आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या दोन सख्ख्या बहिणींची सुटका, तिघांना अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला : तालुक्यातील गुजरखेडे येथील दोन सख्ख्या बहिणींना आमिष दाखवत पळवून नेऊन त्याच्या बदल्यात दोन कोटींची खंडणी मागत जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तिघा संशयितांच्या मुसक्या तालुका पोलिसांनी आवळल्या आहेत. खंडणीसाठी अपहरण केलेल्या दोघा बहिणींनाही त्यांच्या तावडीतून सोडविण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. याबाबत तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील गुजरखेडे येथील एका व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या दोन मुलींना संशयित आरोपी राहुल विजय पवार (२०, रा. नवसारी, मनमाड) याने ८ मार्चच्या रात्री आमिष दाखवत अपहरण केले. त्यानंतर त्याने या दोघींना बहिणींना तृतीयपंथी असलेल्या पूजा ऊर्फ दिनेश राजेंद्र सोळसे (रा. पोहेगाव, ता. कोपरगाव) याच्याकडे पोहोच केले. रोहित लोहिया (२१, रा. शंकरनगर, ता. कोपरगाव) याला दिनेश सोळसेसह दोघा मुलींविषयी माहिती सांगितली. मुख्य संशयित आरोपी राहुल पवारने रोहित लोहिया याला अपहरण केलेल्या मुलींच्या वडिलांना फोन करायला लावून फिर्यादी मुलींचे वडिलांकडे तब्बल दोन कोटींची खंडणी मागितली. दोन कोटी रुपये न दिल्यास मुलींना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलींच्या वडिलांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत मुलींचे अपहरण आणि खंडणीची तक्रार दाखल केली. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पाेलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक अनिल भवारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करत मुलींच्या शोधासाठी पथक कोपरगाव, शिर्डी येथे रवाना केले. पथकातील पोलिस उपनिरीक्षक शिंदे, शिपाई आबासाहेब पिसाळ, पारधी, फसाले तसेच महिला पोलिस उषा आहेर, शारदा कदम यांना सोबत घेत ९ मार्चला रोजी रात्री शिर्डी बसस्थानक परिसरात सापळा रचून आरोपींना शिताफीने अटक केली. आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच अपहरण केलेल्या मुलींना डांबून ठेवलेल्या ठिकाणची माहिती दिली. पोलिसांनी मध्यरात्री पोहेगाव-कोपरगावरोडवरील तळेगाव शिवारातून मुलींची सुखरूप सुटका केली. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 

रोहितच्या अावळल्या मुसक्या

रोहित लोहिया तालुका पोलिसांना गुंगारा देत होता. कधी कोपरगाव तर कधी पोहेगावमध्ये दडून बसत होता. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, वावी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, गुन्हे शाखेचे हवालदार शांताराम घुगे, रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांनी रोहितच्या मुसक्या आवळल्या.

दाेन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या संशयित आरोपींसमवेत पोलिस निरीक्षक अनिल भवारी.