आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मुलाखत; पवार यांच्या गाडीतून माझे फिरणे खटकत असेल तर मला गाडी घेऊन द्या : उदयनराजे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भाेसले तिसऱ्यांदा मतदारांसमोर जात आहेत. यापूर्वी २००९ आणि २०१४ मध्ये त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. राजघराण्याचे वलय, आक्रमकपणा व वागण्या-बोलण्यातील खास स्टाइल या उदयनराजेंच्या व्यक्तिमत्त्वाचे राज्यभरात फॅन आहेत. यंदा अनेक पक्ष पायघड्या घालून तयार असताना ते राष्ट्रवादीलाच पसंती देऊन लाेकसभा लढवण्यास सज्ज झाले आहेत. निवडणुकीसह अनेक विषयांवर ‘दैनिक दिव्य मराठी’ने राजेंशी साधलेला संवाद...  

प्रश्न : मराठा आरक्षणाच्या लढ्यात आपण सक्रिय होता. अारक्षणाच्या निर्णयाचा सत्ताधाऱ्यांना लाभ हाेईल का?  

उदयनराजे : प्रत्येक गोष्टीत लाभाचाच विचार चांगला नाही. जाती, धर्माचा वापर कोणीही वैयक्तिक किंवा राजकीय स्वार्थासाठी करू नये, अशी अापली पहिल्यापासूनच भूमिका अाहे. इतर जातींना जसे आरक्षण दिले तसे मराठा समाजालाही मिळावे ही मागणी काही चुकीची नाही. आज कितीतरी मराठा कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली आहेत. तुम्ही इकॉनॉमिकल बॅकवर्ड म्हणताय ना, मग सरसकट लागू करा ना. जात कशाला मध्ये आणता? जे आर्थिकदृष्ट्या मागास असतील तो निकष लावा.

 

प्रश्न : आपल्याला सत्ताधारी पक्षाकडूनही ऑफर होती अाणि पक्षात एवढा विराेध असताना तुम्ही राष्ट्रवादीच का निवडली?  
> उदयनराजे : मी पहिल्यापासून सामाजिक कार्यात आहे... एखादे पद हाती असेल तर सामाजिक कामे मार्गी लावणे साेपे जाते म्हणून मी राजकारणात आहे. मी नेहमीच लोकांच्या हिताचे मुद्दे मांडले. कधीही वैयक्तिक स्वार्थासाठी निर्णय घेतले नाहीत, तसे कधी करणार नाही. भाजप असाे वा शिवसेना.. काँग्रेस, आरपीआय, जनता दल, अगदी कम्युनिस्टही या सर्वच पक्षात माझे वैयक्तिक संबंध आहेत. कोणत्या पक्षाची ध्येयधोरणे काय आहेत याच्या तपशिलात मला जायचे नाही. पण आज परिस्थिती काय आहे, देश कुठे चालला आहे आणि आपण काय करतो आहोत? पूर्वी राजेशाही होती. तुम्ही सर्वांनी सांगितले ‘नो राजेशाही’. ओके. पण आता लाेकशाहीतही आवाज दाबण्याचा प्रकार होत असेल आणि देशाचा कारभार व्यक्तिकेंद्रित होत असेल तर मग लोकशाही उरते कुठे? मजुरांच्या हाताला काम नाही, रोजगार नाही. माणसांनी जगायचे तरी कसे..? याविराेधात लढा राष्ट्रवादी देत अाहे म्हणूनच मी त्यांच्यासाेबत आहे.

 

प्रश्न : अलीकडे पवारांशी आपल्या गाठीभेटी वाढल्या आहेत. एकाच गाडीतून फिरताना त्यांनी नेमका काय गुरुमंत्र दिला?  
उदयनराजे : पवार साहेबांना मी भेटतच असतो. त्यात नवीन काही नाही. मी सर्वांच्याच गाडीत फिरत असतो. (मिश्कील शैलीत) तुम्हाला जर वाटत असेल मी कुणाच्या गाडीतून फिरू नये तर या महाराष्ट्रातील जनतेने एक रुपया काढून वर्गणी करा आणि मला एक गाडी घेऊन द्या. म्हणजे मी अशी एक मोठ्ठी स्वत:ची गाडी घेईन आणि त्यातून सर्वांना घेऊन फिरेन.  


प्रश्न : घराणेशाहीबद्दल काय सांगाल?  
उदयनराजे : मी काही घराणेशाही मानत नाही. अनेक राजघराण्यांनी संपूर्ण देशावर राज्य केले. मात्र त्यापैकी जे लाेकांच्या प्रश्नावर काम करत राहिले त्या राजघराण्यांना लोकांनी उचलून धरले. तेच लाेकं तुम्हाला राजकारणात आणि समाजकारणात दिसतात. ज्या वारसदारांनी चांगले काम केले नाही त्यांना लाेकांनी बाजूला केले. अशी अनेक उदाहरणे आहेत.  

 

प्रश्न : प्रचाराची तुमची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते.. यंदा मुद्दे काय असतील?  
उदयनराजे : ‘मन की बात’वर लोकांनी विश्वास ठेवला, मात्र या विश्वासाला सरकार पात्र ठरले नाही. अन्यायकारक व लोकहिताच्या विरुद्ध धोरणे राबवली गेली. त्यामुळे उद्योगाची वाताहत झाली. कारखाने बंद झाले आहेत. रोजगार निर्मिती ठप्प झाली आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मी जेव्हा लोकांमध्ये जातो तेव्हा लोक मला हेच सांगतात. राज्यात शेतकऱ्यांच्या रेकॉर्डब्रेक आत्महत्या वाढल्या आहेत. जनता हतबल झाली. हे असेच सुरू राहिले तर या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. ती अवस्था या देशावर कधीही येऊ नये म्हणून लोकशाहीतल्या राजांनी म्हणजे जनतेने आता सत्तेत बदल करणे गरजेचे आहे. हेच मुद्दे आता जनतेसमाेर मांडत आहे.  

 

प्रश्न : प्रचारात मोदी-फडणवीसांवर टीका करणार का?  
उदयनराजे : माझे कुणाशी वैयक्तिक वाईट संबंध नाहीत. कुणाचेही नाव घेऊन त्यांच्यावर चिखलफेक करण्याइतका उदयनराजे स्वस्त झालेला नाही. मी जेव्हा म्हणतो इश्यू बेस पॉलिटिक्स तेव्हा संबंधित लाेकांनीही इश्यूवरच बोलावे. कोणताही पक्ष असो, त्यांनी लोकांचे इश्यू, लोकांना बोचणारे प्रश्न यावर बोलले पाहिजे, चर्चा केली पाहिजे. व्यक्तिगत काही कुणाला घेणेदेणे आहे?  

 

प्रश्न : स्वपक्षीयांशीच तुमचे जमत नाही. वादाचे नेमके कारण काय?  
उदयनराजे : कसला वाद? वाद किंवा मतभेद कधीच नव्हते. अापण काॅलेजचे मित्र असताे ना, कधी पटते कधी पटत नाही. असेच थोडेसे इकडे-तिकडे होत असते. याचा असा अर्थ मतभेद आहेत असे नाही.  

 

प्रश्न : तुमच्या मुलांना भविष्यात राजकारणात आणण्याचा विचार आहे का?  
उदयनराजे : नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, शेवटी प्रत्येक गोष्ट रक्तात असते. त्यांनी हे करू नये असे मी कदापि म्हणणार नाही. परंतु त्यांनी निश्चितपणे समाजकार्यासाठी योगदान दिलेच पाहिजे. राजकारणात या किंवा येऊ नका, तो तुमचा विषय आहे. परंतु लोकांवर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध लढा उभारलाच पाहिजे. कुणावरही अन्याय होऊ देता कामा नये. शेवटी उदयनराजेंचा ‘छावा’ आहे तो.  


प्रश्न : तुम्हाला गाड्यांचा छंद आहे. सर्वात आवडती गाडी कोणती?  
उदयनराजे : (स्मितहास्य) जी मिळेल ती....  

 

प्रश्न : या टर्ममध्ये मतदारसंघातील प्रमुख कामे सांगाल का?  
उदयनराजे : सातारा शहरातील पोवई नाका भागात वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातून अपघात होण्याचे प्रकार घडत होते. त्यासाठी ग्रेड सेपरेटरसाठी ६० कोटींचा निधी आणला आहे. शिवाय सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढवण्यासाठी निधी मंजूर करून आणला. इतरही अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.

 

 

बातम्या आणखी आहेत...