आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये उघड्या विद्युत तारांचा झटका लागून सासू-सुनेचा मृत्यू तर नातवंडे गंभीर जखमी, घटनेनंतर नागरिक संतप्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निलेश अमृतकर

नाशिक- सिडको भागातील धोकादायक उघड्या विद्युत तारांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच पुन्हा एकदा उत्तमनगर, शिवपुरी चौकात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सासू-सूनेला विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवार(दि.29) सकाळी सर्वत्र नवरात्रोत्सवाची वातावरण असतानाच केदारे कुटुंबवर काळाने घाला घातला. घटनेत सुरूवातीला सूनेला वीजेचा धक्का लागल्याचे बघून त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात वृद्ध सासूही वीजेच्या प्रवाहात अडकल्या. त्यापाठोपाठ नातवंडांनी लाकडी काठीचा वापर करून त्यांना काढण्याचा प्रयत्न करताच तोही फेकला जावून भाऊ-बहीण गंभीररीत्या भाजले आहेत.
शहरातील शिवपुरी चौकात रविवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेबाबत परिसरातील नागरिक व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारे कुटुंबातील सिंधुबाई शांताराम केदारे(40) या कपडे वाळवण्यासाठी घराच्या गच्चीवर गेल्या असता त्यांना घराला लागूनच असलेल्या उच्च वीज प्रवाहाच्या तारेच्या झटका बसला. त्या एकदम ओरडल्याने जवळच असलेल्या त्यांच्या सासूबाई सोजाबाई मोतीराम केदारे (80)यांनी सूनेला ओढण्याचा प्रयत्न करताच त्यांनाही वीजप्रवाहाचे झटका बसला.
या घटनेत दोघेही गंभीर भाजल्याने जागेवरच कोसळल्या. त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या मदतीला धावून गेलेले नंदिनी शांताराम केदारे (23) व शुभम शांताराम केदारे(19) या भाऊ बहिणींना ही वीज प्रवाहाचा झटका बसल्याने तेही फेकले गेलेत. घटनेनंतर सासू-सूनेला रुग्णालयात नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. तर भाऊ-बहिणीला गंभीर अवस्थेत जिल्हा रूग‌्णालयात उपचारासाठी दाखल करण‌्यात आले. घटस्थापनेच्या दिवशी सर्वत्र सणाचा आनंद व धावपळ सुरु असताना केदारे कुटुंबावर मात्र काळाचा घाला बसला. एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळला.
घटनेचे वृत्त समजताच प्रभागाचे नगरसेवक, विधानसभेच्या इच्छुकांसह लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर लोकप्रतिनिधी व वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी जाब विचारत रास्ता रोको केला. सिडकोतील उघड्या वीजतारांमुळे आतापर्यंत 5 ते 6 नागरिकांनाचा मृत्यू झाला असून आणखी किती बळी जाण्याची मनपा प्रशासन व वीज वितरण कंपनी प्रतीक्षा करणार? असा संतप्त सवाल करत मनपासह वीज कंपनीच्या निष्काळजीपणा वरून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. परिस्थिती तणावपूर्ण होत असतानाच वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत परोपकारी यांनी जादा कुमक तैनात करून नागरिकांना शांततेचे आवाहन केले. त्याचबरोबर योग्य ती चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले.