ले होत असतील, तर कर्मचाऱ्यांचे काय, असा सवाल केला जात आहे. टाकळी टोकेश्वर पट्ट्यात अवैध वाळूउपसा केला जातो. त्यांच्यावर जुजबी कारवाई होते, पण काही महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमताने चोरट्या वाळू वाहतुकीसाठी मदत होते, असा आरोपही होत असतो. प्रांताधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे यापुढे तालुक्यात अवैध वाळूउपसा व वाहतूक करणारे वाळूमाफिया यांच्यावर काय कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. 


त्या ट्रॅक्टरमालकांचा शोध सुरू आहे... 
प्रांताधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला करणाऱ्या ट्रॅक्टरमालकांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. अद्याप कोणालाही अटक झाली नसून लवकरच अटक करण्यात येईल.
-  हनुमंतराव गाडे, पोलिस निरीक्षक, पारनेर. 


कठोर कारवाई करणार 
आम्ही त्या ठिकाणी अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलो होतो. संबंधित ट्रॅक्टर पकडल्यानंतर त्याला ट्रॅक्टर घेऊन तहसील कार्यालयात बोलवले होते. त्याने ट्रॅक्टर चालू करून आमच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. आम्ही बाजूला झालो. त्याने वाळू तेथेच खाली केली व अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. यापुढे अवैध वाळूउपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही केली जाईल.
- गोविंद दाणेज, प्रांताधिकारी, श्रीगोंदे व पारनेर. 

बातम्या आणखी आहेत...