आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकसभा उपाध्यक्षपदाची भाजपकडे हक्काने मागणी केली : उद्धव ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेल्हापूर/ सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाचं ‘आमचं ठरलंय’ असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यावर शिवसेनेत काेणतीही नाराजी नसल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. शिवसेनेच्या नवनिर्वाचित १८ खासदारांसह व ठाकरे कुटुंबीयांसह काेल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेत. या वेळी महसूलमंत्री तथा भाजपचे नेते चंद्रकांत पाटीलही उपस्थित हाेते. 

 

लोकसभा निवडणुकीत साथ दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरकरांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘भाजपशी युती आम्ही दाेन- चार जागांसाठी केलेली नाही, तर हिंदुत्वासाठी केली आहे. काश्मीरचा मुद्दा केंद्राच्या अजेंड्यावर असल्याने आम्ही त्यासाठी युती केली आहे.’ दरम्यान, लाेकसभेचे उपाध्यक्षपद शिवसेनेला हवे आहे का, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, ‘आम्ही भाजपकडे हक्काने याबाबत मागणी केली होती. मात्र, या हक्काच्या मागणीला नाराजी समजण्यात येऊ नये,’ अशा शब्दांत त्यांनी या पदावर दावा असल्याचे अप्रत्यक्ष मान्यच केले. 


दुष्काळाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले, ‘राज्यात दुष्काळी स्थितीत सरकारकडून चांगले काम झाले आहे. या परिस्थितीत पाणीसाठ्याची मोठी चिंतेची बाब बनली आहे. मात्र, दुष्काळाचा हा शेवटचा टप्पा असावा तसेच लवकरात लवकर पाऊस पडावा अशी अपेक्षा करूयात. या आठवड्यात मराठवाडा आणि बाजूच्या काही भागाचा दुष्काळ दौरा आपण करणार आहाेत. तसेच अयोध्या दौऱ्याची तारीख लवकरच जाहीर करू,’ असेही ते म्हणाले.


सीमाप्रश्न : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्‍नासंदर्भात सीमावासीयांनी ठाकरे यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी करून ठाकरे यांचे लक्ष वेधले. एका शिष्टमंडळाने त्यांच्याकडे सीमाप्रश्‍न सोडवण्याची मागणी केली. ‘कर्नाटकव्याप्त सीमाभाग महाराष्ट्रात आलाच पाहिजे, शिवसेना जिंदाबाद’ अशा घोषणाही देण्यात आल्या. या शिष्टमंडळात माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेदार, पंढरी परब, महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे, राजू बिरजे, मनोहर हलगेकर, विजय भोसले आदींचा समावेश होता.

 

खासदारांसमवेत फेडला नवस
उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे यांचे दुपारी पावणेएकदरम्यान अंबाबाई मंदिरात आगमन झाले. त्यापूर्वीच शिवसेनेचे नवनर्वाचित खासदारही गरुड मंडपात आले हाेते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे कुटुंबीयांसह शिवसेनेच्या खासदारांचे स्वागत केले. नंतर या सर्वांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन लाेकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल नवसपूर्ती केली. 
 

बातम्या आणखी आहेत...