आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे, अहमदनगरात काय होईल ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली-मिरज आणि जळगाव पाठोपाठ धुळे, अहमदनगर महानगरपालिकेची ९ डिसेंबरला निवडणूक होत आहे. जळगाव आणि सांगली मिरजमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांचा विश्वास दुणावला आहे. या दोन्ही महापालिकांच्या विजयाचे श्रेय मंत्री गिरीश महाजन यांना दिले जात आहे. निवडणुका जिंकून देणारा नेता म्हणून भाजपत महाजनांच्या फॉर्म्यूल्यावर चर्चा होत आहे. साहजिकच पक्षात अन्य नेत्यांच्या लोकप्रियतेचा आलेख घसरू लागला आहे. अर्थात, हा मुद्दा वेगळा असला तरी पक्षात त्याचीही चर्चा आहेच. धुळे, अहमदनगर महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी पुन्हा पक्षाने महाजनांवर जबाबदारी टाकली आहे. या दोन्ही शहरांध्ये सध्या राष्ट्रवादीचा प्रभाव चांगला आहे. तुल्यबळ आणि आडदांड उमेदवार याच पक्षांकडे आहेत. त्यामुळे महाजन फॉर्म्यूल्यानुसार त्यांनी अहमदनगर आणि धुळे शहरात अनेक गुन्हेगारी आणि गुंडगिरीची पार्श्वभूमी असलेल्या विद्यमान नगरसेवकांना, निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी दिली आहे, असा सर्रास अारोप विरोधक करत आहेत. आडदांड उमेदवारांच्या बळावर भाजपला धुळे,अहमदनगर येथेही सत्ता काबिज करता येईल, असा नेत्यांना विश्वास आहे. पण खरंच अशी स्थिती आहे का? धुळे आणि अहमदनगरमध्ये काय होईल? याची राज्यभरातील जनतेला आता उत्सुकता लागून आहे. 

धुळे महापालिका निवडणुकीचे चित्र पाहिलं तर अनेक पक्ष आणि संघटना रिंगणात उतरल्या आहेत. कुठेच अशी आमनेसामने सरळ लढत नाही. सर्वच प्रभागात तिरंगी, चौरंगी लढती आहेत. विशेष म्हणजे कोणत्याच पक्षाला सर्वच्या सर्व म्हणजे ७४ जागांवर उमेदवार देता आलेले नाही. काँग्रेस- राष्ट्रवादीची युती आणि सत्ता असली तरी त्यांनी केवळ ७० जागांवर उमेदवार दिले आहेत. भाजपने अनेक उमेदवार एेनवेळेस आयात केले असले तरी त्यांनाही केवळ ६४ उमेदवारच देता आले. निवडणुकीपूर्वीच धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी गुंडांना भाजपत प्रवेश नको म्हणून आवाज उठवला होता. त्यांना मुख्यमंत्र्यांसह पक्ष नेत्यांनीही दाद दिली नाही. त्यामुळे गोटेंनी खुले आव्हान देत निवडणुकीत रंग भरला आहे. शिवसेनेनेदेखील स्वतंत्र चूल मांडली आहे. त्यामुळे त्यांनीही त्यांची क्षमता असलेल्या ५० जागांवर उमेदवार दिले आहेत. एमआयएम, रासप, बसपा हेही खाते खोलण्यासाठी उत्सुक आहेत. भाजपने आडदांड उमेदवारांना घेऊन प्रचारात आघाडी घेतली असली तरी जळगाव, सांगलीसारखी अनुकूल स्थिती दिसत नाही. कारण बंडखोर आमदार अनिल गोटेंनी तर आव्हान दिले आहेच, सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचेही आव्हान आहेच. त्यामुळे भाजपच्या जागा वाढणार असल्या तरी एक हाती सत्ता मिळेल, असे त्यांचे स्वप्न असेल तर ते भंग होऊ शकते. कारण ‌विरोधकही तेवढेच प्रबळ आहेत. त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजप नकोच म्हणून छुप्या युतीही केल्या जात आहेत. आमदार गोटेंनी तर शिवसेनेच्या काही उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीही छुप्या पद्धतीने तेच करत आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, जयकुमार रावल हेही भाजपला विजय मिळावा म्हणून मनापासून कामाला लागले आहेत. मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग, महामार्गासाठी निधी आणला, असे ते सांगत आहेत. तसेच मंत्री गिरीश महाजन हे आपली फौज तुकडी, तुकडीने पाठवत आहेत. एकंदरीत भाजपची ताकद दिसत असली तरी आव्हान मात्र मोठे आहे. आमदार गोटेंनी गुं़डगिरीमुक्त शहर आणि विकासाचा अजेंडा दिला आहे. राष्ट्रवादीने भाजप कसे सुडाचे राजकारण करत आहे, हा प्रचाराचा मुद्दा बनवला आहे. त्यामुळे चुरस वाढून लढती अटी-तटीच्या होतील, असे वातावरण बनले आहे.

अहमदनगरमध्येही यापेक्षा वेगळे चित्र नाही. भाजपने आतापर्यंत राष्ट्रवादी, काँग्रेसच्या गुंडगिरीविरोधात जनतेच्या संरक्षणाची हमी दिली होती. पण त्यापैकीच काही गुंडांना त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेऊन निवडणुकीत उतरवले आहे. त्यामुळे नगरवासीयांमध्ये नाराजी आहे. तरीही तेथे भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेनेही तेथे ताकद लावली आहे. त्यामुळे भाजपला येथेही जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे धुळे आणि अहमदनगरमध्ये भाजपविरोधात कुण्या एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, पण ते भाजपलाही मिळू देणार नाही, अशी स्थिती त्यांनी निर्माण केली आहे. 
-निवासी संपादक, जळगाव 

बातम्या आणखी आहेत...