आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर बीडमध्ये गटप्रमुखांच्या मेळाव्यासाठी मंगळवारी आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यातील सर्वच जागांवर भगवा फडकला पाहिजे असे आवाहन केले. तथापि, मेळाव्याच्या व्यासपीठावर माजी जिल्हा प्रमुखांना डावलल्याने शिवसेनेत बीडमध्ये पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आली आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये ठाकरे यांनी विधानसभेच्या सहाही जागा विजयी झाल्या पाहिजेत. त्यासाठी गाव तिथे शाखा स्थापन करून निवडणूक मोर्चेबांधणी करण्याचे रणशिंग फुंकले आहे . 


दुष्काळाच्या तोंडावरच बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुख व बूथप्रमुखांचा मेळावा घेण्याअगोदर तळेगाव येथे दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी कापूस,सोयाबीन, तूर, मूग ,उडीद ही पिके हातची गेल्याचे सांगितले. राज्य सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी शेतकऱ्यांनी ठाकरे यांना आसूड व रुमणे भेट दिले. भाषणात ठाकरे यांनी दुष्काळ पाहणीसाठी पथके येणे, पाहणी करणे, त्यानंतर दुष्काळ जाहीर होणे या सरकारच्या प्रक्रियेची खिल्लीच उडवली. ठाकरे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढत आम्ही कोरड्या मनाने राजकारण करत नसल्याचे सांगून मुंडे साहेबांच्या प्रेमापोटी बीड लोकसभा मतदारसंघ मागील वेळी सोडला होता, हे आवर्जून सांगितले. मात्र आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

 

ठाकरेंसमोर गटबाजीचे दर्शन 
हेलिपॅडवर ठाकरेंंचे स्वागत करून तळेगाव येथील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे गट प्रमुखांच्या मेळाव्यात व्यासपीठावर दिसले नाहीत. १० महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांत जगताप यांचे नावच घेतले नसल्याने ते दूर राहिले. विशेष म्हणजे जगताप यांनी वडवणी तालुक्यातून मेळाव्यासाठी वाहने लावून शिवसैनिक आणले होते. पक्षप्रमुखांसमोर सर्व जण एकत्र व पक्षप्रमुख जाताच गटबाजी असाच काहीसा प्रकार दिसून आला. 

 

बीडमध्ये झालेल्या शिवसेनेच्या व्यासपीठावर आता राम 
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठवाड्यात बूथ व गटप्रमुखांच्या मेळाव्यातील व्यासपीठावर प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती आकर्षण ठरत असून भाषणातही ठाकरे यांनी श्रीराम मंदिराचे काय झाले आणखी किती पिढ्या वाट बघणार अशी विचारणा करत राम मंदिर उभारणीसाठी कायदाच अस्तित्वात आणा अशी भाजपकडे मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या अच्छे दिनचा ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. वडिलांनी आपणास खरे बोलायचे शिकवले असून जे बोलेल तेच करून दाखवेल, असे सांगत २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 

 

पंकजा मुंडेंच्या बालेकिल्ल्यात डरकाळी 
बीड जिल्ह्यात सहा पैकी पाच ठिकाणच्या विधानसभा मतदार संघात सध्या भाजपचे आमदार असून हा जिल्हा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर शिवसेनेने लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने मुंडे साहेबांवर असलेल्या प्रेमापोटी डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार दिला नव्हता. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना कामाला लागली असून परळीसह सहा मतदार संघात शिवसेना उमेदवार देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

बातम्या आणखी आहेत...