आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई/ दिल्ली - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दिल्लीत दाेन दिवस झालेल्या बैठकीत शिवसेनेसाेबत सत्ता स्थापन करण्याच्या निर्णयावर एकमत झाले आहे. इतकेच नव्हे तर तिन्ही पक्षांनी सत्तावाटपाचा फाॅर्म्युलाही निश्चित केला असून शुक्रवारी सेनेसाेबतच्या अधिकृत चर्चेेत त्यावर शिक्कामाेर्तब करण्याची आैपचारिकता पूर्ण करण्यात येईल. मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे यांच्या नावावर जवळपास एकमत झाले आहे, मात्र पाच वर्षे पद मिळाले तरच ठाकरे हे मुख्यमंत्रिपद स्वीकारतील. सेना- राष्ट्रवादीत अडीच-अडीच वर्षे विभागणी झाल्यास मात्र शिवसेना एकनाथ शिंदे किंवा सुभाष देसाई यांना संधी देऊ शकेल, अशी माहिती आहे. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री शरद पवार मुंबईत येताच उद्धव व आदित्य ठाकरे त्यांच्या बंगल्यावर गेले. खासदार संजय राऊत, अजित पवारही उपस्थित हाेते. सुमारे तासभर या नेत्यांत चर्चा झाली.
बुधवारी व गुरुवारी दिल्लीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. त्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, ‘शिवसेेनेसाेबत सत्तास्थापनेबाबत आमचे एकमत झाले आहे. शुक्रवारी आम्ही मुंबईत आमच्या मित्रपक्षांसाेबत चर्चा करू. यानंतर शिवसेनेसोबत बैठक हाेऊन अंतिम घाेषणा केली जाईल.’ तथापि, मुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीची घटक पक्षांची बैठक होणार आहे, तर दुपारी १२ वाजता शिवसेना आमदारांची बैठक होईल. त्यानंतर तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होईल.
मंत्रिपदाचे सूत्र : तिन्ही पक्षांना चार आमदारांमागे प्रत्येकी एक मंत्रिपद
राज्यात ३३ कॅबिनेट व १० राज्यमंत्री हाेऊ शकतात. शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी १५, तर काँग्रेसला १२ मंत्रिपदे मिळतील.
समन्वय समिती : तिन्ही मोठे पक्ष व पाच घटक पक्ष यांच्यात समन्वय राहावा म्हणून समन्वय समितीत तिन्ही पक्षांचे प्रतिनिधी असतील.
शुक्रवार : उद्धव-पवार यांची भेट झाल्यानंतर सत्ता स्थापनेबाबत अधिकृत घाेषणा केली जाऊ शकते.
शनिवारी : सत्तास्थापनेचा दावा महाविकास आघाडी राज्यपालांकडे करण्याची शक्यता आहे.
असे असेल महाविकास आघाडीचे संभाव्य मंत्रिमंडळ
शिवसेना : १५ मंत्रिपदे
> मुंबई : एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रवींद्र वायकर, अनिल परब, सुनील प्रभू
> कोकण : उदय सामंत, रामदास कदम.
> पश्चिम महाराष्ट्र : शंभुराजे देसाई
> मराठवाडा : तानाजी सावंत,अब्दुल सत्तार
> उ. महाराष्ट्र : दादा भुसे, गुलाबराव पाटील
> विदर्भ : संजय राठोड, आशिष जैयस्वाल.
> राष्ट्रवादी : १५ मंत्रिपदे, ‘सीएम’साठीही आग्रही
> शिवसेनेचे ५६ व राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. केवळ दाेन जागांचा फरक असल्याने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीही आग्रही आहे. या पक्षाला १५ मंत्रिपदे मिळू शकतात. आघाडी सरकारमध्ये असलेल्या १२ खात्यांसाठी पक्ष आग्रही.
काँग्रेस : उपमुख्यमंत्रिपद, महसूल मंत्रिपद शक्य
संभाव्य मंत्री : अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात (संभाव्य उपमुख्यमंत्री), विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, नाना पटोले
पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद शक्य
पश्चिम महाराष्ट्र : अजित पवार, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, मकरंद पाटील. मराठवाडा : धनंजय मुंडे, राजेश टोपे. उत्तर महाराष्ट्र : छगन भुजबळ. मुंबई : नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड. विदर्भ : अनिल देशमुख.
घटकपक्षांना एक राज्यमंत्रिपद
> काँग्रेस- राष्ट्रवादीचे मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, रिपब्लिकन पक्षाचा कवाडे गट हे पक्ष आहेत
> घटक पक्षांचे तीन आमदार या वेळी निवडून आले आहेत. या तिघांपैकी एकाला राज्यमंत्रिपद मिळू शकते.
महाशिव नव्हे, महाविकास आघाडी
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या प्रस्तावित आघाडीस माध्यमांनी ‘महाशिव आघाडी’ असे नाव दिले हाेते. त्याला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या आघाडीतून केवळ शिवसेनेचेच नाव दिसते. तीन पक्ष एकत्र असताना एकाचेच नाव नको, तिन्ही पक्षांच्या नावांची सरमिसळही नको, असे काँग्रेसचे म्हणणे हाेते. त्यामुळे आता आघाडीचे नाव ‘महाविकास आघाडी’ असे ठेवले असल्याचे सांगितले जाते.
राजकीय नेत्यांचे ट्विट्स
‘काँग्रेसच्या विराेधामुळे शिवसेनेने महाशिव आघाडीतील ‘शिव’ शब्द हटवला. आता ‘महासेना आघाडी’ म्हटले जाईल. ही
‘सेना’ शिवरायांची की अफजलखानाची?
- अवधूत वाघ, भाजप प्रवक्ते
‘यूपीत बसपसाेबत जाऊन जी चूक केली ती महाराष्ट्रात सेनेसाेबत जाऊन काँग्रेसने करू नये. असे केल्यास काँग्रेस दफनच हाेईल.
- संजय निरुपम, काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.