Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Tyree woman's helping patients in Aurangabad

क्षयरोगग्रस्त स्त्रियांची जिवंतपणी सेवा, मृत्यूनंतर अंत्यविधीही करतात तीन महिला

उषा बोर्डे | Update - Apr 17, 2019, 10:10 AM IST

बुलडाणा जिल्ह्यातील फैमिदा, फरिदा, रईसा शेख यांचे अनोखे सामाजिक कार्य

 • Tyree woman's helping patients in Aurangabad

  औरंगाबाद- एखाद्या क्षयरोगग्रस्त (टीबी) रुग्णाजवळ जायला सहसा कुणी धजावत नाही. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील तीन मुस्लिम महिला या रुग्णांची केवळ सेवाच करत नाहीत, तर एखाद्या क्षयरोगग्रस्त महिलेचा मृत्यू झाल्यास त्यांच्या अंत्यसंस्काराचा संपूर्ण विधी पार पाडतात. फैमिदा अब्दुल्ला शेख, फरिदा जहीर शेख, रईसा नईम शेख अशी या महिलांची नावे आहेत.


  विविध गावांत त्यांना या कामासाठी लोक घरी येऊन बोलावून नेतात. त्यांनी आजवर देओघाट, सागोना, राजूूर आदी गावांत जाऊन हा विधी केला. कोणत्याही धर्मात व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची अंघोळ घालण्यापासून ते सरणावर चढवण्याची प्रक्रिया असते. मुस्लिम धर्मातही हा विधी आहे. मात्र, या महिला वेळ न घालवता त्या ठिकाणी जातात आणि अंत्यसंस्काराचा विधी पूर्ण करतात. यामध्ये सर्वप्रथम मृतदेहाला अंघोळ घालावी लागते. त्याला उर्दूत ‘गुसल’ म्हणतात. त्यानंतर मृतदेहावर कफन चढवण्याला ‘कफनाना’, तर संपूर्ण प्रक्रियेला म्हणजेच अंत्यसंस्काराला ‘तजहिजो तकसीन’ असे म्हणतात.


  क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे. मात्र, त्याविषयी जनजागृती नसल्याने लोक अशा रुग्णापासून दूर पळतात. त्यामुळे जिवंतपणीच अशा रुग्णांची हेळसांड होते. मृत्यूनंतर तर त्यांना दूरच सारले जाते. त्यातल्या त्यात एखाद्या महिलेचा क्षयरोगाने मृत्यू झाला तर तिला कुणी हातही लावत नाहीत. अशा परिस्थितीत या तीन महिला देवासारख्या तेथे धावून जातात.


  अनेकदा बेवारस मृतदेहांवरही स्वखर्चातून करतात अंत्यसंस्कार
  या तिघी बेवारस महिलांच्या मृतदेहांवर स्वखर्चातून अंत्यसंस्कार करतात. एका अंत्यसंस्कारासाठी ३ ते ४ हजारांचा खर्च येतो. त्या तिघी आपापल्या पद्धतीने पैसे गोळा करतात. ५ ते ६ वर्षांपासून त्या हे कार्य करत आहेत. त्यांना घरातूनही सहकार्य मिळते. िशवाय भाजलेल्या, कर्करोग, एचआयव्हीग्रस्त किंवा अन्य रोगाने मृत पावलेल्यांच्या पार्थिवावरही अंत्यसंस्कार करतात, असे त्यांनी सांगितले.

  लोक वाट पाहतात, आत्मिक समाधान मिळते
  ^हा आजार संसर्गजन्य आहे एवढेच लाेकांना माहीत आहे. याविषयी जनजागृती नाही. बऱ्याचदा लोक मृतदेहाला हातही लावत नाहीत. आमच्या येण्याची वाट पाहतात. आम्ही जाऊन सर्व विधी पार पाडतो. यामुळे आत्मिक समाधान मिळते.
  फैमिदा अब्दुल्ला शेख


  क्षयरोगाविषयी लोकांमध्ये जनजागृती नाही
  ^टीबीच्या रुग्णाला हात लावल्याने, सोबत बसल्याने, त्याच्या भांड्याला स्पर्श केल्याने पसरत नाही. जनजागृती नसल्याने लोक रुग्णापासून दूर जातात. मात्र आम्ही रुग्ण व त्यांच्या कुटुुंबांना मार्गदर्शन करतो. ग्रामीण भागात अजूनही रुग्णांची हेळसांड केली जाते.
  डॉ. सचिन जोशी, टीबी स्पेशालिस्ट

  या तिघी जणी सुरुवातीला मृत महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढतात. मग छातीपासून ते गुडघ्यापर्यंत भिजलेला कपडा टाकून त्यानंतर एका विशिष्ट पद्धतीने पोटातील घाण बाहेर काढतात. कापसाच्या बोळ्यांनी शरीराची स्वच्छता करतात. त्यानंतर दोनदा पार्थिवाला अंघोळ घालतात. मग पार्थिवाला कपड्यात गुंडाळून त्याला स्मशानभूमीत पाठवतात.

Trending