आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा दिवसांत आढळले दोन जिवंत अर्भक; वैरीण मातांचा लागेना तपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना/धावडा : जालना जिल्ह्यात पंधरा दिवसांत विविध दोन ठिकाणी जिवंत अर्भक आढळले आहेत. जालना शहरातील चंदनझिरा परिसरात स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळले होते. तर बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वाढोण येथील साईबाबा मंदिराच्या पाठीमागील गवतात पुरुष जातीचे अर्भक आढळून आले. दोन्ही अर्भकांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, पोलिस प्रशासनाकडून या अर्भकांच्या मातांचा शोध घेतला जात आहे.

वाढोणा येथील रणजितसिंग कोकुळे हे आपली जनावरे चारून गोठ्याकडे परतत असताना येथील गावाशेजारील साई मंदिराच्या पाठीमागे गवतात रडण्याचा आवाज आला. गवत बाजूला सारून पाहिले असता पुरुष जातीचे नवजात अर्भक रडताना दिसून आले. त्यांनी लगेच पदमसिंग गोमलाडू, सरपंच राजेश घुणावत, ग्रामपंचायत सदस्य कुलदीप बारवाल यांना माहिती दिली. वाढोणा येथील आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका अर्चना पवार, आशा कल्पना राजपूत यांना बोलावून घेतले. दारासिंग राजपूत, लैलाताई तडवी यांनी या नवजात शिशूला उचलून उपकेंद्रात नेले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पारध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांना माहिती दिली. यानंतर ग्रामस्थांनी त्या अर्भकाला उपचारासाठी बुलडाणा रुग्णालयात दाखल केले. हे अर्भक शिशुगृहात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. दरम्यान, चंदनझिरा येथील अर्भकाच्या मातेचा शोध लागला नसून, वाढोणा येथील या अर्भकाच्या मातेचाही तपास लागलेला नाही.