आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - शिवसेना हे पक्षाला नाव देताना काेणाला विचारून देण्यात आले? त्या वेळी छत्रपतींच्या वंशजांना विचारण्यास आले हाेते का? महाशिव आघाडीतून कशामुळे ‘शिव’ शब्द काढण्यात आला? त्या वेळी आम्हाला विचारले का? दादरच्या शिवसेना भवनावर महाराजांचा पुतळा छाेटा व बाळासाहेब ठाकरेंचा फाेटाे माेठा काेणी केला? शिवस्मारक अजून का झाले नाही? शिववडा नाव देत महाराजांचा अपमान काेणी केला? जेम्स लेन प्रकरणावेळी महाराजांचा अपमान हाेऊनही शिवसेना गप्प का बसली? त्यामुळे शिवसेना नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा राजकारणासाठी वापर न करता शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करावे, मग त्यांच्यासाेबत काेणी उभे राहते का दिसून येर्इल, असा टाेला माजी खासदार उदयनराजे भाेसले यांनी पत्रकार परिषदेत लगावला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय दुसरे काेणी जाणते राजे हाेऊ शकत नाहीत, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. भाजप नेते गाेयल यांनी प्रकाशित केलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र माेदी’ या वादग्रस्त पुस्तकावर भाष्य करण्यासाठी उदयनराजे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद आयाेजित केली. या वेळी उदयनराजे म्हणाले, हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मला वार्इट वाटले. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष हाेते. त्यामुळे त्यांच्याशी तुलना साेडा, पण काेणीही त्यांच्या जवळपासदेखील जाऊ शकत नाही. गाेयल यांनी पुस्तक मागे घेतले असले तरी त्यांनी याप्रकरणी जनतेची माफी मागणे गरजेचे आहे. मी छत्रपतींच्या घराण्यात जन्माला आलाे हे माझे भाग्य आहे, परंतु शिवाजी महाराज केवळ आमच्या घराण्यापुरते मर्यादित नसून ते सर्व समाजाचे आहे. शिवसेनेच्या नावाला आम्ही कधी हरकत घेतली नाही. छत्रपतींच्या नावाचा वापर करताना त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे अभिप्रेत आहे. परंतु सर्व राजकीय पक्ष साेयीप्रमाणे छत्रपतींचा वापर करून गलिच्छ राजकारण करत आहेत. सत्तेच्या मागे पळणारे कुत्र्यासारखे आम्ही नसून खासदार म्हणून निवडून आलाे तरी मनाला विचार पटले नाहीत म्हणून राजीनामा देत पुन्हा निवडणुकीला सामाेरे गेलाे. बिनपट्ट्याच्या लाेकांना लायकी दाखवून देणार, अशी टीका त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता करत परत असे काही बाेलाल तर लाेक तांगडून मारतील. त्या वेळी माझ्याकडे दयावया करण्यास येऊ नका, असा इशारा दिला आहे. आता तुमची वेळ संपली असून तुम्ही ‘ब्र’ काढला तर आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत, असे सांगत ते म्हणाले, महाराजांचे नाव घेण्याची लायकी काेणत्याही राजकीय पक्षाची नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांना एका कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील व्यक्ती मुजरा करताे याबाबत त्यांचा पक्ष स्पष्टीकरण देणार आहे का? राज्यातील शेतकरी एका बाजूला मरत असून दुसरीकडे पक्षांची मंडळी पंचतारांकित हाॅटेलात बैठका करतात. राज्याचा खेळखंडाेबा या लाेकांनी लावलेला असून हे दिवस पाहण्यापेक्षा मेलेले बरे असे वाटते. स्वातंत्र्यप्राप्तीला ६० वर्षे हाेऊन अधिक काळ उलटला, मात्र जनतेला काय मिळाले? लाेकशाहीएेवजी राजेशाही असती तर एकही जण उपाशी राहिला नसता. लाेकशाही मार्गाने निवडून दिलेल्या नेत्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्नांची साेडवणूक केली पाहिजे.
दंगली घडवणारे काेण ते तपासून पाहिले पाहिजे
उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर साेयीइनुसार राजकारणासाठी केला जात असून महाराजांच्या नावावर काेण जातीय दंगली घडवते हे तपासून पाहिले पाहिजे. भिवंडीतील दंगल काेणी घडवली याच्या मुळाशी जावे. श्रीकृष्ण आयाेगाने दिलेल्या अहवालातही दंगली काेणी घडवल्या हे सांगण्यात आले आहे. पूर्वी केवळ चार जाती अस्तित्वात हाेत्या, परंतु राजकारणाच्या वापरासाठी चार हजार जाती-पाेटजाती निर्माण केल्या गेल्या. प्रत्येक पक्षाने स्वत:च्या जाती ठरवल्या, हे दुर्दैवी आहे.
शिवजयंती एकाच दिवशी साजरी व्हायला पाहिजे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने तीन शिवजयंत्या वर्षभरात साजऱ्या केल्या जातात, मात्र त्याबाबत लाेकांमध्ये संभ्रम निर्माण हाेत असून परदेशातील भारतीय नागरिकांनाही अडचणी निर्माण हाेत आहे. पूर्वीच्या इतिहास संशाेधकांनी आयुष्यभर अभ्यास करून १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख निश्चित केली, परंतु राजकारणासाठी पुन्हा दुसऱ्या तारखेच्या शिवजयंत्या सुरू झाल्या. राजेंचा जन्म तीन दिवशी कसा हाेऊ शकताे? त्यामुळे शिवजयंतीची एकच तारीख असली पाहिजे, असे मत उदयनराजे यांनी या वेळी मांडले. महाविकास आघाडीवर टीका करताना ते म्हणाले, स्वार्थाने ज्या वेळी लाेक एकत्र येतात त्या वेळी काेणतीही आघाडी फार काळ टिकत नाही. ताकदीचा, आमिषाचा वापर त्याकरिता करावा लागताे आणि स्वार्थ साध्य झाला की असे लाेक बाजूला हाेतात. विचाराने एकत्र आलेले लाेक कायमस्वरूपी एकत्र राहतात.
उदयनराजे यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही : नवाब मलिक
उदयनराजे भाजपत गेल्यानंतर त्यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत कुठेही निषेध केला नाही किंवा भाजपच्या विरोधात काही बोलले नाही. याचा अर्थ इतरांकडे बोट दाखवून त्यांची लाचारी काय आहे हे दाखवून देत आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर पलटवार केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.