आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा, धनगर आरक्षणासाठी मराठवाड्यात दाेन आत्महत्या; हुतात्मा घोषित करण्याची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीर्थपूरी / सेलू- ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ असे ३२ वेळा लिहून घनसावंगी तालुक्यात ४० वर्षीय व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केली. तर सेलू तालुक्यातील एका युवकाने आपल्या मित्राला एसएमएस करून धनगर समाज आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील गणेश तुकाराम नन्नवरे (४०)  यांनी शनिवारी रात्री ८ च्या सुमारास विष घेतले. त्यांच्या खिशात दोन पानांची चिठ्ठी सापडली असून त्यात ३२ वेळा आरक्षण मिळालेच पाहिजे असे लिहिलेले होते. दरम्यान, शासनाकडून हमीपत्र  मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मृताच्या नातलगांनी घेतला. या वेळी गणेश नन्नवरे यांना हुतात्मा घोषित करा, त्याच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत देऊन कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत घेण्याची मागणी नातलगांनी केली. 


सेलूत योगेश कारकेची आत्महत्या 
तालुक्यातील गोमेवाकडी येथील योगेश राधाकिशन कारके (२०) या युवकाने आडूला रुमालाने  गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलवरून मी धनगर समाजासाठी जीव देत आहे, असा संदेश  लिहून तो शिंदे नावाच्या व्यक्तीला पाठवण्याचा प्रयत्न केला. परंतु नेटवर्क नसल्याने तो संदेश पुढे पोहोचू शकला नाही. योगेशच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. नातेवाईक व समाजबांधवांनी मृतदेह पोलिस ठाण्यासमोर ठेवून ठिय्या मांडला. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी मयत योगेशच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत व कुटुंबातील एकास शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करू, असे पत्र दिले. 

बातम्या आणखी आहेत...