आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन जणांची आत्महत्या; तरूणीने वसतिगृहात घेतला गळफास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर/ सोलापूर- मराठा आरक्षणासाठी अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी राधाबाई महिला महाविद्यालयाच्या वसतिगृहात घडली. किशोरी बबन काकडे (१६ वर्षे, कापूरवाडी, ता. नगर) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. 


प्राचार्य दिनकर पाटील यांच्यासह इतर प्राध्यापकांनी तोफखाना पोलिसांना कळवले. पंख्याला दोरीने गळफास घेत किशोरीने जीवन संपवले. हा प्रकार पाहून काही जणांनी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना व पोलिसांना बोलावून घेतले. काळ्या रंगाची पाटी व आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी हस्तगत केली. 


मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे चिठ्ठीत लिहिलेले आहे. किशोरीने ११ वी शास्त्र शाखेत प्रवेश घेतला होता. दहावीला तिला ८९ टक्के गुण होते. परंतु आरक्षण नसल्यामुळे तिला ८ हजार रुपये प्रवेश शुल्क भरावे लागले. याच वैफल्यग्रस्त अवस्थेत तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. पोलिस अिधक माहिती घेत आहेत. 


काय लिहिले आहे चिठ्ठीत? 
मला दहावीत ८९ टक्के गुण मिळूनही अनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला नाही. चांगले गुण असूनही विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घ्यावा लागला. त्यासाठी अाठ हजार रुपये भरावे लागले. याउलट ७६ टक्के गुण असलेल्यांना केवळ एक हजार रुपयांत अनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला. केवळ मराठा समाजात जन्माला आल्याने ही वेळ आली आहे. मराठ्यांचा महाराष्ट्र असूनही ही वेळ मराठ्यांवर आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी माझे बलिदान देत आहे, असे किशोरीने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. 

 

पंढरपुरात बेरोजगाराने लग्न जमत नसल्याने जीवन संपवले 
पंढरपूर: मराठा आरक्षणासाठी लक्ष्मी टाकळी येथील अमोल विष्णू कदम (३०, रा. प्रतापनगर) या तरुणाने साेमवारी (दि. १०) सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी अमोलने चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये मराठा समाजाला आरक्षण नाही. त्यामुळे आपण बेरोजगार आहोत, बेरोजगार असल्यामुळे माझे लग्न जमत नाही. या कारणामुळे मी आत्महत्या करत असून या घटनेला कोणासही जबाबदार धरू नये, असे चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे. अमोलचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित भाऊ, विवाहित बहिण असा परिवार आहे. त्याच्या दोन्ही धाकट्या बहिण भावाचे लग्न झालेले आहे. आपले लग्न होत नसल्याने तो निराश होता. 

बातम्या आणखी आहेत...