आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत कोरोनाचे दोन संशयीत रुग्ण आढळले, शासकिय रुग्णालयात दाखल; दोघांचेही स्वॅब नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागरीकांना घाबरून जाऊ नये- डॉ.किशोर श्रीवास, जिल्हा शल्यचिकीत्सक

हिंगोली- शहरात कोरोनाचे दोन संशयीत रुग्ण शनिवारी (ता. 14) आढळून आले असून त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तज्ञ वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांनी सांगितले.


राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याने हिंगोलीतही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार, प्रभारी सीईओ धनंजय माळी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांंच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांकडून जागृती केली जात आहे. तसेच आरोग्य विभागाकडून उपाय योजना हाती घेतल्या जात आहे. शासकिय रुग्णालयात जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. एन. डी. करवा यांचे मार्गदर्शनाखाली विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे.


दरम्यान, आज सकाळी घसा दुखी, ताप, सर्दीचे दोन रुग्ण शासकिय रुग्णालयात दाखल झाले होते. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांना विशेष वॉर्डमधे दाखल करून घेतले आहे. यापैकी एक जण दोन दिवसांपुर्वीच पुणे येथून हिंगोलीत आला आहे. तर एक जण दुबई येथून आला आहे त्याला आता त्रास होत असल्याने तो रुग्णालयात आल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णालयाकडून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यांच्या अहवालाकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.

नागरीकांना घाबरून जाऊ नये- डॉ.किशोर श्रीवास, जिल्हा शल्यचिकीत्सक


हिंगोली शहरात दोन संशयीत रुग्ण आढळून आले असले तरी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अद्यापही स्पष्ट नाही. त्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करून घेतले आहे. वैद्यकिय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. नागरीकांनी घाबरून जाऊ नये. मात्र हात स्वच्छ धुणे, शिंकतांना व खोकलतांना तोंडाला रुमाल धरणे, सर्दी, खोकला, तापीची लक्षणे दिसल्यास रुग्णालयात तपासणी करून घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...