आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरूवात ४ हजार रुपये महिन्यापासून; आज वार्षिक तब्बल ४ कोटींची उलाढाल; वर्धेतील मित्रांची कथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ३२ हजार रूपये महिन्याची नोकरी सोडून दोन मित्रांनी घर गाठले. काही दिवसांसाठी सुटीवर आलो असे सांगून ग्राम पंचायतचे बंद पडलेले सौर पथदिवे दुरूस्तीची कामे घेतली. सुरूवातीला खासगी सावकारांकडून ५ रूपये शेकडा व्याजाने पैसे घेतले. ४ हजार रूपये महिन्यापासून सुरू झालेल्या उद्योगाची वार्षिक उलाढाल आज ४ कोटींपर्यत गेली आहे. वर्धेतील सुनील गुंडे आणि सचिन ढोणे या दोन मित्रांची ही प्रेरक कथा आहे. 


विद्युत अभियांत्रिकीत पदवी घेतलेल्या सुनील गुंडे याने सुरूवातीला पुण्यातील उर्जा फ्यूचर इंडिया प्रा. लि. कंपनीत ७ हजार रूपये महिन्यावर नोकरीची सुरूवात केली. तिथून नागपुरला एडीसीसी कंपनी जाॅईन केली. तिथे झपाटून काम केल्यामुळे ३२ हजार पगार झाला. पण नोकरीत मन रमत नव्हते. स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. एक दिवस नोकरी सोडून घर गाठले. काही दिवस सुटीवर आल्याचे सांगून ग्राम पंचायतचे बंद पडलेले सौर पथदिवे दुरूस्तीचे काम घेतले. कमाई फक्त चार हजार रूपये. सोबत मित्र सचिन ढोमणे यालाही घेतले. सुरूवातीला ५ रूपये शेकडा व्याजाने सावकारांकडून पैसे उचलले. आता कामांपासून फुरसत मिळत नाही. 


केळझर आणि हमदापुर येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले सुनील गुंडे आणि सचिन ढोणे हे तरुण उद्योजक. विद्युत अभियांत्रिकीची पदविका घेतल्यानंतर पुणे आणि नंतर नागपूर येथे चांगल्या पगाराची नोकरी करीत होते. सुनील गुंडे यांच्या मनात स्वतः चा व्यवसाय करण्याचे विचार सुरू होते. याच झपाटलेपणातून एक दिवस त्यांनी नोकरी सोडली. सचिन ढोणे या मित्राला सोबत घेऊन "एस अॅण्ड एस फ्युचर एनर्जी ट्रेडिंग कंपनी' २०१५ मध्ये सुरू केली. चांगल्या पगाराची नोकरी सोडल्यामुळे दोघांच्याही घरचे त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे घरून आर्थिक पाठिंब्याचा विचारही त्यांनी केला नाही. स्वतः जमवलेले पैसे थोडे थोडे वापरत त्यांनी काम सुरू केले. सुरूवातीला मिळेल ते काम स्वीकारले. 


मुद्रा योजनेमुळे बदलले जीवन
२०१७ मध्ये केळझर येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये या दोन मित्रांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेमधून कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला. उद्योगाचा व्यवस्थित प्रस्ताव तयार करून दिला. त्यांची कामाप्रति असलेली बांधिलकी पाहून बँकेने ३ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर लगेच वन विभागाचे सोलर पथ दिवे बसविण्याचे काम त्यांना मिळाले. तिथून या दोघांनी मागे वळून बघितलेच नाही. 


सात राज्यात झाला विस्तार 
नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीचे ४० लाखाचे मोठे काम त्यांना मिळाले. हे काम त्यांनी आंध्रप्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये जाऊन पूर्ण केले. आज त्यांची कंपनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातही सोलर पॅनल बसविण्याचे काम करते. डिसेंबर २०१७ मध्ये त्यांनी कंपनीचे कार्यालय वर्धेत सुरू केले, तेव्हा पहिल्यांदा कुटुंबीयांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. आज कंपनीची उलाढाल साडेचार कोटीपर्यंत पोहचली आहे. शिवाय ३ वर्षातच कंपनीला आयएसओ मानांकनही मिळाले आहे. दोघांनी सुमारे पंधरा जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.  

बातम्या आणखी आहेत...