आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांत दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या; जिल्ह्यात यंदा आत्तापर्यंत ७४ घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक / दिंडोरी- जिल्ह्यात दोन दिवसांत दोन तरुण शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. दिंडोरी आणि मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका आत्महत्येची नोंद झाली असून, जिल्ह्यात यंदा नऊ महिन्यांतच तब्बल ७४ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. 


शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्यात तयार नसताना त्यात आता तरुणांचे प्रमाण वाढल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. दिंडोरी तालुक्यातील पालखेड येथील शेतकरी संदीप अशोक कदम या ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने मंगळवारी पहाटे विष प्राशन करून आत्महत्या केली. याबाबतचा प्राथमिक अहवाल तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे. संदीप सकाळी द्राक्षबागेत विषारी औषध प्राशन करून पडलेल्या अवस्थेत त्याच्या काकांना आढळला. पोलिसांनी पाहणी केल्यानंतर त्यांना सुसाइड नोट मिळाली असून त्यात कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. संदीप घरातील सर्व व्यवहार पहायचा. त्याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. 


मालेगाव तालुक्यातील खलाणे येथे मोठाभाऊ अण्णा शेलार या ३५ वर्षीय शेतकऱ्याने २३ सप्टेंबर रोजी रात्री शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. परंतु, त्याने कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्याची शक्यता मालेगाव तहसील विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार आता तहसीलदार कार्यालयाने आपला तपास सुरू केला आहे. दरम्यान, याबाबतचा प्राथमिक अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली. या दोन घटनांमुळे जिल्ह्यात चालू वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ७४ झाली आहे. सप्टेंबर महिन्यांत सात शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. गत महिन्यात सर्वाधिक १२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी आत्महत्यांची संख्या शतकपार झाली होती. यंदाही अद्याप वर्ष संपण्यास चार महिने बाकी असून, दरमहा सरासरी ८ ते ९ शेतकरी आत्महत्या होत असल्याने गतवर्षाच्या तुलनेत यंदा आकडा वाढण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...