आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव आणि देवेंद्र यांच्या दोस्तीची दास्तान...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेमंत देसाई

सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा माज करू नये, अशा शब्दांत भाजपला सुनावताना उद्धव ठाकरे यांनी, आपला कारभार नेमस्त असेल, असेच  एका अर्थाने सूचित केले आहे. या स्थितीत सत्ता वंचित राहिल्याचे दुःख विसरून सरकारला खिंडीत पकडण्याचे काम फडणवीस करू शकतील. मात्र, उद्धव आणि देवेंद्र यांच्यातील ‘दोस्ताना’ पाहता, विधिमंडळात यापुढेही डायलॉगबाजी ऐकायला मिळू शकते...


आजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मैत्री ‘शोले’तील जय-वीरूसारखी आहे. ‘शोले’मधील ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, छोड़ेंगे सब मगर, तेरा साथ न छोड़ेंगे’ हे गाणे आजही करोडो लोकांच्या ओठांवर आहे. मात्र, वास्तव जीवनात ही जय-वीरूची जोडी फुटली आहे. ‘देवेंद्रजींबरोबरची मैत्री कायम राहील,’ असा भरवसा उद्धव यांनी दिला असला, तरी अनेकदा राजकारणातील मैत्रीचा प्रवास काळवेळ पाहून व सोयीसोयीने होत असतो, हे विसरता कामा नये.
 
शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांच्यात मैत्री होती, पण राजकारणात दोघेही एकमेकांचे शत्रू होते. उलट (स्व.) विलासराव देशमुख व (स्व.) गोपीनाथ मुंडे यांच्यातील याराना खूप जुना होता. त्याचा दोघांनाही एकमेकांच्या विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी फायदाच झाला. परंतु, दोघांचे पक्ष एकमेकांच्या विरोधातच होते. आज भाजप व शिवसेना यांची युती मोडली असली, तरीही युतीत असतानाही, हे दोन्ही पक्ष एकमेकांचे तसे मित्र नव्हतेच. याचे कारण हिंदू मतांवर राजकारण करताना दुसरा पक्ष दुबळा झाला, तरच आपला जनाधार वाढणार, हे परस्परांना ठाऊक होते. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेने परस्परांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. खासकरून भाजपने जास्तच. बॅरिस्टर अ. र. अंतुले यांची व बाळासाहेबांची मैत्री होती. परंतु, अल्पसंख्य समाजाचा मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेने आपल्याला विरोध करू नये, हाही या मैत्रीचे प्रदर्शन मांडण्यामागील अंतुलेंचा 
अंतःस्थ हेतू होता. 

विलासराव व सुशीलकुमार शिंदे ही दुक्कल ‘दो हंसों का जोड़ा’ म्हणून प्रसिद्ध होती. सोनिया गांधींच्या विदेशी मुळाचा मुद्दा करून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर, सहा महिन्यांत निवडणुका झाल्या. परंतु, या राष्ट्रवादीबरोबरच आघाडी स्थापन करून राज्यातील सत्ता काबीज करावी, अशी भूमिका सुशीलकुमार यांनी मांडली. त्यांच्याच नेतृत्वाखाली कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार स्थापन व्हावे, अशी त्यांचे मित्र शरद पवार यांची इच्छा होती. परंतु, सुशीलकुमार मुख्यमंत्री झाल्यास, ते पवारांच्या तालावर नाचतील, अशी भीती वाटून, तेव्हा काँग्रेसचे निरीक्षक असलेल्या माधवराव शिंदे यांनी त्यांच्या नावाला विरोध केला. पवारांच्या विरोधी गटातील मराठा नेता मुख्यमंत्रिपदी असावा, असा पवित्रा त्यांनी घेतला व त्यामुळे प्रत्यक्षात माळ विलासरावांच्या गळ्यात पडली. परिणामी एक हंस खुश झाला असला, तरी त्याचा मित्र असलेला दुसरा हंस मनातल्या मनात खट्टू झाला होता.  

मागे १९८७ मध्ये विधानसभा निवडणूक झाली, ती पवारांच्या नव्हे तर वसंतदादा पाटलांच्या नेतृत्वाखाली. शिंदे यांनी मूळ काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती, इंदिरा काँग्रेसतर्फे नव्हे. वसंतदादा मूळ काँग्रेसऐवजी इंदिरा काँग्रेसचे हात मजबूत करून, स्वपक्षाला कमजोर करत आहेत, अशी भूमिका पवारांनी घेतली. पवार यांनी दादांच्या पाठीत ‘खंजीर’ खुपसला, तेव्हा त्यांच्या साथीला त्यांचे मित्र सुशीलकुमारही होते. पवारांच्या ‘पुलोद’मध्ये सुशीलकुमार कॅबिनेट मंत्री झाले. लोकसभा निवडणुकीत जनता पक्ष आणि काँग्रेसचा पालापाचोळा झाला. तेव्हा, पवारांचे आपण मित्र आहोत, असे सांगणारे सुशीलकुमार पुलोद सरकारचे भवितव्य धोक्यात येताच, अचानक आजारी पडले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी, समांतर काँग्रेसमध्येच राहू आणि यशवंतराव व पवार यांचे नेतृत्वच मानत राहू, असे जाहीर केले. परंतु, १९८० साली विधानसभा बरखास्त झाली व मंत्रिपदही गेल्यानंतर, पवारांच्या मागे राहून उपयोग नाही, हे लक्षात येताच सुशीलकुमारांनी इंदिरा काँग्रेस हेच आपले खरे घर असल्याची घोषणाच करून टाकली. त्यामुळे राजकारणातील मैत्रीचा अर्थ काय, तो ज्याचा त्याने समजून घ्यावा! 

आता फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली असून, ‘मैं समंदर हूँं, लौटकर वापस आऊंगा’ असे ऐकवत, ‘मी पुन्हा येईन’चा सूर त्यांनी पुन्हा आळवला आहे. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम करणारे, असा उल्लेख फडणवीस यांच्या संदर्भात रास्तपणे केला जातो. परंतु, १९६३- १९७५ असा दीर्घकाळ मुख्यमंत्रिपदी राहणाऱ्या नाईकांबद्दल त्यांना जरा सांगावे लागेल. त्या वेळी विरोधी पक्षाचे संख्याबळ कमी होते. परंतु, कृष्णराज धुळप, जांबुवंतराव धोटे, मृणाल गोरे हे प्रश्नोत्तराचा तास गाजवत असत. तेव्हा राजकारणात आचार्य अत्रे, उद्धवराव पाटील, दाजिबा देसाई, मधू दंडवते, दत्ता देशमुख, रामभाऊ म्हाळगी, आर. डी. भंडारे असे कितीतरी दिग्गज नेते जोमात होते. दुष्काळ, महागाई, गिरणी कामगारांचे प्रश्न, शेतमजुरांचे वेतन याबद्दलची आंदोलने सुरू होती. परंतु, वसंतरावांनी विरोधी पक्षांना बरोबर घेऊन प्रश्नांची व्यवस्थित हाताळणी केली. एवढेच नव्हे, तर त्यांच्याच काळात व त्यांच्याच पाठिंब्याने गृहनिर्माणमंत्री यशवंतराव मोहिते यांनी मुंबई घरदुरुस्ती कायदा विधेयक विधानसभेत आणले आणि गिरणगावातील नादुरुस्त झालेल्या चाळींची पुनर्बांधणी करण्याचे काम हाती घेतले. 

सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा माज करू नये, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले आहे. याचा अर्थ, आपला कारभार स्वतःच्या स्वभावानुसार नेमस्त असेल, याचे संकेत त्यांनी दिले आहेत. परंतु वीस वर्षांनंतर या वेळी प्रथमच भाजप हा एकमेव पक्ष विरोधी अवकाश व्यापून राहिला आहे. कर्जमुक्ती, बेकारांना भत्ता ही आश्वासने उद्धव सरकारने पूर्ण न केल्यास, त्याची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपला करता येईल. सत्तारूढ पक्षात जयंत पाटील, भुजबळ, दिलीप वळसे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अब्दुल सत्तार, सुभाष देसाई यांच्यासारखे अनुभवी मोहरे आहेत. आपण सत्तावंचित राहिल्याचे दुःख विसरून, विधिमंडळात एक टीम बांधून सरकारला खिंडीत पकडण्याचे काम फडणवीस करू शकतील. ‘दोस्ताना’ या चित्रपटात अमिताभ व शत्रुघ्न सिन्हा यांच्या दोस्तीचे दुश्मनीत रूपांतर होते. तेव्हाची उभयतांची डायलॉगबाजी ऐकण्यासारखी होती. येत्या काही दिवसांत विधिमंडळात तसाच प्रत्यय येईल का?

hemant.desai001@gmail.com

बातम्या आणखी आहेत...