आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजेंचा भाजपमध्ये प्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सातारचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी  शनिवारी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी, त्यांनी लोकसभा अध्यक्ष आेम बिर्ला यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा सोपवला. पक्ष प्रवेशाच्या वेळी अमित शहा म्हणाले की, आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमचा पक्ष शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित आहे. भाजप आणि जनसंघाने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीवर वाटचाल केली आहे. त्यांच्या परिवारातील एक सदस्य भाजपमध्ये सहभागी होणे, ही आनंदाची बाब आहे. नैतिकता राखत भाजपमध्ये प्रवेशासाठी उदयनराजेंनी अवघ्या चार महिन्यांतच खासदारकीचा राजीनामा दिला. ही अभिमानाची बाब आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून भाजप उत्तम कामगिरी करेल, असा विश्वासही शहा यांनी यावेळी व्यक्त केला.  लोकहितांसाठीच भाजपमध्ये :   उदयनराजे भोसले म्हणाले, लोकांच्या हितांसाठीच आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याच निर्णय घेतला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्ये व नेतृत्वाने खूप प्रेरित आहोत. देशाला मजबूत करण्यासाठी भाजप शिवाजी महाराजांच्या धोरणांचे पालन करत असल्याचे पाहून आपल्याला आनंद वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना भाजप समर्थपणे पुढे नेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मिरातील कलम ३७० हटवण्याचे साहस दाखवले, ज्याबाबत कुणी कधी विचारही केला नव्हता. हे संवेदनशील प्रकरण त्यांनी अत्यंत परिपक्वतेने हाताळले आहे. पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वामुळेच देशातील लोक भाजपमध्ये सहभागी होत आहेत.  - ५३ वर्षीय उदयनराजे हे साताऱ्यातून २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये खासदार राहिलेले आहेत. त्याआधी ते आमदारही होते. त्यांनी १९९५ मधील युती सरकारमध्ये महसूलमंत्री म्हणूनही काम पाहिलेले आहे.  - विशेष म्हणजे साताऱ्याचे आमदार आणि उदयनराजे यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनीही यंदा ३१ ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश केला होता. - २००९ च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मंत्री असताना १९९९ मध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शरद लेवे हत्याप्रकरणात ते आरोपी होते. मात्र कोर्टाने त्यांची सुटका केली होती. 

उदयनराजेंविरुद्ध लढलेल्या सेनेच्या नरेंद्र पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट 
उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर िशवसेनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे वृत्त आहे. पाटील यांनी साताऱ्यात शिवसेनेकडून उदयनराजे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र आता उदयनराजेंच्या राजीनाम्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक होणार आहे. ती विधानसभा निवडणुकीसोबतच घेतली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर पाटील-पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटले आहे.

बातम्या आणखी आहेत...