आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्धव-रश्मींची 'ॲनिव्हर्सरी' साजरी होणार 'वर्षा'वरच!  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती झाल्याचे शरद पवारांनी शुक्रवारी जाहीर केले खरे; पण या निर्णयाच्या खऱ्या सूत्रधार आहेत त्या उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे. त्यांनी आपला हट्ट सोडला नाही आणि तसेच घडले, जे रश्मींना हवे होते.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, या रश्मींच्या आग्रहाप्रमाणे घडले. आतील गोटातील बातमी अशी की, उद्धव मुख्यमंत्री झाले नाहीत, तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री रश्मी ठाकरे ठराव्यात, पण घराबाहेर हे पद जाऊ नये, असा दबाव उद्धव यांच्यावर 'मातोश्री'तून होता. आणि आपल्या लग्नाचा वाढदिवस (१३ डिसेंबर) 'वर्षा'वर साजरा व्हावा, असा रश्मींचा हट्ट सुरू होता. आदित्य यांना हे पद आताच देण्याचा धोका पत्करू नये. त्यांना अनुभव घेऊ द्यावा, असेही रश्मी यांचे आता म्हणणे आहे. उद्धव यांच्या निर्णयप्रक्रियेवर रश्मींचा आणि अलीकडे आदित्य यांचाही मोठा प्रभाव असतो, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा ही आता औपचारिकता उरली आहे.


उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह खुद्द 'मातोश्री'मधून खूप आधीपासून सुरू होता. रश्मी ठाकरे यांना 'मातोश्री' सोडून 'वर्षा'वर जाण्याचे वेध लागले आहेत. 'मातोश्री'पेक्षाही 'वर्षा'ला असणारे वलय अधिक आहे आणि रश्मी यांना ते खुणावते आहे. अमृता फडणवीस यांच्यामुळे 'मिसेस मुख्यमंत्री'साठीही 'वर्षा' चर्चेत आले. आता रश्मी यांना ते वलय अनुभवायचे आहे. रश्मी आणि आदित्य ठाकरे यांची इच्छा अशी आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच व्हावे. मुख्यमंत्री अन्य कोणी झाल्यास समांतर सत्ताकेंद्र तयार होऊ शकते आणि पक्षप्रमुखापेक्षा ती व्यक्ती मोठी ठरू शकते. शिवसेनेला आणखी एक 'नारायण राणे' नको आहेत! शिवाय, अन्य मुख्यमंत्री झाल्यास पक्षांतर्गत नाराजीही भोवू शकते. त्यामुळे उद्धव यांनीच मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा शिवसैनिकांचीही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही उद्धव मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते. कारण, उद्धव मुख्यमंत्री झाले, तर सरकार स्थिर राहण्याची शक्यता वाढते. शिवाय वेगळ्या रिमोट कंट्रोलचा मुद्दा निकाली निघतो.


शुक्रवारी दिवसभर मुंबईत वेगवेगळ्या बैठका होत होत्या. नव्या सरकारचे स्वरूप स्पष्ट होत होते. शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार, हेही स्पष्ट झाले. मात्र, मुख्यमंत्री कोण, हे ठरवणे शिवसेनेसाठी सोपे नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे तगडे चेहरे शिवसेनेकडे नाहीत. राज्यव्यापी 'अपील' असेल, असे नाव नाही. विरोधकांच्या हल्ल्याला तोंड देईल आणि दोन्ही काँग्रेसशी जुळवून घेतानाच आपला प्रभावही सिद्ध करेल, असा आक्रमक, अभ्यासू नेता नाही. अशा वेळी उद्धव ठाकरे यांनी ही धुरा सांभाळावी, असा सूर होता. उद्धव हाच एकमेव पर्याय असू शकतो, यावर सर्वांचे एकमत आहे. पूर्ण पाच वर्षे टर्म मिळाली तरच मुख्यमंत्री होऊ, असे उद्धव यांचे म्हणणे होते. त्यांची ती अटही दोन्ही काँग्रेसने मान्य केली आहे. उद्धव मुख्यमंत्री नसतील तर अन्य सेना नेत्याच्या हाताखाली काम करणे दोन्ही काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसाठीही गैरसोयीचे ठरू शकते.


मात्र, उद्धव यांच्या एका जवळच्या मित्राचे मत वेगळे आहे. त्यांच्या मते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तर त्यांना विधिमंडळात विरोधकांना तोंड द्यावे लागेल. शिवाय, एखादा आरोप मुख्यमंत्र्यांवर झाल्यास पूर्ण शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागेल. त्यामुळे असा धोका पत्करण्यास उद्धव तयार नव्हते.
 
 

बातम्या आणखी आहेत...