आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातोश्रीच्या अन्नात मिठाचा खडा टाकणारा आता युतीत मीठ कालवतोय : उद्धव ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवेक ताम्हणकर 

रायगड - मातोश्रीच्या जेवणात मिठाचा खडा टाकणारा आता शिवसेना-भाजप युतीत मीठ कालवायला आला आहे. कणकवलीतला लढा सेना-भाजपमध्ये नाही तर तो राणे यांच्या वृत्तीविरोधात आहे. हा त्यांचा शेवटचा अवतार आहे. नारायण राणे ज्या पक्षात गेले, त्या पक्षाची वाट लागली. २००५ मध्ये मी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या होत्या, आता भाजपला शुभेच्छा देतो, अशा खोचक शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवरही निशाणा साधला. कणकवलीतील सभेत ते बोलत होते. कणकवलीत भाजपने राणेंचे पुत्र नितेश यांना उमेदवारी दिली असून येथे शिवसेनेनेही सतीश सावंत यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. 

दहा रुपयांत जेवण देणार, ते मातोश्रीत शिजवणार का, असा सवाल राणेंनी केला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी राणेंचा एकेरी उल्लेख केला. जो मातोश्रीच्या मिठाला जागला नाही तो मला काय शिकवणार? राणे हे सेना सोडून स्वतः गेले नव्हते तर त्यांना लाथ मारून शिवसेनेतून हाकलून दिल होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. तिथे काही मिळालं नाही. बाहेर पडले आणि स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढला. इकडे वाकोबा, तिकडे वाकोबा आणि म्हणे आम्ही स्वाभिमान, तोही आता भाजपत विलीन केला, अशी सणसणीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

उद्धव म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. भाजपसोबत आमची चांगली युती आहे. भाजपमध्ये चांगली मंडळी असताना त्यांनी नको त्यांना उमेदवारी दिली. कणकवलीच्या जागेवर चांगला उमेदवार दिला असता तर मीही प्रचाराला आलो असतो. अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी त्यांना एका प्रकाराबाबत माफी मागायला लावली. आमच्या रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, श्रीधर नाईक, अंकुश राणे यांचं काय झालं? कोणाकोणाची माफी मागायला लावणार आहात? कुठे गेलीत ही लोकं? इतिहासात डोकावून पाहिलात तर यांची ही खुनशी वृत्ती तुमच्या लक्षात येईल. ते आमच्याकडे तर नकोच, पण आमच्या मित्राच्या घरातही नकोत. मुख्यमंत्र्यांनी राणेंना पाच वर्षे थांबायला सांगावं व नंतर बघावं ते थांबतात का.. मी भाजपच्या भल्यासाठी येथे आलो असल्याचे उद्धव म्हणाले.  
 
 

नाणार प्रकल्प नकोच : उद्धव ठाकरे 
कोकणची राखरांगोळी करणारा नाणार प्रकल्प नकोच. इथले सौंदर्य, इथला निसर्ग टिकला पाहिजे ही आपली भूमिका असल्याचे ठाकरे म्हणाले. विशेष म्हणजे स्थानिकांचा विरोध असताना नाणार प्रकल्प पुन्हा रेटण्याच्या हालचाली सत्ताधारी करत आहेत. भाजपचे कोकणातील नेते यासाठी आग्रही आहेत. सुरुवातीला प्रखर विरोध करणाऱ्या नारायण राणे यांचाही विरोध आता मावळला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाणार प्रकल्पाचा फेरविचार करणार, असे सांगितले होते. 
 

नारायण राणे तुमच्या खुर्चीखालचा बॉम्ब : उद्योगमंत्री सुभाष देसाई 
काल कणकवलीत एका कुटुंबाचा खोटा स्वाभिमान गळून पडला. शिवसेना महाराष्ट्रात कोणाशीही तडजोड करील, परंतु नारायण राणेंशी करणार नाही. भाजपने सुखासुखी येणारी एक जागा सोडली आणि विनाकारण एका वादाला तोंड फुटले. मुख्यमंत्र्यांना एकच सांगेन, जेथे आपण खडसेंना जुमानत नाही तेथे हे विघ्न कशाला घेतलेय? एके दिवशी हा माणूस तुमच्या खुर्चीखालचा बॉम्ब ठरणार आहे. तेव्हा सावध राहा, असा इशारा देसाई यांनी या वेळी दिला. 
 

सूड घेण्यासाठी ही लढत : संजय राऊत 
युती धर्म पाळायचाच असेल तर कायद्याचं राज्य चालवतो म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या रमेश गोवेकरचा छडा लावावा. कणकवलीत आणि सिंधुदुर्गात शिवसैनिकांच्या रक्ताचा सूड घेण्यासाठी ही लढत आहे, असे या वेळी संजय राऊत म्हणाले. 
 

राणेंसोबत शिवसेना सोडणे ही माझी चूकच : सतीश सावंत 
२००५ मध्ये सेना सोडून मी राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ही माझी मोठी चूक आहे. गेली २४ वर्षे त्यांच्यासोबत आहे. या काळात त्यांनी अनेक पदांची आश्वासने मला दिली. मात्र उद्धव ठाकरे यांनी २४ मिनिटांत मला एबी फॉर्म देऊन माझ्यावर मोठे उपकार केले आहेत. त्यांचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही, असे सेनेचे उमेदवार सतीश सावंत म्हणाले.
 

संदेश पारकरांसह भाजपचे नाराज कार्यकर्ते सेनेत 
संदेश पारकर, अतुल रावराणे, जिल्हा बँकेचे संचालक दिलीप पाटील, भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष संदेश पटेल अशा अनेक नेत्यांनी या वेळी शिवबंधन बांधत सेनेत प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...