आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फीमुळे घात; पितळखोरा लेणी कुंडात बुडून दोन युवकांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड - तालुक्यातील पितळखोरा लेणी येथील कुंडात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याेगेश विलास भाेंगळे (वय २०, रा. अांबा) व शरद रामचंद्र साळुंखे (वय २२, मुंडवाडी) असे मृत तरुणाची नावे आहेत. हे तरुण सेल्फी काढत असताना कुंडात पडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

कन्नड तालुक्यातील आंबा येथील युवक योगेश  भोंगळे  आणि मुंडवाडी येथील शरद  साळुंखे  हे दोघे औरंगाबाद येथून आले होते. दोघेही आते मामेभाऊ आहेत. दुपारी अंबातांडा येथे योगेश यांच्या घरी जाऊन नंतर पितळखोरा येथे गेले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोघेही पितळखोरा येथील पाण्याच्या कुंडाकडे गेले होते. त्यातच दोघेही सेल्फी काढत असताना पाण्यात पडल्याचे एका पर्यटक महिलेने बघितले. त्या महिलेने तत्काळ या घटनेची माहिती तेथील लेणी कर्मचारी साईनाथ काळे व इतर नागरिकांना दिली. नागरिकांनी घटनेची माहिती कन्नड ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक नेवसे, पोलिस जमादार जयंत सोनवणे, पोलिस पाटील साहेबराव तावरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन  पोहता येणाऱ्या नागरिकांना बोलावून कुंडात शोधकार्य सुरू केले. युवकांना बाहेर काढण्यासाठी दोन तास लागले.  वन विभागाच्या चेक नाक्यावरील पावतीवरून दोघांची ओळख पटली. त्यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी  डॉ. नीलेश आहिरे, डॉ. प्रवीण पवार यांनी तपासून मृत घोषित केले. दोघांच्या मृतदेहाची  उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक नेवसे हे करत आहे.
 

धोकादायक कुंडाचा प्रश्न ऐरणीवर
पितळखोरा खोरा या पर्यटनस्थळी असलेल्या या धोकादायक कुंडात पडून मागील काही वर्षांपासून अनेक घटना घडल्या आहे. मागच्या वर्षात याच दिवसात औरंगाबाद येथील महाविद्यालयीन तरुण तरुणी सेल्फी काढताना पाय घसरून कुंडात पडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. सतत पाणी वाहत  असल्याने कुंडाच्या आजूबाजूची जागा शेवाळून निसटती झाली आहे. या कुंडाच्या आजूबाजूला वन विभागाने संरक्षक कठडे किंवा तारेचे कुंपण लावण्याची मागणी  नागरिकांनी केली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...